अत्तर

सरती संध्याकाळ, प्लॅटफॉर्म नंबर चार,
आंबलेली तनू, तिने लोटली खाली.

निमुळता जीना. शोधक त्या नजरा,
हातातली पिशवी, तिने छातीशी नेली.

सुटे हाताचा आधार, टोचती अंगार,
स्पर्शाची जाणीव, तिला सोडुनीया गेली.

मनातला आक्रोश, कसा शरीराचा वापर,
उपाशी गिधाडांना, तिने अन्नदान केले.

उसवले शरीर, गेले लाजेचेही भाव,
उचलून पावले, ती बाहेरही आली.

घरी येता मग, उभी पाण्याखाली न्हाली,
त्वचेवरची विषे , तिने जाताना पाहिली.

इतक्यात दरवळ, आला मोगर्‍याला बहर,
जाणीवांचे द्वार, तिने उघडून दिले.

अनाम हुरहुर, झाली स्पर्शाला आतुर,
अत्तराची कुपी, तिने जपून आणली.