जोश असावा : कवयित्री सौ. उषाकुमारी

सौ. अंजली गोसावी उर्फ कवयित्री उषाकुमारी! पुण्यातील एक कवयित्री! ज्यांनी व्यक्तिगत आयुष्यात अनेक संकटांचा सामना करूनही आपल्यातील शायरी जपली व तिचा विकास केला. ज्येष्ठ कवी श्री. म. भा. चव्हाण यांच्या प्रकाशनामार्फत त्यांचे 'कलंदरी' हे कवितांचे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले. त्यातील एक कविता इथे देत आहे. मी त्यात कोणतेही बदल केलेले नाहीत.

विनंती - प्रोत्साहनासाठी जरूर प्रतिसाद द्यावेत.

आभारी आहे.

-सविनय
बेफ़िकीर!

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

जोश असावा

लढून जखमी होतानाही होश असावा
बुडूनही प्याल्यात रिकाम्या होश असावा

टकरा देत फिरे हे जीवन घासासाठी
मनकोळ्याचा देहाभवती कोष असावा

रसिकजनांची दाद हौसला देउन जाते
'फिरुन एकदा' हाच तिथे जयघोष असावा

 असंतोष श्वासाश्वासातुन पसरत आहे
सुखाचा विनाकारण मजवर रोष असावा

कर्म आहे, फळ हवेच अट्टाहास कशाला
कमनशिबाचा कायम माथी दोष असावा

अधिकाधिक मी खचून जावे लिहिता लिहिता
मंतरलेल्या भासांचा जल्लोष असावा

धार लिखाणाला चढती चढण्यासाठी
मुहब्बतींचा मैखाना मदहोष असावा

-उषाकुमारी