ठकास महाठक

ठाण्यामध्ये श्री. कखग नावाचे एक मराठी लघु उद्योजक आहेत. त्यांचा कारखाना ज्या उद्योगभवनात आहे तिथे असलेल्या इतर ११ कारखान्यांचे मालक हे अमराठी आहेत. हे सर्व अमराठी मालक सदैव संघटित असतात. विशेषतः कामगारांचे शोषण करणे, चोरून वीज वापरणे, सरकारी कार्यशाळा निरिक्षकाला (फॅक्ट्री इंस्पेक्टरला) लाच देणे, शनिवारी रात्री मद्यपानी मेजवान्या झोडणे ह्या बाबतीत त्यांची मते एकमेकांशी जुळतात. श्री. कखग ह्या गटात मोडत नसल्यामुळे थोडेसे वेगळे पडतात.

तर सांगायची गोष्ट ही की दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी स्थानिक शाखेतील मावळे त्या उद्योगभवनात येऊन उत्सवासाठी काही प्रोत्साहनपर रक्कम (देणगी / खंडणी) घेऊन जातात. श्री. कखग यांची पद्धत अशी होती की ते इतर ११ मालकांकडून प्रत्येकी रु. १००/- घेऊन, घासाघीस करून, गोड बोलून मावळ्यांना रु. १५०० ऐवजी रु. ११००/- मध्ये पटवायचे आणि चहा-नाश्ता देऊन कटवायचे. ते स्वतःचे पैसे घालत नसत. कारण आपले पैसे केवळ सुरवाणी, जिज्ञासा, हरियाली इ. चांगल्या संस्थांना देण्यासाठीच आहेत ह्या बद्दल त्यांच्या मनात कोणतीही शंका नव्हती.     

२-३ वर्षांनी इतरांना ह्या गोष्टीचा सुगावा लागला. त्यांनी सर्वांनी मिळून ठरवले की ह्या वर्षी श्री. कखग ह्यांना पैसे खर्च करायला लावायचेच. लगेच ते कखग यांच्याकडे आले व म्हणाले, "कखगभावु, ह्या वख्ताला गनेश फेस्टिवलासाठी पैसे सर्वानी वायले वायले देवुया. " कखग ह्यांनी मान डोलावली. 

सालाबाद प्रमाणे जुलैमध्ये मावळे उगवले. लगेच कखग ह्यांनी त्यांचे चहा, नाश्ता देऊन प्रेमाने स्वागत केले. हवापाण्याच्या गप्पा केल्या. नंतर विनम्र स्वरांत म्हणाले की यंदा थोडी पद्धत बदललेली आहे. आम्ही सर्व लोक आपापले पैसे वेगळे देणार आहोत. हे माझे दीडशे रुपये घ्या. 

पण एक सांगतो, इतर गाळेवाले उगाचच मंदीचे कारण सांगून पैसे द्यायला काचकुच करतील. हे काही बरोबर नाही. एऱ्हवी ह्यांच्याकडे पार्ट्या करायला भरपुर पैसा आहे. तुम्ही एक काम करा, प्रत्येकाकडून कमीत कमी अडिचशे घ्या, सोडू नका एकालाही.  आपला उत्सव थाटामाटात झाला पाहिजे. 

 पुढे काय घडले ते सुज्ञांस सांगणे न लगे.