विजयादशमी निमित्त - श्रीखंड

  • २ एल. बी. चा पॅक होल मिल्क योगर्ट चा - (दही)
  • साखर
  • वेलची पूड
  • केशर
  • जायफळ
  • हवा असेल तो सुका मेवा (बदाम काजू चारोळ्या)
५ मिनिटे
२ किलो तयार श्रीखंड होते.

श्रीखंड करायच्या आदल्या दिवशीच्या रात्री दही बांधून ठेवा. बांधायला शक्यतो मऊ कापड लागते जसे की स्वच्छ मोठा हातरूमाल. सकाळी त्याचा चक्का तयार होईल. अगदी पुणेरी चितळेंच्या चक्क्याला टक्कर बसेल असा सुंदर प्लेन चक्का तयार होईल. इतका प्लेन की तो फेटा- बिटायला हात ही लावायची गरज नाही. चाळणी किंवा श्रीखंडाचे यंत्र तर लांबच राहिले. आता तो चक्का वाटीने मोजा . साधारण ५ लहान वाट्या भरेल. त्यासाठी साखर साडे तीन वाट्या लागते. जास्त गोड खाणाऱ्यांनी ती वाढवून घालावी. आता चक्क्यामध्ये साखर, वेलची पूड, केशर घालून चांगले फेटून घ्या. एकत्र झाले की मग जायफळ अध-पाव वाटी  दुधात उगाळून घालावे म्हणजे सुंदर स्वाद येतो.
आता यात हवा असलेला सुका मेवा घालून सजवावे.

झाले फक्कड पैकी श्रीखंड तयार. खाणार्याना बोटं चाटायला लावणारे (त्यांची त्यांची बोटं   )

श्रीखंड , पुरी, बटाटाभाजी म्हणजे आमचा अगदी परम प्रिय बेत आहे. त्यात वेळ मिळेल तशी आणि आवड असेल तितकी रंगसंगती वाढवायला हरकत नाही म्हणजे चटणी कोशिंबीर मसालेभात पापड वगैरे वगैरे.  

या निमित्ताने सर्व मनोगती व त्यांच्या कुटूंबियाना पल्लवी आणि समीर कडून
दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा!

सौ. आई