एकटी

फ़िरत होते माळरानावर
उदास एकटी अनवाणी
माथ्यावर सुर्य होता
तळपत,
माझ्याशी स्पर्धा करत
मी मात्र होरपळत होते
ज्वालांनी,
आतल्या आणि बाहेरच्या
अशातच कुठूनसा
एक ढग सुर्या समोर आला
अन उन्हाचा काही भाग
पंखाखाली घेतला
मला वाटू लागले
तो धावत येइल आता
हजारो पाउस धारांतून
अन व्यापुन टाकेल
माझ्या धगधगत्या अंगाचा
कण आणि कण
आणि भिजवुन टाकेल माझा
क्षण आणि क्षण
पण तो आला तसाच गेला
सुर्य पुन्हा तळपू लागला
अन वार्‍याच्या एका लहरी सोबत
मी पुन्हा चालू लागले
एकलिच अनवाणी
माझ्या वाटेने
हरवलेली.......!