‘अस्तित्व’ आयोजित ‘कल्पना एक, आविष्कार अनेक’ या अभिनव एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत यंदा पुणे, मुंबई, कल्याण आणि ठाणे विभागातल्या एकांकिकेमध्ये विजेतेपदासाठी चुरस आहे. नाटककार रत्नाकर मतकरी यांनी सुचवलेल्या ‘काश! असं झालं असतं तर! ’ या कल्पनेवर आधारित सहा एकांकिकांची अंतिम फेरी शनिवारी, ३ ऑक्टोबरला दुपारी तीन वाजल्यापासून माटुंग्याच्या यशवंत नाटय़मंदिरमध्ये रंगणार आहे.
या स्पर्धेची प्रश्नथमिक फेरी २६ आणि २७ सप्टेंबरला पार पडली. प्रश्नथमिक फेरीत २४ संघांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी २१ एकांकिका सादर झाल्या. प्रश्नथमिक फेरीचे परीक्षण प्रदीप राणे आणि राजन पाटील यांनी केले. मराठी नाटय़वर्तुळात अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या स्पर्धेचे यंदाचे हे पुनरुजीवित स्वरूपातले सहावे वर्ष आहे. अंतिम फेरीत दाखल झालेल्या एकांकिकांमध्ये संहिता, पुणे या संस्थेने सादर केलेल्या ‘तथास्तू’ या धनंजय म्हसवड लिखित, मंदार देशपांडे दिग्दर्शित एकांकिकेत, जगण्यासाठी सर्वात गरजेचे काय आहे, याचा शोध घेत जगणाऱ्या माणसांना, ‘गरजा या अमर्यादित असतात’, हे साधे जीवनसत्य खेळकर पद्धतीने पटवून देण्यात आले आहे. अभिजित झुंझारराव दिग्दर्शित, डॉ. प्रशांत शेंबेकर लिखित ‘तात्कालीन सत्याचे वारकरी’ या एकांकिकेत गुन्हेगारी कथेच्या आधारे एका घटनेसंदर्भात दोन पैलूंच्या बदलत्या वेळ-काळामुळे घडणाऱ्या घटनांचा आलेख चक्रावून टाकणारा आहे.
आर्टीव्हीटीस, ठाणे या संस्थेने सादर केलेल्या सानिक लिखित आणि सचिन गावकर दिग्दर्शित ‘स्केच’ या एकांकिकेत शब्दांपलीकडे ‘कला’सुद्धा संवादाची भाषा असू शकते, ती समजून घेतली तर बदलत्या नात्यांना वेगळा आयाम देणे शक्य आहे, हे आई आणि मुलाच्या भावनाटय़ातून हळूवारपणे उलगडते. ‘डावा अंगठा असता तर.. ’ या सकस, मुंबई संस्थेने सादर केलेल्या संजय सावंत लिखित, सुमित पवार दिग्दर्शित एकांकिकेत द्रोणाचार्य आणि एकलव्याच्या कथेचा मॉडर्न हास्यस्फोटक अन्वयार्थ लावण्यात आला आहे. यवनिका थिएटरच्या दिनेश सिंग लिखित- दिग्दर्शित ‘भू.. भू.. ’मध्ये बालपणीच्या चुकांमुळे निर्माण झालेली अपराधीपणाची भावना तारुण्यात ठळकपणे सामोरी आल्यावर निर्माण होणारा ‘पण’.. अस्वस्थ करणारा आहे. थिएटरहोम्स निर्मित ‘वेळ-खेळ’ या डॉ. महेश आफळे लिखित, सिद्धार्थ साळवी दिग्दर्शित एकांकिकेत एका निर्जन बेटावर अडकलेल्या युगुलाच्या रूपकातून जगताना आपणच निर्माण केलेल्या प्रश्नांच्या गुंत्यात अडकून आपण किती वेळ वाया घालवणार आहोत, असा थेट प्रश्नच लेखकाने विचारला आहे.
कल्पनांचे हे विविध आविष्कार ३ ऑक्टोबरला माटुंग्याच्या यशवंत नाटय़मंदिरमध्ये रसिकांना पाहायला मिळतील. अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत ते पोहचावेत यासाठी ‘अस्तित्व’ने यंदा सवलतीच्या दरात तिकिटे उपलब्ध करून दिली आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क- ९८२१०४४८६२.