आर्थिक तंगी आणि सोनेरी कमानी

आजच बातमी वाचली की "मॅक्डोनल्ड्स" ("सोनेरी कमानी") आता आइसलंडमधून "आर्थिक तंगी मुळे बाहेर पडणार".  आइसलंड देशातील चलनाची किम्मत घसरल्यामुळे आणि बऱ्याच बॅंकांचे जवळजवळ दिवाळे वाजल्यामुळे देशातील आर्थिक परिस्थिती एक वर्षभर अनिश्चित आहे. त्यातच त्याना मॅक्डोनल्डसच्या धोरणामुळे स्थानिक कच्चा माल वापरण्यास बंदी होती. सहाजीकच हा सोनेरी कमानींचा सोनेरी विळखा अतीशय महागडा ठरला. आयात केलेले पदार्थ वापरून तयार केलेला "बर्गर" सगळ्या युरोपभरात महाग  आणि कोणालाच न परवडणारा ठरला (६.३६ डॉलर). परिणाम उघडच...... इतर बर्गर वाल्यांची चलती आणि जी मंडळी "मॅक्डोनल्डस" ("सोनेरी कमानी") चा धंदा चालवीत होती, त्यान्ची दुकाने (निदान तात्पुरती) बन्द! 

"मॅक्डोनल्डस" ("सोनेरी कमानी") ची धोरणे आजपर्यंत अनेक वेळा फसलेली आहेत. अगदी अशीच परिस्थिती इंडोनेशिआमध्ये (जिथे मी मागची १८ वर्षे आहे) जेव्हा साधारण १० वर्षापूर्वी उद्भवली, तेव्हा असे ऐकले होते की, "मॅक्डोनल्डस" ("सोनेरी कमानी") च्या स्थानीक मालकानी अमेरिकेतून "सल्ला मसलती" करिता येणाऱ्या लोकाना भेटण्याचे देखील टाळले आणि आपल्याच अखत्यारीत भराभर आयात केल्या जात असलेल्या कच्च्या मालाच्या जागी  (जो चलन घसरल्यामुळे महाग झाला) स्थानीक माल वापरून किमती वाढवण्याचे टाळले. जरी (तात्पुरती) "मॅक्डोनल्डस" ("सोनेरी कमानी") ची नाराजी झाली तरी धंदा तरी तरला!! जी मंडळी अमेरिकेतून "सल्ला मसलती" करिता पाठवली जातात त्याना वेगवेगळ्या मार्गांचा अभ्यास करून काहीही निर्णय घ्यायला येव्हढा वेळ लागतो की तोपर्यंत धंदा बंद होण्याची वेळ येते. असेच काहीसे आइसलंडमध्ये झाले असावे!

आर्थिक वादळे ही आता नेहमीचीच होवू लागली आहेत. त्याना पटकन तोंड देणे जर जमले नाही तर अनेक धंदे बंद होणे अनिवार्य!