बातम्या!!

(सर्व प्रथम मनोगतींची माफी मागतो. अनवधनाने मी आधी लिहीलेलाच लेख परत लिहीला आहे. पण ह्या बातम्या ह्या माझ्या आधीच्या बातम्यांची सुधारीत आवृती मानण्यास हरकत नसावी. हा पण लेख आवडेल अशी आशा करतो. )

ढ्यँट ट्याऽऽ ड्याऽऽऽ डिं टींगऽऽ डिं टींगऽऽ डिं टींगऽऽ डिंगऽऽऽ! (हे सुरवातीचे संगीत होते)

नमस्कार!

परवापर्यंत ह्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे! रात्रीचे साडे दीड वाजले आहेत. मी स्टुडिओ बातमीदार मो. ती. भूभू. तर नजर टाकूया परवाच्या काही शिळ्या बातम्यांवर!!

आमचे स्टार रिपोर्टर चीं. चीं. उंदीरे यांनी सर्वाधिक व्यस्त व गरम अश्या स्वयंपाकघर ह्या नगरात जीवावर उदार होऊन अतिशय महत्त्वाचे चावे (बाईटस) मिळवले आहेत. त्यांच्याबरोबर (खरं म्हणजे मागे) आमच्या चाणाक्ष कॅमेरा(वू)मन म. नी. माऊ देखील होत्या. तर वेध घेऊया स्वयंपाकघरनगरातील काही बातम्यांचा!

ओट्याखालील तिसऱ्या कप्प्यात एका गुळाच्या खड्यावरून बहुसंख्य मुंग्या व अल्पसंख्य समाजातील काही डोंगळे ह्यांच्यात मारामारी झाली. ह्यात २०० मुंग्या व १०० डोंगळे ठार झाले. परिस्थीतीचा फायदा घेत काही परप्रांतीय झुरळांनी तो गुळाचा खडा पळविण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये २ झुरळे मुंग्याच्या हल्ल्यात जबर जखमी झाली. परिस्थिती जास्त चिघळू नये म्हणून गृह व सुव्यवस्था मंत्री झाडूराव ह्यांनी हस्तक्षेप करून दंगल ठिकाणी असलेल्या मुंग्या, डोंगळे व झुरळांना तडीपारीची नोटीस बजावली आहे. तसेच ह्या सर्व समाजातील समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांना नगराबाहेरील कचराकुंडी येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

कांदेनवमीच्या मुहूर्तावर आज भजीसोहळा आयोजीत करण्यात आला होता. ह्या सोहळ्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे आलेल्या १० कांद्यांचा बळी देण्यात आला. प्रख्यात कसाई श्री. चा. कू. धारदार ह्यांना बळी देण्याच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पाचारण करण्यात आले होते. आनंदाने धूमधडाक्यात साजऱ्या केलेल्या ह्या सोहळ्याने उपस्थितांना आपले आनंदाश्रू अनावर झाले होते.

आपली सासू सौ. लाटणबाईं यांच्या भयंकर जाचाला कंटाळून सौ. पुरीबाई यांनी उकळत्या तेलात उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून त्यांचे पती श्री. झारेराव यांनी त्यांना बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले. पण तेलात १००% भाजल्यामुळे पुरीबाईंचे पूर्णं अंग सुजले आहे. उपचारार्थ त्यांच्यावर गार श्रीखंडाचा लेप लावण्यात आला आहे.

नगरात आलेल्या काही मानवजातीच्या परदेशी पाहुण्यांना लक्ष्य करून मिरची व लसूण ह्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी अतिशय गरम तेलाचा वापर करीत मोठ्याप्रमाणावर धूर व खाट ह्या वायूंची गळती घडवून आणली. मुख्यमंत्र्यांनी वेळीच सर्व बाह्यझोत पंखे चालू करून पाहुण्यांना
त्रास होणार नाही ह्याची काळजी घेतली.

ह्याबरोबरच परवाच्या शिळ्या बातम्या संपल्या. परत परवा भेटू शिळ्या घडामोडींसह!! तोपर्यंत नमस्कार!!

(ह्या सर्व खटाटोपात आमच्या बातमीदारांनी ह्या नगरात जो काही गोंधळ घातला तो मनोगतींनी कल्पावा)