'कुसुमताई चौधरी महिला कल्याणी' ह्या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने १९ व २० डिसेंवर २००९ रोजी कोल्हापूर येथे केशवराव भोसले नाट्यगृहात मराठी स्त्री-साहित्यिकांचे तिसरे संमेलन आयोजिले केले जाणार आहे. संमेलनाचा विषय आहे 'मराठी स्त्री आत्मकथने' आणि संमेलनाचे शीर्षक आहे - 'कुसुमांजली निजखूण'. मा. डॉ. माया पंडित, कुलगुरू, सेंट्रल युनी. ऑफ इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस, हैद्राबाद ह्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवतील. तसेच अनेक मान्यवर, नवोदित आत्मकथनकार, इतरही साहित्यिक महिला व साहित्यप्रेमींची उपस्थिती या कार्यक्रमास लाभेल, अशी अपेक्षा आहे.
यापूर्वी २००५ मध्ये जळगाव येथे 'कुसुमांजली काव्योत्सव' आणि २००७ मध्ये औरंगाबाद येथे 'कुसुमांजली स्त्री-कथी' ह्या दोन महिला साहित्य संमेलनांचे यशस्वी आयोजन महिला कल्याणी संस्थेने केले. विशिष्ट साहित्यप्रकार घेऊन त्याचा विविधांगी उहापोह व्हावा अशा हेतूने ह्या संमेलनांचे आयोजन केले गेले व त्यानिमित्ताने साहित्यिक महिलांचे मोठ्या प्रमाणावर एकत्रित येणे ही साहित्यप्रेमी जनांसाठी पर्वणी ठरली आहे.
'संपूर्ण विश्व हेच घर' अशी संकल्पना मांडणाऱ्या एकविसाव्या शतकाच्या जडण-घडणीत पुरुषांबरोबरच महिला दारिद्र्य निरक्षरता, अंधश्रद्धा, स्त्री-भ्रूण हत्या, शारीरिक-मानसिक अत्याचार अशा अनेक समस्यांना तोंड देत जगण्याची धडपड करताना दिसत आहेत. प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत जगता-जगता त्या परिस्थितीला अनुकूल बनवण्याची जिद्द स्त्रियांमध्ये अधिक असते असा विश्वास आम्हा महिला कल्याणीच्या कार्यक्रत्यांना वाटतो. मात्र यासाठी स्त्रियांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टीने, आपली क्षमता जाणून घेऊन प्रत्येक स्त्रीला आपले स्वत:चे अवकाश उभारता यावे ह्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न आवश्यक आहेत. महिला कल्याणी संस्था अशा प्रकारचे उपक्रम आयोजण्यात नेहेमीच तत्पर राहिली आहे. बचत गट, कौटुंबिक समस्या, समाधान केंद्रे, महिलांच्या कार्यशाळा, उद्योजक मेळावे असे अनेक उपक्रम संस्था यशस्वीपणे राबवत आहे.
महिलांचे साहित्य संमेलन हा केवळ साहित्यिक उपक्रम न राहता, त्यातून समाजप्रबोधनाचे, महिला शक्ती एकवटण्याचे कार्य होत राहावे हा व्यापक हेतू ह्या संयोजनामागे आहे.
१९ व २० डिसेंबर २००९ रोजी होणाऱ्या 'कुसुमांजली निजखूण' साहित्य संमेलनातील कार्यक्रम खालील प्रमाणे असतील:
• परिसंवाद –
1. मराठी स्त्री आत्मकथनातील आत्मभान आणि विश्वभान
2. मराठी स्त्री आत्मकथनातील विविध प्रवाह : एक चिंतन
• दृक-श्राव्य सादरीकरण (Power-point Presentation)
मराठी स्त्री आत्मकथनांविषयीचा धावता आढावा
• आत्मपर मनोगत
स्त्री-विकास चळवळीचे महत्वाचे अंग – बचतगटातील स्त्रिया आणि पंचायतराजच्या माध्यामातून राजकारणात सक्रिय होणाऱ्या स्त्रियांची आत्मपर मनोगते
• अभिवाचन व नाट्यमय सादरीकरण
हयात नसलेल्या परंतु ज्यांची आत्मकथने मैलाचे दगड मानली जावीत अशा आत्मकथनपर लेखिकांच्या आत्मकथनातील महत्वपूर्ण भागाचे आंशिक अभिवाचन व नाट्यमय सादरीकरण
• निवडक आत्मकथनकार लेखिकांची मनोगते व मुलाखती
१. काही गाजलेल्या आत्मकथनकार लेखिकांची मनोगते
२. काही गाजलेल्या आत्मकथनकार लेखिकांच्या मुलाखती
स्मरणिकेचे प्रकाशन
आत्मकथन हा साहित्यप्रकार आणि त्या अनुषंगाने मराठीतील महिला आत्मकथनकारांविषयी विविधांगाने येणारे लिखाण स्मरणिकेत समाविष्ट असेल.
****
वरील माहितीचा स्रोत 'कुसुमताई चौधरी महिला कल्याणी' संस्थेच्या मानद सचिव स्नेहजा रूपवते आहेत.
या संदर्भात मनोगत सदस्यांना व वाचकांना विनंती आहे की आपल्यापैकी किंवा आपल्या माहितीत कोणी आत्मकथनकार महिला असतील तर कृपया पुस्तकाचे नाव, लेखिकेचे नाव, माहिती / संपर्कासाठी पत्ता इ. व्य. नि. ने कळवावा म्हणजे त्यांच्यांशी संपर्क साधणे शक्य होईल.