तू नव्हतीस

काल रातराणीला फिकटच गंध होता
तू नव्हतीस इथे अन निस्तेज चंद्र होता

मी मोजले मनात क्षण स्तब्ध थांबलेले
क्षणभर सांगुन मजला, युगभर लांबलेले
मग आला थंड वारा, पण तोही मंद होता
तू नव्हतीस इथे अन निस्तेज चंद्र होता

जरी सांडले आभाळी, अस्ताव्यस्त तारे
तरी स्वागतास तुझ्या, भासती सज्ज सारे
ओल्या पापण्यांच्याखाली निर्झर अखंड होता
तू नव्हतीस इथे अन निस्तेज चंद्र होता

परत सांगते व्यथेला, प्रत्येक पर्ण वाळलेले
दिसते मलूल तरू वर, प्रत्येक पुष्प माळलेले
तुझे परतणे उशीरा, हा प्रकार निंद्य होता
तू नव्हतीस इथे अन निस्तेज चंद्र होता

नजरेत फक्त माझ्या, मिलनाची आस होती
तुझ्यासाठीच मांडलेली प्रेमाची रास होती
आठवात बुडूनी राहणे, हा एक छंद होता
तू नव्हतीस इथे अन निस्तेज चंद्र होता