वेदांतपर रामायण

रामरक्षास्तोत्र हे आबालवृद्धांच्या परिचयाचे एक स्तोत्र आहे. घरोघरी आणि विशेषतः लहान मुलांनी हे स्तोत्र म्हणावे असा प्रघात आहे. या स्तोत्र पठनाने अशुभ बाधा दूर होतात व संकट निवारण होते असा समज आहे. हे स्तोत्र संस्कृतात असले तरी म्हणण्यास सुलभ आहे. या स्तोत्रात रामनामाने आपल्या शरीराचे मस्तकापासून पायापर्यंत सर्व अवयवांचे रक्षण करावे अशी प्रार्थन केलेली आहे व त्या रामनामामध्ये रघुकुलात रामांनी अवतार घेतल्यापासून रावणवधानंतर विभिषणाला राज्य दिले, येथपर्यंतच्या सर्व मुख्य कथा अनुक्रमाने साधल्या आहेत हा एक विशेष आहे.

प्रभू रामचंद्रांचा अयोध्येपासूनचा प्रवास हे एक अध्यात्मिक व वेदांतपर रुपक आहे. हा एक अध्यात्मिक प्रवास आहे. परमार्थमार्गात साधकांना व उपासकांना मार्गदर्शक असा आहे. प्रभू रामचंद्रांना संबोधित करताना "वेदान्त वेद्यः" असे म्हटले आहे. "वेदांतवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः" असे रामरक्षास्तोत्रात वर्णन आहे. प्रभू रामचंद्र वेदांतशास्त्राने ज्ञेय, वेद्य आहेत म्हणजेच वेदांताच्या ज्ञानानेच त्यांचा बोध होणारा आहे. वेदांताच्या आधारे राम व रामचरित कसे आहे ते पाहू.

दहा इंद्रियरुपी रथात राहणारा जो देही तोच वस्तुतः राजा दशरथ असून बुद्धि ही त्याची प्रिया कौसल्या होय. त्या युग्मान्वे ठिकाणी आत्माराम प्रकट झाला. तो स्वानुभूतीरुपी सीतेला वरून तिच्यासह निजानंदात निमग्न असता दैवयोगाने संसाररुपी दंडकारण्यात रावण नावाचा अहंकार प्राप्त झाला. हा राजसाहंकार होय. या राज साहंकाररुपी रावणाने खूप प्रयत्न करून स्वानुभूतीरुपी सीतेचे अपहरण केले. श्रीरामपरात्मा असतानाही  स्वानुभूतीच्या वियोगामुळे दीन दशेला प्राप्त होऊन दुःखी झाला. तिच्या विरहाने आतुर होऊन शोक करू लागला. तो भ्रमण करीत असता विवेकरुपी हनुमंताशी त्याचा संबंध जुळला. या हनुमंताने स्वानुभूतीरुपी सीतेच्या स्थितीची वार्ता आत्मारामाला सांगीतली.

नंतर विवेकरुपी हनुमान व सद् वृत्तीरुपी वानरसैन्य यांच्या समवेत उत्कट साधनरुपी पाषाणांचा सेतू संसार समुद्रावर उभारून  तो समुद्र आत्मारामाने उल्लंघन केला. नंतर प्रदीप्त ज्ञानाग्नीने उपनिषदरुपी महास्त्राने सूक्ष्म देहरुपी लंकेला जाळून युद्धात सहस्त्रावधि कामक्रोधरुपी राक्षसांचा त्याने संहार केला. सात्त्विक अहंकाररुपी विभीषणाच्या सहाय्याने आत्मारामाने कुंभकर्णरुपी नामसाहंकार व रावणरुपी राजसाहंकार यांना ठार केले. नंतर स्वानुभूतीरुपी सीतेला प्राप्त करून घेऊन आत्मारामाने स्वरुपसाम्राज्यावर अभिषिक्त होऊन तो स्वानुभूतीरुपी सीतेसह निजानंदात निमग्न झाला.

_नारायण भु. भालेराव