स्पर्श - एक वरदान

स्पर्श म्हणजे वेदनेला लाभलेलं संवेदनशील वरदान, नियतीचा कृपाप्रसाद - हळुवार तितकाच मुलायम, हृदय हेलावणारा सूक्ष्म तरंग - जणू मोरपिशी. श्वासांना गंधित करणारा. नाजूक बोटांना संवेदित करणारा, जाणीवा पुलकित करणारा, भावतरंग उमटविणारा, ओठांची स्पंदने जागविणारा, नेत्रांना सुखाविणारा, स्वर्गीय सुखाचा आनंद देणारा. स्पर्श एक अनुभूती आहे, एक आविष्कार आहे. स्पर्श जीवनदायी आजीवन संजीवनी आहे. स्पर्श एक मानवी मनाची भूक आहे. मूलभूत गरज आहे. मायेचा स्पर्श, निरागस बालकाचा स्पर्श, प्रेमाचा स्पर्श, शृंगारिक स्पर्श, हळुवार स्पर्श, मंद वाऱ्याच्या झुळुकतेचा स्पर्श, गंधित स्पर्श म्हणजे एक भावस्पर्शी अनुभूती आहे.

स्पर्श म्हणजे एक अबोल आविष्कार, ती एक भावना आहे. जाणीवांची स्पंदने उकलून दाखविणारी ती एक वेदना आहे. स्पर्शत्व हा एक आध्यात्मिक स्रोत आहे. मानवी मनाला पडलेलं एक स्वप्न आहे. स्पर्श म्हणजे नितळ अंगकांती जणू दुधावरची साय. वाणीला शब्दांचा स्पर्श, नेत्रांना अश्रूंचा स्पर्श, ओठांना अधीरतेचा अमृतमय स्पर्श, मातृत्वाला वात्सल्याचा स्पर्श. स्पर्श म्हणजे एक आध्यात्मिक ऊर्जा. स्पर्श प्रेरणेचा अंतःस्रोत, एक निसर्गदत्त संजीवनी, मुलायम सौंदर्याचा आविष्कार, स्पर्श भावभावनांचा अंतरंग, हृदय हेलावणार तरंग. स्पर्श म्हणजे प्रणयाचा प्राणबिंदू, अद्वैताचा केंद्रबिंदू. स्पर्श म्हणजे ललाटीची विभूती. स्पर्श म्हणजे शरीराला लाभलेलं वरदान नि मनाला मिळालेलं योगदान. स्पर्श म्हणजे सिद्धयोगी संजीवनी. स्पर्श म्हणजे अंकुरित अभिनिवेश, भावसमाधी योगदान. स्पर्शानं गंधित व्हावं, मनानं सुगंधित व्हावं.

स्पर्श ही संवादी परिभाषा, नैसर्गिक प्रक्रिया, स्पर्श चैतन्याची बोलीभाषा. स्पर्श म्हणजे भावनांची अभिव्यक्ती, स्पंदनांची ऊर्जाशक्ती. स्पर्श म्हणजे भावस्पर्शी हृदयाची ओढ, जणू हळुवार जपलेला क्षण सर्वांना पुलकित करणारा, नेत्रांना सुखाविणारा. स्पर्श म्हणजे चैतन्याचा दाह, स्पर्श म्हणजे मायेची उबदार शाल, दरवळणारा सुगंध, सुगंधी परिमल, इंद्रियांची परिभाषा. स्पर्श म्हणजे गालावरून ओघळणारा दंवबिंदू, शहारणारं अनुकंपित वास्तव. स्पर्शात अंगभूत शक्ती आहे. स्पर्श पुनीत असतो, पतितांना पावन करतो. स्पर्शात वात्सल्य आहे, पदलालित्य आहे, पदन्यास आहे. स्पर्शात हुंकार आहे, नाद आहे, नादमधुरता आहे, गेयता आहे, प्रेम आहे, प्रणय आहे, मांगल्य आहे, साधनशुचिता आहे. स्पर्श सर्वस्पर्शी, भावस्पर्शी नि सर्वव्यापी असतो. व्यापकता त्याची प्रकृती आहे. स्पर्शात आर्तता, आर्जवात जाणवते. स्पर्श म्हणजे जननी, वात्सल्याची परिभाषा, जीवनाचं परिमाण.

स्पर्श ही इंद्रियजन्य अवस्था आहे. अनाकलनीय स्थिती आहे, गूढ आहे, ज्या योगे चैतन्याचा साक्षात्कार घडतो. झाडाचे पान सुद्धा झुळुकेच्या स्पर्शाने डोलू लगते. सूर्याच्या प्रकाश स्पर्शानं धरती प्रकाशमान होते, चंद्राच्या शीतल प्रकाशानं निरभ्र आकाश उजळून निघतं. स्पर्श म्हणजे अचेतनाशी साधलेला संवादी सूर, आविष्कार. स्पर्श एक अतींद्रिय, अतर्क्य शक्ती आहे. दृष्टी नसलेलं अंधत्व स्पर्शानं जागृत होतं.

स्पर्श म्हणजे ऊर्जा, आध्यात्मिक स्रोत जो फक्त साधुसंतांच्या, मात्यापित्यांच्या चरणस्पर्शाने आशिर्वचे पुनीत होतो. पंचमहाभूतांतून निर्माण झालेला अनादि, अनंत, चिरंतनातून सातत्याने वाहणारा,   अंतःस्फूर्तीतून प्रकटणारा नवरसात्मक आविष्काराचा, म्हणजे, हास्य, कारुण्य, शृंगार, रुद्र, बीभत्स, शौर्य, क्रौर्य आदिंचा. स्पर्श म्हणजे सिद्धहस्त योगी. दुःखितांचे अश्रू दूर करण्यासाठी, जेव्हा शब्द मूक होतात, थिजतात, तेव्हा स्पर्श बोलून जातो, बोलका होतो. आईच्या ममतेचा स्पर्श पाठीवर फिरल्यावर त्याची ऊब कपड्यापेक्षाही अधिक मौल्यवान ठरते. प्रत्येक देवळातील मूर्तीचा चरणस्पर्श मस्तकाने घेऊन नतमस्तक झाल्याने शरीरात संजीवनी मंत्र खेळला जातो. योगी सिद्धपुरुषाने मस्तकावर ठेवलेल्या हस्तस्पर्शाने सहस्रदल कमले तपश्चर्येशिवाय आपोआप उमलतात व भावसमाधी उमलून जाते अन परमोच्च आनंदाच्या अत्युच्च क्षणाची अनुभूती येते. असा हा स्पर्श म्हणजे जीवसृष्टीला लाभलेलं वरदान आहे.

--- शशिकांत द. टोपकर