मणीकाका - चिंगू - एक नाते

झोपडीच्या विश्वासघातकी छतातून किरणे आत येऊन पापण्यांना बोचायला लागली तसा मणी जागा झाला. छताकडे पाहून त्याने मनातल्या मनात एक शिवी हासडली. शिवी मनातच हासडण्याची सवय फार लहानपणापासूनचीच होती. अगदी आई बापांनी सात वर्षाचा असताना रस्त्यावर भीक मागायला शिकवले तेव्हापासून ' कितीही आर्जवे करूनही लोक गाडीची काचही खाली करत नाहीत हे पाहूनही शिवी द्यायची नाही' हे मणी शिकला होता. पण त्या जुन्या गोष्टी झाल्या. पन्नास वर्षापुर्वीच्या! मणी आता चांगला हाडकलेला म्हातारा झालेला होता. सूर्याच्या किरणांना नेहमीच मणीच्या पापण्यांना बोचल्यावर त्याच्या जिभेकडून बोचून घ्यायची सवय लागलेली होती.

उठताना डोके गरगरले. कसेबसे भिंतीला धरत मणी उभा राहिला तेव्हा सर्वांग दुखत होते. मग त्याची नजर झोपडीतल्या एका कोपऱ्यात गेली. ऍल्युमिनियमच्या फॉईलमध्ये काही अन प्लॅस्टिकच्या पिशवीत काही असे बरेच अन्न काल न खाताच राहिले होते. त्याने पहिल्यांदा चूळ थुंकली. तोंडावर सपके मारले. तोंडात आता चूळ थुंकण्याचे पाणी, कालची देशी, कालच खाल्लेले एक उकडलेले अंडे अन तंबाखू अशी मिश्र चव आल्यावर मग तो पुन्हा वैतागून चुळा थुंकू लागला. समाधान झाल्यावर त्या अन्नाच्या दिशेने पाय टाकताना पाय उंदरावर पडला अन पुन्हा उंदराला ऐकू जाणार नाही अशी शिवी मणीने दिली.

त्या पिशव्यांमध्ये पनीर राजवाडी, चिकन शोले कबाब, रशियन सॅलड, रायता असे अनेक पदार्थ होते. मणीला त्या पदार्थांची नावे माहीत नव्हती. पण चवी रोजच्याच होत्या. त्याने आज त्या सगळ्या पिशव्या झोपडीच्या मागच्या वाहत्या गटारात फेकून दिल्या आणि आज मात्र एक मनापासून शिवी हासडली. नंतर पश्चात्तापाने तो रडू लागला. थोड्या वेळाने आत येऊन त्याने अर्धवट आंघोळ उरकली अन पुढच्या बाजूची हातगाडी घेऊन बाहेर पडायचे ठरवले.

हातगाडी ओढणे हा डाव्या हातचा खेळ होता. पण आज हातगाडी हलवणेही शक्य होत नव्हते. ऊनही वर आले होते. पण हातावर पोट असल्यामुळे मणीने ती कशीबशी दारातून न्यायचे ठरवले. मात्र गाडी हालेना! शेवटी मणीच्या अंगातून वेदना यायला लागल्यावर तो हताश होऊन झोपडीत येऊन बसला. झोपडीतूनच त्याने झोपडीला पडलेल्या अनेक ठिगळांपैकी एका ठिगळातून नीलायम बंगल्याकडे पाहिले. रात्री हाच बंगला निळ्या दिव्यांमुळे मंद प्रकाशात किती सुंदर दिसतो. अवाढव्य बंगला! इनामदार कुटुंबिय तर बंगल्यापेक्षाही जास्त राजेशाही दिसतात. गर्भश्रीमंत!

बंगल्याचे दार आज बंद होते. मणीकाका अशी हाक आज ऐकू येणार नव्हती. दोन वर्षांचा चिंगू दुडदुड धावत बंगल्याबाहेरील रस्त्यावर असलेल्या मणीकाकाच्या हातगाडीवरील गोळी मागायला आज येणार नव्हता.

चिंगूला मणीकाका ही व्यक्ती आपल्यासारखीच एक वाटायची. सारखा हसतो, सारखा गोळ्या घेऊन बसलेला असतो, आपण गाडी-गाडी खेळतो तसा हाही खेळतो. गट्टी जमायला दोन दिवस पुरेसे होते. हल्ली हल्ली तर अशी वेळ आली होती की चिंगू मणीकाकाच्या गाडीवरच बराच वेळ बसायचा. मात्र इनामदारांनी मणीला सांगून ठेवलेले होते. चिंगूला दिवसातून फक्त एकच गोळी द्यायची. मणीकडे चिंगू सारखीच गोळी मागायचा. पण मणी त्याला 'हे औषध आहे, औषध आहे' असे सांगून एकाच गोळीवर 'न रडता' बसवून ठेवू शकायचा. मणीचे हे कौशल्य पाहून चिंगूची आई तर हल्ली बिनदिक्कतपणे चिंगूला मणीकाकाकडे ठेवून जायची. स्वतःच!

चिंगू झाल्यापासून एकंदरच मणीचे दिवस बदलले होते. त्यात चिंगू बराच वेळ मणीकडे बसतो व मणीही प्रेमाने करतो हे पाहून इनामदारांकडून अप्रत्यक्षपणे मणीला अनेक लाभ व्हायला लागले. कधी जुने कपडे, रोजच्या जेवणातले उरलेले, सणासुदीला बक्षीस, कधी थोडी टीप तर कधी काही कामेही सांगीतली जायला लागली. आज गाडी पुसून ठेव, उद्या भाजी घेऊन ये! त्याचे वेगळे पैसे मिळायला लागले. मणीच्या आयुष्यात आता घरगुती सुख वाट्याला यायला लागले होते. मणीला चिंगूशिवाय करमायचेच नाही. अंधार पडल्यावर चिंगूला आईबरोबर पाठवून देताना चिंगू रडायचाच, पण मणीलाही वाईट वाटायचे.

मणीच्या गाडीवर गोळ्या, चिक्की, बिस्किटे, सर्वसाधारण माणसांना लागणाऱ्या सिगारेटी, विड्या, तंबाखू व बडीशेप मिळायची. रस्त्यावर फारशी वर्दळ नसली तरी दिवसाला साधारण साठ ते सत्तर रुपये सुटायचेच. मग एकदा चिंगू घरी गेला की मणी देशी टाकून झोपडीत यायचा. 
खरे तर तो येताना देशीच्या गुत्त्याच्या बाजूलाच मिळणारी एक दोन अंडी व थोडे खारे दाणे खाऊन यायचा. पण त्याला येताना पाहून चिंगूची आजी
आणखीन त्याला घरातले उरलेले द्यायची. मणीच्या या व्यसनाचा इनामदारांना फारसा पत्ता नसण्याचे कारण मणी जोरात बडबडायचा नाही. चिंगुच्या आजीपासून चार हातावर उभा राहून त्यांनी खाली ठेवलेले अन्न तो घेऊन जायचा.

आता पोटभर दारू प्यायलावर अन तोंडभर अंडे खाल्ल्यावर पुन्हा काय खाणार? मग मणी त्या जेवणाला उद्याच्या नाश्त्यासाठी जपायचा.

काल चिंगूचा वाढदिवस झाला. इनामदारांच्या बंगल्यात बरीच गर्दी झाली होती. सकाळपासूनच पंधरा वीस माणसे आलेली होती. जवळची! दुपारी शंभर एक लोक जेवले. बुफे ठेवलेला होता. जेवणे झाल्यावर बरेच पदार्थ काही प्रमाणात मणीलाही दिले गेले. तो ते झोपडीत ठेवून पुन्हा गाडीवर आला. चिंगूला आज असे सजवले होते की तो रोजच्यापेक्षा कितीतरी अधिकच गोंडस दिसत होता. पुन्हा संध्याकाळी इनामदारांच्या व्यवसायातील जवळपास पंचवीस माणसे येणार होती. चिंगूच्या घरातली एक खोली तर भेटींनीच सजलेली होती. बंगल्याला संध्याकाळी रोषणाई करणार होते. चिंगू वेडा सारखा 'मणीकाकाकडे जायचे' म्हणून हट्ट करत होता. शेवटी दुपारची झोपाझोप झाल्यावर कुठे दोघांना एकमेकाला भेटायची संधी मिळाली. चिंगूच्या आईने मणीला 'धरा याला, कधीपासून मणीकाका मणीकाका करतोय' असे म्हणत चिंगूला त्याच्याकडे सोपवले. मणीने चिंगूला पटकन जवळ घेतले. दोघांचीही कळी खुलली. चिंगूला वाढदिवस या प्रकाराबद्दल फारसे आकर्षण नव्हते. त्याला फक्त गाडीवर बसून मणीकाकाकडून 'हम्मा, भूभू' पाहणे अन एखादी गोळी खाणे यातच इंटरेस्ट होता.

आज मणीने चिंगूला नेहमीप्रमाणे एक गोळी दिली. चिंगू जवळपास पंधरा मिनिटे बसला होता तोवरच कुणीतरी बोलवायला आले. पुन्हा रडारड झाली. जाताना वाढदिवस म्हणून मणीने त्याला आणखीन एक गोळी दिली. चिंगूच्या दृष्टिने ती सुखाची पर्वणी होती.

दुपारी काही इतर नातेवाईक आले. भेटींबरोबरच कुणी केक आणला होता तर कुणी कॅडबरीज! आज चिंगूची नुसती चंगळ चालली होती.

सगळे उत्साहात असतानाच चिंगूने सर्वांच्या नकळत एक 'आतमध्ये बदाम असलेले' चॉकलेट गिळले. नेमका बदाम घशात अडकला. चिंगूचा जीव घाबरा झाला. कुणालातरी ते कळल्यावर सर्व इनामदार कुटुंबीय धावले. कुणी बोट घालून अडकलेले काढायचा प्रयत्न केला तर कुणी पाणी पाजायचा. चिंगूचा आवाजच फुटत नव्हता. तो नुसताच घाबरा झालेला होता. धावत धावत सगळे डॉक्टरकडे गेले. तेथे प्रयत्न चालू झाले. इकडे मणीला काय गडबड झाली हे कळले नाही.
पण चिंगूला काहीतरी झाले असे समजून तोही चौकशी करत घाईघाईत डॉक्टरकडे पोचला. आत्तापर्यंत चिंगूची सुटका झालेली होती. चिंगूची आई आता
रडायची थांबलेली होती. कुणीतरी तेवढ्यात म्हणाले, 'या माणसाने मगाशी चिंगूला काहीतरी घातले' . हे वाक्य ऐकून जमा झालेल्यातील काहींनी मणीला दवाखान्याबाहेर नेऊन चोप दिला. चिंगूच्या आईचाही चक्क विश्वास बसलेला होता. मणी ओरडत होता. पण कुणी ऐकत नव्हते. जवळपास दहा मिनिटे चोप दिल्यावर मणीला ते चौकीत घेऊन गेले. माणूस गरीब आहे अन तक्रार इनामदारांची आहे हे पाहून तेथेही त्याला चोप मिळाला. एवढ्यात खुद्द इनामदार, जे काही कारणाने बाहेर गेलेले होते, हा प्रकार ऐकून प्रथम दवाखान्यात व नंतर चौकीवर आले. त्यांनी जाब विचारल्यावर मणीने आज दोन गोळ्या दिल्या हे रडत रडत सांगीतले. पुन्हा त्याला तेथे चोप मिळाला. मात्र इनामदारांनी आजवरचे चिंगूवर त्याने केलेले प्रेम आठवून तक्रार नोंदवण्याचा विचार रद्द केला. चिरीमिरी मात्र द्यावीच लागली. सगळे घरी आले.

मणी आज थेट घरी आला नाही. तो गेला देशीच्या गुत्त्यावर! तेथे खिशात होते नव्हते तेवढे पैसे दारूत घातले. सगळे अंग दुखत होते. पण त्याहून मोठी वेदना होती की आता चिंगूला आपल्याकडे सोडणार नाहीत. भेलकांडत तो झोपडीत आला तेव्हा इनामदारांच्या बंगल्यात जल्लोष चाललेला होता. चिंगूचा केक कापून झालेला होता. आता म्युझिकवर मुले डान्स करत होती. चिंगूही नाचत होता. मोठी माणसे ड्रिंक्स घेत होती. चिंगूची आई दुपारचा प्रकार इतर बायकांना सांगत होती. मणीने ते पाहिले अन तो पटकन झोपडीत जाऊन लपून बसला. न जाणो. कुणालातरी दिसायचो अन परत मारहाण व्हायची. चढलेल्या देशीने अन पडलेल्या माराने ग्लानी आली ती एकदम सूर्याच्या किरणांनी पापण्यांना छेडल्यावरच जाग आली.

आत्तापर्यंत मणीच्या अनेक शिव्या मनातल्या मनात देऊन झाल्या होत्या. पण त्या इनामदार कुटुंबियांसाठी नव्हत्या. त्या होत्या आपल्या दुर्दैवाला दिलेल्या. त्याला एकदा वाटत होते की इनामदारांना जाऊन सांगावे की मी जी गोळी रोज देतो तीच गोळी दिली होती. तसेच, मी गोळी दिल्यानंतर बऱ्याच वेळाने चिंगूला त्रास झाला होता. पण त्याला आत जायची लाज वाटत होती. भीतीही वाटत होती.

मणीने आज गाडी लावण्याचा विचार सोडला. त्याने बाहेर जाऊन गाडीचे झाकण पुन्हा लावून टाकले. आत वळणार तोच...

"मणीकाका.... मणीकाका"

खिडकीतून चिंगूच्या हाका मणीला ऐकू आल्या. मणीने खिडकीकडे पाहिले. चिंगूची आई चिंगूचे अंग टॉवेलने पुसत होती. मणीकडे पाहून तिने खाडकन खिडकी लावून टाकली. चिंगूने भोकाड पसरलेले मणीला ऐकू आले.

मणीकाकाचे आक्रंदणारे मन चिंगूलाही कळले असेलच!

 एक नाते संपले होते.