मणी - कांचन योग

     नणंद - भावजयीचं नातं म्हणजे विळी-भोपळ्याचं नतं, दोघींनधून विस्तवही जातं नाही .. तुझं-माझं जमेना तुझ्या वाचून करमेना ... असंच काहीसं. नणंद-सासू  ह्या व्यक्तींच विशेषण खाष्ट ह्या शब्दापासूनच सुरू होतं आणि त्यात अनेक नकरात्मक विशेषणांचीच भर पडू शकते. पण नियमाला अपवाद हे असायचेच आणि त्याच उत्तम उदाहरण म्हणजे माझं न कांचनचं नातं.  आज नितीनजी बद्दल वर्तमानपत्रात रकानेच्या रकाने भर-भरून लिहिल्या जात आहे.  त्यांच्या ह्या यशात, ह्या प्रवासात बरोबरीने साथ देणारी माझी नणंद कांचन हिच्या विषयीचं माझं छोटसं मनोगत.

     कांचन पुर्वाश्रमीची कांचन तोतडे.  आमचं लहानसं कुटुंब.  कांचन, माझे पती किशोर व दीर अशोक.  कांचन बारावीत असतांनाच माझे सासरे कमलाकर तोतडेंच निधन झालं.  पदव्युत्तर प्रथम श्रेणीत पास झालेली कांचन १९८४ साली गडकऱ्यांच्या भऱ्यापुऱ्या  राबत्या घरात  सुखाने नांदत होती/लग्न होऊन गेली.  माझी न तिची ओझरती भेट झाली ती माझ्या दाखवण्याच्या कार्यक्रमात.  दुसऱ्यांदा भेट झाली ती गडकऱ्यांच्या वाड्यात सासु, आत्तेसासु, भाच्यांच्या सरबराईत गुंतलेली व्यस्त गृहिणी म्हणून. कांचनने लहान असूनही आमच्या लग्नाची जबाबदारी पुर्णपणे स्वीकारली व उत्तमरित्या पारही पाडली होती. माझे लग्न झाल्यावर आपल्या प्रथेप्रमाणे कांचनताई अशी हाक मारली.  कांचन म्हणाली, "मला ताई, बाई, वन्स नाही हं म्हणायचं. " हे तिने म्हटलं आणि क्षणात आमचं नणंद-भावजयीच नातं गळून पडलं.  मला खरा तिचासहवास मिळाला जेव्हां ती माझ्याकडे पाटण्याला आली तेव्हां. असं वाटलं माझी मैत्रीणंच माझ्याकडे आली. आम्ही नागपूरला आल्यावर जास्त जवळीक निर्माण झाली. सणावारी एकमेकांकडे जाणं नियमीत होत होतं. पुढे नितीनजी मंत्री झाले. पैसा व सत्ता आल्यानंतरही आमच्या नात्यात, मैत्रीत फरक पडला नाही हे विशेषत्वाने सांगावसं वाटतं. 

     तिच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. सासर-माहेरच्यांच करण्यात तिने खुपच समतोल राखला आहे. तिची प्राथमिकता तिचं घर, कुटुंब व तिची मुलं. येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या ह्या गडकऱ्यांच्या धबडग्याच्या घरात तिने आपल्या गाण्याच्या छंदालाही  वेळ दिला.   कोणताही पाहुणा कोणत्याही वेळेला वेळेला आला  तरी न जेवता जात नाही किंवा कोणताच याचक गडकऱ्यांच्या वाड्यातून विन्मुख जात नाही ह्याच श्रेय कांचनलाच जातं. पैशानी तर  ती मदत करतेच पण गरज पडली तर क ष्टाने मदत करण्यास  मागे पुढे पाहत नाही.  आणि विशेष म्हणजे एवढं सगळ करताना तिला मी कधी चिडलेली, त्रासलेली पाहिली नाही.

     खूप कष्टाने आपल्या आईने वाढवले ह्याची तिला पुरेपुर जाणीव आहे आणि हे ते  तिच्या वागण्या-बोलण्या व कृतीतून व्यक्त करत असते.   आज  हाच वारसा तिची मुलं निखील, सारंग व केतकी   पुढे चालवत आहे. नुकताच त्यांनी आपल्या आई-वडिलांचा लग्नाचा रौप्य महोत्सव आपल्या कुटुंबियासमवेत अत्यंत साधेपणाने साजरा केला.

     एका वाक्यात कांचनच वर्णन करायचं झाल्यास एक कर्तव्यदक्ष गृहिणी, आदर्श माता, सुविद्य पत्नी व सच्ची सामाजिक कार्यकर्ती असंच करता येईल.

     समस्त तोतडे परिवारा तर्फे गडकरी कुटुंबाच मनः पुर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा !           

ता. क. माझी मैत्रीण मनिषा तोतडेच्या मनोगताचं शब्दांकन मी केलंय.

हा लेख तरुण भारत नागपूर दि २६/१२ /०९ आकांक्षा मध्ये प्रकाशित