तुझ्या जन्माच्या आनंदालासुद्धा;
नांगराच्या फाळाच गालबोट लागलं;
रामाची वैदेही म्हणून जगताना;
शिवधनुष्य तुलाच पेलावं लागलं.
तुझ्या स्वयंवरातल्या शिवधनुष्याची;
ओढली प्रत्यंचा जेव्हा त्या राजकुमाराने;
तेव्हा 'हाच तो' म्हणून कौल दिला;
फुलाहून हलक्या झालेल्या तुझ्या मनाने.
महाराणी म्हणून अभिषिक्त होताना;
वनवासाचं नशिबं तुझ्या भाळी;
तुझं सुख; शील; आयुष्य;
होतं फक्त जगाच्या नियमांसाठी.
तुझा राम काहीच नाही बोलला;
प्रेम अन् व्यवहाराचा तराजू नाही तोलला;
खरंतर हे सगळे जुळवलेले योग;
अन् तुझ्या नशिबाचे भोग होते.
राम राम म्हणत अशोकवनात झुरताना;
नजर जमिनीवर रावणाशी बोलताना;
कसं द्रवलं नाही तुझ्या रामाच काळीज;
समाजासाठी तुझ्या शुद्धतेची खात्री मागताना.
कुठल्यातरी एक कवडीच्या परिटाने;
तुझी क्षणात परित्यक्त्या केली;
रामाची सीता म्हणून जगण्याच्या;
तुझ्या स्वप्नांची होळी केली.
जेव्हा केलं हद्दपार आयुष्यातून;
तुझ्याच रामाने तेव्हा;
सोडवायला आलेल्या लक्ष्मणानेही;
'वहिनी मला माफ कर' म्हणून पाठच फिरवली.
रानोमाळ भटकताना, पोटातला अंकुर;
तुला तुझ्या रामाची द्यायचा आठवण;
अश्रूही आटावेत अशा यातना भोगताना;
तुझ्यावर कोणीच केलं नव्हत प्रेम.
अयोध्येचा राजा तुझा राम;
पुरुषोत्तम होण्यासाठी 'नवरा' नाकारतं राहिला;
हातात पकडून लगाम अश्वमेधाचे;
'सगळ्यांना माफ करून सीते परत चल' म्हणाला.
मग विषण्णपणे तुझं भूतकाळ आठवणं;
डोळे भरून तुझ्या जुळ्यांना पाहणं;
आता उरलंच काय आपल्या आयुष्यात;
म्हणून स्वतःच्याच जगण्याला माफ करणं.
पण रामावरच्या विश्वासाच काय?
तो तर कुठेतरी अधांतरीच होता;
लवकुशांच्या समोर तुझी विटंबना नको;
म्हणून कदाचित तुझा नाईलाज होता.
अगं आजही तुझी कथा ऐकतो;
चार सुस्कारे सोडून फुले उधळतो;
पण तुझा त्याग शून्यच ठरतो;
कारण रामाच्या पायावर आम्ही डोके ठेवतो.