पाचू माणकाची भाजी

  • गाजरे पाव किलो, साले काढून, बारीक पातळ चिरून, फोडी करून
  • मटारचे दाणे पाव किलो
  • फोडणीचे साहित्य : तेल, मोहरी, हळद, हिरव्या मिरच्या, हिंग
  • चवीनुसार मीठ, थोडीशी साखर
  • आवडत असल्यास काजूचे पातळ काप
५ मिनिटे
तीन ते चार माणसांसाठी

प्रथम गाजराचे तुकडे, मटारचे दाणे वेगवेगळे मीठाच्या पाण्यात वाफवून घेणे (रंग टिकण्यासाठी). पाणी निथळून घेणे. कढई/ पॅनमध्ये तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट/ हिरव्या मिरच्यांची फोडणी करून त्यात वाफवलेल्या भाज्या घालणे. थोडा वेळ परतणे. आवडत असल्यास काजूचे काप घालणे. चवीसाठी मीठ, थोडी साखर घालणे. भाजी शिजल्यावर वरून कोथिंबीर घालून वाढणे. गरम गरम भाजी फुलका, ब्रेड बरोबर छान लागते.

काही जण ह्या भाजीत धणे-जिरे पूड सुद्धा घालतात. पण माझ्या मते त्यामुळे भाजीचा मूळ स्वाद हरवतो.

वाढताना जरा 'फॅन्सी' प्रकारे वाढायची असल्यास कोबीची पाने स्वच्छ धुवून फ्रीजमध्ये बर्फाच्या गार पाण्यात ठेवून द्यावीत म्हणजे त्यांना कडकपणा येऊन वाटीसारखा आकार येतो.
आता ह्या वाटीत भाजी घालून ती वाढावी, रंगसंगतीमुळे ही भाजी खूप आकर्षक दिसते. म्हणूनच माझी आजी तिला पाचू-माणकांची भाजी म्हणायची.

आजी, आई