सगुणा - एक दीर्घ कथा

देऊळगावराजा या स्थानकात समोर जी पहिली निघालेली एस. टी दिसली त्यात कसाबसा प्रवेश मिळवत गुणाक्का धाडकन एका सीटवर आदळली. परिणाम व्हायचा तोच झाला. त्या सीटवर बसलेल्या एका लेकुरवाळीने तिला चिडून जोरात ढकलले अन तोंडाचा पट्टा सुरू केला. पण गुणाक्काच्या चेहऱ्यावर व हातावर रक्ताचे थेंब पाहून ती चरकली अन गप्प बसली. गुणाक्काने तिच्याकडे क्षणात दुर्लक्ष करून जागेचा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र तितक्यात तिचा चेहरा कंडक्टरसकट बऱ्याच माणसांना दिसलेला होता. हे काहीतरी लफडे असणार हे कंडक्टरला कळून चुकले.

कं - ओ मावशी, कुठं जायचंय?
गुणा - गाडी कुठ चाललीय?
कं - नागपूर, तुम्हाला कुठं जायचंय?
गुणा - नागपूरलाच
कं - हे रक्त कसं आलं एवढं?
गुणा - पडल्ये मी घाईघाईत.
कं - कुठं?
गुणा - गाडी पकडायला येताना
कं - गाडी हितं पंधरा मिनिटं जेवायला थांबलीवती की?
गुणा - मी बोराटेवाडीतून आलीय, येताना उशीर झाला, धावले तर झाडात पाय अडकून पडल्ये.
कं - काय पोलीस बिलीसचं लफडं असलं तर चढायचं नाही हा?
गुणा - नाय नाय, कसलं लफडं?
कं - पैसे आहेत का? तिकिटाचे?
गुणा - किती तिकीट हाय?
कं - एकशे चव्वेचाळीस!
गुणा - हायेत!
कं - दवाखान्यात जाऊन या की? सव्वानऊला परत गाडीय नागपुरची!
गुणा - नाय, म्हातारा आजारी हाये, पोचायला हवं!
कं - बाकी घरचे कोण आले नाहीत काय?
गुणा - फुढं गेल्यात आधीच!

कंडक्टरला सध्या काहीच बोलता येत नव्हते. मात्र त्याला इतके कळून चुकले होते की गाडी नागपूरला चाललीय म्हणून बाई नागपूर म्हणतीय, गाडी पुण्याला चालली असती तर ती पुणे म्हणाली असती. त्याने तिची अवस्था पाहून तिला एका मागच्या सीटवर बसवले व तिकीट देऊन पुढे निघून गेला.

वेळ संध्याकाळी साडे सात, आठची होती. गुणाक्काला खड्ड्यातून भरधाव जाणाऱ्या गाडीच्या खिडकीतून देऊळगावराजा मागे पडताना दिसत होते. लांब कुठेतरी बोराटेवाडीतले दोन चार दिवे दिसल्याचा भास होत होता. गाडीतले लाईट बंद झाले अन गाडी मुख्य मार्गाला लागली तशी ती जरा स्थिरावली. पुढच्या सीटवरच्या एका म्हातारीने तिला प्यायला पाणी अन जवळचे एक मलम दिले. गुणाक्काला तेव्हा आपल्या जखमांची आठवण झाली. आता रक्त वाहत नव्हते. त्यामुळे जखमा बांधायची घाई नव्हती. पाणी प्यायल्यावर तिला आपल्याला कधीची तहान लागलेली होती याची जाणिव झाली. मागच्या खड्ड्यांमुळे सतत उडणाऱ्या व जखमांची आधीहून जास्त जाणीव करून देणाऱ्या सीटवर ती रेलून बसली. आता देऊळगावराजाही दिसेनासे झालेले होते. गार वाऱ्याबरोबर देऊळगावराजा अन बोराटेवाडीच्या आठवणी तिच्यापर्यंत पोचायला लागल्या.

बावीस वर्षांपुर्वी जालन्याजवळील एका गावातील सतरा वर्षाच्या सगुणाचा विवाह बोराटेवाडीच्या शंकरशी झाला तेव्हा सगुणा स्वर्गात पोचल्यासारखी वागत होती. स्वतःचे एकत्र कुटुंब पद्धतीचे घर असणारे स्थळ, तीन मोठे दीर, तीन जावा, पाच नातवंडे, सासू, शेतजमीन असे भरगच्च असलेले पाठबळ तिला मिळाले होते. विवाहामध्ये बापाने जमेल ते सगळे केले. सगळेच खुष होते. गावातून वरात निघाली तशी गावातील सगळीच घरे एका डोळ्यात पाणी अन एका डोळ्यात हसू घेऊन मागून निघाली. देऊळगावच्या एस. टी त बसताना सगुणा अन अख्खे गाव रडले होते. एस. टी त सगळे सासरचेच होते.

शंकरला अन तिला सगळ्यांनी कौतुकाने शेजारी बसवले होते. शंकरचे चावट पण लाडिक प्रश्न ऐकून सगुणाला आसमान ठेंगणे झाले.

प्रवास हास्य विनोदात कधी पार पडला समजलेच नाही. गाडीतून सगळे उतरले तसे सासूने सगळ्यांना वेशीवरच्या म्हसोबाला नमस्कार करायला सांगीतले. वेशीवर आधीच एक घोडागाडी उभी होती. नवीन वधुवराना त्यात बसवून नाचत नाचत मंडळी बोराटेवाडीकडे निघाली.

बोराटेवाडी हे जेमतेम सव्वाशे उंबऱ्यांचे गाव, बोराटे हे त्या गावातील सर्वात श्रीमंत अन त्यामुळे पिढ्यानपिढ्या त्या गावाचे प्रमुखही.

अवघ्या दिड तासातच बोराटेवाडीच्या वेशीवर वरात आली अन बोराटेंचा निरोप वरातीकडे आला.

खुद्द बोराटेंना व्यवस्थित निमंत्रण नसल्यामुळे व मानाचे पान निमंत्रणाबरोबर न पाठवल्यामुळे आधी काय तो सोक्षमोक्ष लावा अन मग वरात आत आणा.

सगळेच हबकले. त्यात सासूने खमकेपणा दाखवून एकटीनेच गावात प्रवेश केला. स्वतः जाऊन बोराटेंना भेटून जमलेल्या पैशातील व आहेरातील काही मानाचा आहेर त्यांना देऊन 'हा सुनेच्या माहेरहून तुमच्यासाठी आहे' असे सांगीतले. त्यावर ती वरात जल्लोषात गावात यायला मुक्त झाली.

सगुणाला आपली सासू बरीच हुषार व कर्तबगार आहे हे जाणवले.

गावात आज सगळेच बेभान होते. दोन बोकड कापले होते. छानपैकी नशा झालेली होती. जो तो एकमेकांवर 'उष्ट्राणाम तु विवाहेषू' प्रमाणे स्तुतीसुमने उधळत होता. बायका शंकरच्या घराच्या आसपास जमलेल्या होत्या. नव्या सुनेचे कौतूक करत बसल्या होत्या. सगुणाला एकीकडे माहेर सोडल्याचे दुःख तर 'काय हा आपल्यासाठी थाट अन काय हे गुदमरवणारे कौतुक' असे वाटत होते. सगुणाच्या तुलनेत शंकर दिसायला बराच उजवा होता. त्यात शेंडेफळ! त्याचे कौतूक काही संपेना. असा नवरा लाभणे हे सगुणा आपले भाग्य समजत होती.

शेवटी रात्र बरीच झाल्यावर दोघांना त्यांच्या खोलीत पाठवण्यात आले. एकीकडे यांचा मधुचंद्र तर दुसरीकडे गावात नशेने तर्र झालेल्यांचे वाढलेले आवाज अन शिव्यांची बरसात! त्यातच बाहेर काहीतरी भांडण झाल्यासारखे वाटले. अचानक शिव्यांचा जोर वाढला. शंकरला आज त्या गोष्टीशी काहीही देणेघेणे नव्हते. तो सगुणाला 'हे हितं रोजचंच हाये' म्हणून आणखीनच चकीत करत होता. बाहेर कसलातरी जोरात आवाज होऊ लागला. कुणीतरी जोरात रडू लागले, कुणीतरी विव्हळू लागले. सगळे 'ए, ए' करून कुणालातरी आवरत असावेत. त्यातच शंकरच्या खोलीवर थाप पडली. शंकरने दार उघडले. सगुणा भेदरलेली होती. बाहेर शंकरचा मित्र होता. त्याने 'कुणीतरी नशेत जुनी दुष्मनी काढून तुझ्या मोठ्या भावावर तलवारीचा वार केला अन त्याच्यात त्याचा डावा हात तुटला' ही भीषण बातमी सांगीतली. सगुणा भेदरून रडायला लागली. शंकर बाहेर धावला.

सगुणाही बाहेर येऊन शंभर पावले चालून गेल्यावर तिला ते भीषण दृश्य दिसले. सासू हंबरडा फोडून रडत होती. मोठी जाऊ बेशुद्ध झालेली होती. मोठा दीरही वेदनांनी शेवटी बेशुद्ध झालेला होता. शंकर पिसाटासारखा मारेकऱ्याला शोधत होता. शंकरचे मधले दोन भाऊही त्यालाच शोधत होते. काही लोक त्यांना आवरत होते. मारेकरी केव्हाच पळून गेलेला होता. कुणीतरी पोलिसांकडे नोंद करायला पळाले होते. शंकर
आणि त्याचे दोन मधले भाऊ शिव्यांची लाखोली वाहत होते. दोन जावा मोठ्या जावेला अन सासूला आवरत होत्या. कुणीतरी तितक्यात मोठ्या दिराला उचलून दवाखान्यात नेण्यासाठी बोराट्यांची गाडी आणली. स्वतः बोराटेही आले होते. त्यांना पाहून सासून आणखीनच गळा काढला. बोराटेंनी स्वतः तिला सावरले. नातवंडे भेदरून रडत होती, त्यांनाही चुचकारले. एकंदर भलताच भयानक प्रकार घडला होता.

सगुणाचा मोठा दीर तब्बल महिनाभर दवाखान्यात होता. सगळेच सारखे तिथे जाऊन येऊन होते. पोलिसांनी चौकश्या करून करून मेटाकुटीस आणले होते. आरोपी कोण आहे हे माहीत असूनही सापडत नव्हता. बोराट्यांनी शक्य तितकी मदत केलेली होती. सगुणाच्या मधुचंद्राच्या दिवसांवर हे सावट पडलेले होते. तिच्या माहेरचे लगबगीने येऊन जमेल ती मदत करून गेले होते. शंकर अजूनही मारेकरी कुठे गेला असेल याच विचारात हरवल्यासारखा असायचा. मधूनच आपल्या नव्या नवरीची आठवण आली की काही काळ ते सगळे विसरायचा.

महिना झाल्यावर दीर घरी आला अन अर्थातच घरीच बसू लागला. आता त्याला शेतावर जाणे शक्य नव्हते. मधल्या दोन भावांनी व शंकरने त्याचीही जबाबदारी उचलली अन घर पुन्हा सुरळीत चालू लागले. मोठी जाऊ मात्र घडीघडीला रडायची. सासू तिला धीर द्यायची. दोन चार दिवस जातात तोच सगुणाच्या हातातून चुकून जेवायला वाढताना पातेले पडले. अचानक काही कळायच्या आत सासूने जवळ असलेले उलत्ने घेतले अन सगुणाच्या पाठीत हाणले. 'मेली अपशकुनी, आल्या आल्या माझ्या पोरावर घाव केला' असे म्हणून सासू तिला आणखीन बदडू लागली. काय होते आहे हे सगुणाला कळायच्या आतच मोठी जाऊ, जी आत्तापर्यंत सासूच्या त्या विधानाने आठवण येऊन जोरात रडत होती, तीही राग आल्याप्रमाणे सगुणाला मारू लागली. शंकर मध्ये पडला अन त्याने तो प्रसंग निभावून नेला.

आता हे रोजच घडू लागले. मोठ्या दीरालाही आता सगुणाचा राग यायला लागलेला होता. तो घरातच असल्याने आपल्या बायकोची व सासूची साथ देत तिला सारखे घालून पाडून बोलायचा. सगुणा अनेकदा त्याला उभे करायला किंवा इतर काही मदत हवी असल्यास स्वतः धावायची, पण त्याचा त्याच्यावर परिणाम होत नव्हता. उलट मोठी जाऊ भडकत होती. 'हात लावू नको यांना' म्हणायची.

सहा, आठ महिने असेच गेले. सगुणा बहुतांशी वेळा  शिव्या तर काही वेळा मार खायची. मात्र आज एक विचित्रच घटना घडली. सासूने तिला शेतावर जाऊन दोन्हीकडचे, शेतावरचे व घरचे काम बघायला सांगीतले. सगुणाला माहेरी शेतावर राबायची सवय होती, मात्र इतके काम कधीच नव्हते. चौदा माणसांचे घर, जेवणखाण वगैरे पाहून पुन्हा शेतावर राबायचे? मात्र तिला आपले दुर्दैव माहीत होते. गेलो नाहीत अपार छळ होईल त्यापेक्षा तिकडे जात जाऊ, तितकाच इथे काढायचा वेळ कमी होईल असे तिला वाटले. सगुणा आता दोन्हीकडे राबू लागली. बाकी तीनही जावा फक्त घर बघायच्या. सासू उंबऱ्यावर बसून मोठमोठे सल्ले द्यायची. सासू ४८ वर्षांची असूनही एखाद्या नवीन विवाहितेसारखी सजून नटून राहायची. सगुणा मात्र लग्नात मिळालेल्या साड्यांवरच अजूनही राबत होती.

शेतात तिला शंकरची साथ मिळायची खरी. पण तीही संपली. शंकरला चिखलीत वाहतुक कामगार म्हणून नोकरी मिळाली. तो आता महिन्यात दोन तीन दिवसच यायचा.

एकंदर सगुणाचे नशीब दिवसेंदिवस आणखीनच खराब होत होते.

दोन वर्षे झाल्यावर तीन नंबरची जाऊ एक दिवस बोलता बोलता म्हणाली, 'काय ग सगुणे, तुम्हाला काय मुलबाळ नको व्हय? ' झाले. या विषयाने आता उग्र रूप धारण केले. आत्तापर्यंत सासू स्वतःच्याच सुखाकडे पाहण्यात मग्न होती. 'बरी मिळाली सगुणा राबायला' असे मनाशी म्हणायची. पण आता तिला आणखीन एक मार्ग सापडला. 'सगुणाला दोन वर्षे झाली तरी मूल होत नाही' हा विचार ती आता येता जाता, कुणासमोरही व्यक्त करायला लागली. एक दिवस शंकर आलेला असताना एका हळुवार क्षणी सगुणाने त्याच्याकडे सगळी तक्रार केली. शंकरला खरे तर स्वतःच्या आईचा राग आला. पण मोठे भाऊ घरात असताना आईला बोलण्याची त्यात ताकद नव्हती. त्याने सगुणाचे सांत्वन केले अन दुसऱ्या दिवशी निघून गेला. जाताना त्याने आईला फक्त इतकेच सांगीतले की 'मूल' या विषयावरून तिला उगाच बोलत जाऊ नका. झाले.

दुसऱ्या दिवसापासून सासू आणखीनच भडकली. तिने 'ही नवऱ्याकडे कागाळ्या करते' हे मत सर्वांना पटवून सर्वांनाच तिच्या विरुद्ध केले. आता तिच्या तपासण्या सुरू केल्या. सारे काही नॉर्मल होते. मग उपासतापास सुरू झाले. हे सर्व होत असतानाच राबणे व शिव्या, मार खाणे हे सगुणा नियमीतपणे सहन करत होती.

एक दिवस कुणीच घरात नसताना सगुणा आंघोळ करून बाहेर पडली तर तिच्या खोलीत तिचा मोठा दीर! त्याने तिच्याकडे ज्या नजरेने पाहिले ते तिला समजले. ती पुन्हा बाथरूममध्ये गेली. त्याने दार ठोठावून तिला हाक मारली. 'अग मीच आहे, कुणी परके नाय, ये भाईर' म्हणत तो दार ठोठावू लागला. तिने त्याला खोलीबाहेर जायला सांगीतले. तो गेला असे दाखवून तिथेच बसून राहिला. ती बाहेर येताच त्याने एकाच हाताने तिला जवळ घ्यायचा प्रयत्न केला. 'भाऊजी, ह्य काय? मी वहिनी हाये तुमची' म्हणत सगुणा दूर गेली. त्यावर त्याने तिला सल्ला दिला. 'हे बघ, शंकऱ्यापासून काय तुला मूल होत नाय, उगाच रोजचा मार खायचा, त्यापरी तुलाबी पोर होईल अन मीही घरातलाच आहे म्हंटल्यावर बाहेर काही फुटायचा प्रश्न नाही' त्याचे हे वाक्य ऐकून तिला प्रचंड तिरस्कार आणि भीती वाटली. ती तशीच पळत स्वयंपाकघरात गेली अन शेजारच्या अंजूला हाक मारली. दीर ती हाक ऐकून घराबाहेर निघून गेला.

या प्रसंगानंतर बऱ्याच वेळाने घरातील मंडळी परतली. सगुणाचा उतरलेला चेहरा पाहून दोन नंबरच्या जावेला काहीतरी वेगळेच वाटले. तिने आपल्या खोलीत तिला नेऊन खोदून खोदून विचारल्यावर तिला झालेला प्रकार कळला. त्यावर 'असलेच हायेत त्ये, म्हणून तर त्याने हात तोडला' असे उद्गार काढले. सगुणाने 'त्याने म्हणजे कुणी' असे विचारल्यावर तिने 'गावातील एका बाईशी यांचे संबंध होते अन नवऱ्याला समजल्यावर त्याने तुझ्या लग्नात यांचा काटा काढला अन तो पळून गेला' असे सांगीतले. हा सगुणाला धक्काच होता. त्यापुढे ती कधीही एकटी घरात थांबली नाही.

पंधरवड्याने शंकर आला. सगुणाने त्याला सगळा प्रकार सांगीतला. शंकर तिथेच भडकला. तो सरळ खोलीतून बाहेर येऊन मोठ्या भावाला शिवीगाळ करायला लागला. त्याने एक काठी उचलून मोठ्या भावाला दोन तडाखे हाणेपर्यंत मोठी जाऊ तिथे धावली. तिची अन शंकरची झोंबाझोंब चाललेली असताना सासू पोचली. तिने काय झाले विचारल्यावर शंकरने खरा प्रकार सांगीतला. मोठी जाऊ अवाकच झाली. पण तिच्या नवऱ्यावर हा आळ आला असता तर इस्टेटीत तिला कदाचित काहीच मिळाले नसते असे वाटून तिने नवऱ्याची बाजू घेतली. ती शंकरला म्हणाली 'खरे काय ते मी तुम्हाला सांगते, हीच सारखी यांचा हात धरायला, यांना उठवायला जातीय. तुम्ही इथे नसता, हिची बुद्धी फिरत्ये, तुम्ही नोकरी सोडून घरात राहात जा, ही शेतात काय करत्ये ते तुम्हाला माहीत नाय'. सगुणाला शिव्या देणे सगळ्यांसाठीच फार सोपे होते. शंकर म्हणाला, 'काय करते ही शेतात? ' त्यावर सगुणा मध्ये पडली. 'अहो या कायच्याकाय बोलतायत, हे मोठे दीर, तुमचे मोठे भाऊ म्हणून मदत करत्ये मी, त्यांनाच विचारा की काय झाले त्ये? ' त्यावर शंकरने मोठ्या भावाला पुन्हा शिव्या घालत विचारले. त्यावर तो म्हणाला, 'हराम्या, मला मारत्योस? तुला यवढ्याचा यवढा केलाय मी' मोठ्या भावाने शिव्या द्यायला सुरुवात केल्यावर पुन्हा शंकरने काठी उगारल्यावर सगळे मध्ये पडले. आता जोरजोरात दोघे शिव्या देत होते. दोन नंबरची जाऊ मध्येच येऊन म्हणाली, 'शंकरभाउजी, तुमच्या बायकोची चूक नाय' त्यावर शंकरला जरा बरे वाटते तोच सासू म्हणाली 'अरे मसणात जाईल ही, शेतात लय भानगडी हिच्या'

आता आईच बोलतीय म्हंटल्यावर शंकरने चौकशी केली. तसे मोठ्या जावेने 'ही शेतात एका माणसाशी सारखी बोलते, त्याला खायला देते, तो हिच्याचजवळ सारखा बसतो' असे सांगीतले. हे खरे आहे की नाही हे कळायच्या आत शंकरने काठीने सगुणाला मारायला सुरुवात केली. आता मध्ये पडणारे कुणीच नव्हते. मात्र दोन नंबरच्या जावेने मध्ये पडून स्वतःच एक तडाखा खाल्ला. तसा दोन नंबरचा भाऊ खवळला व त्याने शंकरला काहीतरी फेकून मारले. शंकरची अन त्याची जुंपली. सगुणा विव्हळत होती. बाहेरचे लोक जमा झाले होते. त्यात शेजारची अंजूही होती. तिने सगुणाला मदत करायचे आवाहन सगळ्या जमलेल्यांना केले. कुणी पटकन तिला पाणी दिले, कुणी तिला उचलून आपल्या घरी घेऊन गेले व शेक द्यायला लागले. इतके यांची जुंपलेलीच होती. शेवटी 'या वहिनी मध्ये पडल्या नसत्या तर त्यांना लागलेच नसते' हा शंकरचा विचार दोन नंबरच्या भावाला पटला व तिथे तोडगा निघाला. मात्र सगुणाबद्दल शंकरचे मन कलुषित करणे चालूच होते. त्यात तिला मूल होत नाही या कारणाने सासून शंकरला दुसरे लग्न करण्याची कल्पना सांगीतली. एकंदर बऱ्याच प्रकारांनतर ते सगळे थांबले. सगुणा अंजूकडेच झोपली.

दुसऱ्या दिवशी तिची ग्लानी जाईपर्यंत शंकर गावाला निघून गेला होता. ती कशीबशी घरी आली तर सासू मिश्री लावत होती. सासूने पुन्हा तिच्या माहेरचा उद्धार केला अन चहा ठेवायला सांगीतले. काही का असेना, मिळालेल्या मारामुळे आज मोठा दीर तिच्याकडे नजर वर करून पाहात नव्हता. सगुणाने 'आज शेतात जाता येणार नाही' असे जाहीर करून टाकले. त्यावर सासूच्या परवानगीची वाट न बघताच मधली वहिनी 'ठीक आहे, मी करीन तुझे काम आज' असे म्हणाली. त्यावर सासूने पुन्हा तोंदाचा पट्टा सुरू केला. सगुणाच्या मनात आज पहिल्यांदाच 'ही बया मेली तर बरे होईल' असा विचार आला. आज ती दिराला काहीही मदत करत नव्हती. सगळे निघून गेल्यावर फक्त सासू अन दीरच राहिले घरात. सगुणा निमूतपणे घरकाम करत होती. तेवढ्यात बोराट्यांचा माळी आला व सासूशी काहीतरी बोलून गेला. थोड्या वेळाने नटून थटून सासू बाहेर पडल्यावर सगुणाने अंजूला सोबतीला बोलवून घेतले. 'सासूबाई कुठे गेल्या काय जाणे' असे सगुणा म्हणाल्यावर अंजूने तिला 'सगळ्या गावात बोराटे तुझ्या सासूला माळावर बोलवतात हे माहीत आहे'
असे सांगीतले. हा सगुणाला प्रचंड धक्का होता. दहा वर्षापुर्वी सासरे गेल्यानंतर हे प्रकरण चालू झालेले नसून त्यांच्या हयातीतच ते चालू होते हे ऐकून
तिला किळस आली. आपल्या लग्नात, जवळच्या गावातले स्थळ असते तर हे सगळे कळले असते असे तिला वाटले. हल्ली तिच्या माहेरचे फारसे येत
नसत, त्यांचाही पाण उतारा व्हायचा. हा प्रकार शंकरला माहीत आहे का विचारल्यावर अंजूने त्यावर 'शंकर हा त्यांचाच मुलगा आहे असे म्हणतात' अशी नवीन बातमी दिली.

एकंदर सगळे विपरीतच होते. त्यातच एक दिवस शंकर घरी आला. येताना त्याच्याबरोबर एक नखरेल मुलगी होती. त्याने घरात चक्क जाहीर केले की ही व मी नवरा बायकोसारखे राहणार आहोत. आता पोलीस केस करायचीच वेळ आली असे सगुणाला वाटले. पण तिच्यावर प्रेशरच इतके होते की तिने गोडीगुलाबीने बोलण्याशिवाय कुठलाच मार्ग स्वीकारला नाही.

निजानिज झाली की ती नखरेल मुलगी सगुणाच्या समोर शंकरबरोबर त्याच्या खोलीत निघून जायची. जाताना फिदीफिदी हसायची. घरातल्या सगळ्यांचीच त्या पर्यायाला परवानगी तरी होती किंवा अगतिकता तरी होती. शंकरवर बोराट्यांचे जरा जास्तच 'प्रेम' होते.

त्या मुलीला सगुणाने घरात कधीही काम करताना पाहिले नाही. ती जवळून गेली की कसलातरी सुगंध यायचा. नट्टापट्टा करण्यात तिची दुपार व्हायची. शंकर तिच्याचबरोबर जास्तीतजास्त काळ काढायचा. शंकरच्या या वागण्यामुळे सगुणाला 'आपले आता घरातले स्थान काय' हेच समजत नव्हते. त्यातच तिचा उद्धार ठायीठायी होतच होता. तिने 'आपल्याला पळून जाता येईल काय, गेल्यास माहेरी घेतील काय अन नाही घेतले तर काय करता येईल' याचा विचार सुरू केला. तिच्या या विचारांचा अर्थातच अंजूशिवाय कुणालाच थांगपत्ता नव्हता. 

आज शंकर नोकरीवर चालला होता. त्याने सर्वांना, व विशेषतः सगुणाला, त्या मुलीची व्यवस्थित काळजी घ्यायला सांगीतले. ती मुलगी 'मी तुमच्याबरोबर येते' असे एका शब्दाने म्हणाली नाही.

लग्नानंतरच्या केवळ तीन वर्षात सगुणाने जग पाहिलेले होते.

शेतावर व घरी राबताना तिला पुन्हा त्या मुलीचे जेवणखाण बघणे अन विचारपूस करणे हे काम लागले. शंकरचा राग सगुणाला माहीत होता. या मुलीने तक्रार केल्यास आपले काही खरे नाही हे त्या बिचारीला ठाऊक होते. अजून शंकरच्या माराची आठवण ताजी होती. ती मुलगी निवांत आपल्या खोलीत पडून राहायची. जेवायला बाहेर यायची.
सगुणाशी किंवा इतरांशी फारसे बोलायची नाही. सारखी गाणी मात्र गुणगुणायची. काहीतरी वाचत बसायची. एक मात्र ती करायची, सगुणाला आपली मदतनिस समजून कामे मात्र सांगायची. मोठा दीर या मुलीच्या नखऱ्यांनी हरखून जायचा. पण आपला एक हात गेलेलाच आहे, दुसरा टिकावा या उद्देशाने व तोच सल्ला बायकोनेही दिल्याने गप्प बसायचा. सासूला मात्र ती मुलगी जराशी अडचण झालेली होती. कोणाची कोण अन माझ्या घरात येऊन राहाते असे तिला वाटायचे. सासूला शंकरची काहीच भीती नव्हती. एकदा त्या मुलीने चक्क सासूला काहीतरी काम सांगीतल्यावर सासूने तिच्या झिंज्या ओढून तिला घराबाहेर आणून सर्वांदेखत मारले. ती मुलगी काही त्या माराला सहन करू शकली नाही. जरा त्राण आल्यावर ती सरळ बॅग भरून घरातून निघून गेली. पुढे शंकरला हा प्रकार कळल्यावर तो भडकला खरा, पण आता ती मुलगी कायमची गेलेली आहे हे पाहून घरातल्या सगळ्यांनी तिच्या कागाळ्या त्याला सांगीतल्या अन तो गप्प बसला.

आता शंकर आला की त्या खोलीत सगुणा राहायची. सगुणाचे दिवस जरा पालतले होते. तिचे वांझपण आता उद्धारून उद्धारून बोथटले होते.
त्यात पुन्हा कष्टाला ती कमी पडत नव्हती. सासूला काही सम्धीच मिळत नव्हती. पण नवीन सून, नवा हुंदा हा तिचा प्लॅन काही तिला स्वस्थ बसवेना.

दोन महिन्यांनी घरात गोड बातमी आली. सगुणाला 'आता आपले भाग्यच पालटले' हे नक्की समजले. जो तो आता तिचे कौतूक करू लागला. शंकर तर वेडाच झाला होता. अचानक त्याला 'सगुणाला कुठे ठवू, कुठे नको' असे झाले होते. देवाने आपल्यावर कृपा करण्यास इतका वेळ का लावला हे सगुणाला समजत नव्हते. ती आपल्या गर्भाची घेता येईल तितकी काळजी घेत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच छटा आली होती.
आता सासू तिला पुर्वीइतके काम सांगू शकतही नव्हती व सगुणाही आता स्वतःहून फार राबत नव्हती.

मधून मधून सासू कारणे काढून शिवा द्यायची खरी, पण मार मिळणे थांबले होते. क्रूर स्त्रीलाही मातृत्वाची बातमी मृदू करू शकते बहुधा!

पहिल्यांदाच सगुणाला लग्नानंतर साड्या मिळू लागल्या. पोटभर खायला मिळू लागले. गावातल्या बायकाही येऊन चौकशी करू लागल्या.

सहा महिने झाल्यावर सगुणा आता तीव्रतेने बाळाची वाट पाहू लागली.

या दरम्यान एक वेगळाच प्रकार घडत होता. सगुणाला गर्भ राहिलेला पाहून मोठा दीर व जाऊ यांच्या मनात द्वेष निर्माण झालेला होता. याचे कारण आजपर्यंत त्यांना 'सगुणाला मूल नसल्यामुळे इस्टेटीत तीनच वाटे होणार व सगुणा कायमची राबायला मिळणार' याचा जो आनंद होता तो नष्ट व्हायची वेळ वेगात जवळ येत होती. त्यात मोठ्या मुलाला एक हातच नसल्यामुळे सासू जमिनीचा नेमका किती वाटा देईल याचीही त्यांना शंकाच होती. आणखीन एक म्हणजे शंकर व बोराटे यांचे नाते जर खरे असेल तर आपल्या बाजुने कुणीच उभे राहणार नाही हे त्यांना ठामपणे वाटत होते. आधीसारख्या मारामाऱ्या करून वाटा मिळवणे मोठ्या भावाला आता शक्य नव्हते. मात्र यावर आता काहीही उपाय राहिलेला नव्हता.
सगुणाचा गर्भ वाढत होता अन त्याचबरोबर तिचे होणारे कौतूक!

यावरही तोडगा निघाला.

शेतावरचा यम्या एक दिवस सरळ सगुणाला भेटायला घरी आला. आल्यावर त्याने सर्वांदेखत सगुणाची चौकशी केली. सगुणा बरेचदा त्याला काही खायला
वगैरे द्यायची कारण त्याला मिळनारी मजुरी फारच कमी होती. सासूला यम्यासुद्धा आल्याचे कौतूक वाटले. मात्र जावेला ती संधी वाटली.

यम्या गेल्यावर जावेने खोचक बोलायला सुरुवात केली. आधी ती काय बोलतीय हेच सासूला व सगुणाला समजेना. जसे समजले तशी सगुना अवाक झाली तर सासू गप्प! सासूला स्वतः उधळलेले रंग माहीत असल्याने व 'ते रंग सगळ्यांनाच माहीत असल्याचे माहीत असल्याने' गप्प राहणे भाग होते. पण सगुणाच्याबाबतीत तिचे मन काही स्थिर होईना. शेवटी हिय्या करून तिने मोठ्या सुनेला विचारले तसे मोठ्या सुनेने एक नसलेली कहाणी रसभरीतपणे ऐकवली. सगुणा चवताळून 'जाऊबाई, कायच्याकाय बोलात तर याद राखा' म्हणाली तसे मोठ्या जावेने तिला सुचतील त्या शिव्या द्यायला सुरुवात केली. ' रांडंची अवलाद, काय धंदे चालतात गावाला म्हायत, शेतात शेजा सजवायला आलीया हितं' इथपासून सुरुवात झाली ते सगुणाने कधी नव्हे ते आजवर त्याच घरात ऐकलेल्या सगळ्या शिव्या देण्यापर्यंत मजल गेली. यात दिराच्या सत्शील प्रवृत्तीचा, जावेच्या कान भरण्याच्या कौशल्याचा अन सासूच्या बोराट्यांबरोबरच्या
संबंधांचा, सगळ्याचा जाहीर उल्लेख झाला. आजूबाजूचे जमलेले होते. दोन तीन लोकांनी आत येऊन मोठ्या जावेची कान उघाडणी केली. 'आम्ही
यम्याला चांगला वळाखतो, हिलाबी वळाखतो, ह्ये असलं रक्तच न्हाय, तुम्ही कायच्या काय बरळताय, ही लयी गुणी हाय' असे सरळ सांगीतले.

आता 'सगुणा चांगली' अन 'तिची सासू बाहेरख्याली' अन 'दीर भावजयीवर डोळा ठेवणारा ' असे चित्र अचानक गावासमोर उभे राहिले म्हंटल्यावर सासू भडकली.
तिने शिव्या अन पाठीवर थपडा मारणे सुरू केले. अंजू मध्ये पडली. तिलाही ढकलून दिले. शेवटी नातवाच्या जन्मापेक्षा इमेज महत्त्वाची होती. मोठा दीर 'आपल्याला शंकरकडून बसलेले काठीचे तडाखे' आठवत होता.  त्याने आतून काठी आणली तसे गावातल्यांनी त्याला जखडून ठेवले.
बायाबायका येऊन सासूबद्दल वाटेल तशा बोलायला लागल्या. मोठ्या जावेला हा अचानक झालेला बदल कसा पचवावा ते समजेना. तिच्या डोक्यातून एक शक्कल निघाली. तिने सगळ्यांना शांत करत एक प्रश्न विचारला.

'तुम्ही एवढे भांडताय अन या रांडंची बाजू घेताय, मला सांगा, हिला सहाव्वा लागलाय, आमचे भावजी त्यावेळेस हितं होते तवा ती तमासगिरीण नव्हती व्हय त्यांनी आणलेली? ही तर चुलीपाशी निजायची, भावजी तर फकुत दहा दिवस व्हते हितं'

हा अचानक उपटलेला मुद्दा नक्कीच मारामारी व भांडणे थांबवून विचार करायला लावणारा होता. मोठा दीर मनातून खुष झाला. आपली बायको आपल्याला किती वेळा वाचवते असे त्याला वाटले.

शांतता पसरली. लोक एकमेकांकडे बघायला लागले. जाऊ म्हणाली.

'ही शेतात किती वेळ काढती विचारा, भावजी येतात तवा बी शेतात जातीय अन भावजींच्या खोलीत तर भलतीच असतीय'

यावर दोन चार निरागस माणसांच्या माना हालल्या. त्यांना हा हिशोब करण्याची काही गरजच नव्हती. कुणीतरी म्हणाले की बाईच्या पोटात मूल आहे, तिला मारू वगैरे नका, शंकर आल्याव्र बघू. यावर अर्वाच्य शिव्या देत सगुणाला आत नेण्यात आले. अंजू मात्र सोबतीला घरात गेली. ती असल्याने सगुणाला मारण्याची हिम्मत तरी होणार नव्हती.

गावात चर्चा सुरू झाली. 'सासू तर आहेच तशी, सूनेने चांगले पांग फ़ेडले' वगैरे! सासूला आता तोंड दाखवायची लाज वाटू लागली. त्यात सगुणा
अधिकच सुंदर दिसू लागली होती अन ती कधी अंजूकडे झोपायची तर कधी अंजू इकडे झोपायची. सासूला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करायला लागायचा. त्यात तीन नंबरच्या वहिनीने एक दिवस सासूशी वाट्यांवरून भांडण काढले अन पुन्हा जुंपली. शंकरचे तीनही भाऊ जमेल तसे स्वार्थ पाहात होते. सगुणाबाबतची चर्चा बोराट्यांचा कानावर लगेचच गेली. त्यांनी सासूला बोलावून 'आमचे नाव खराब करणारी सून ठेवू नको' असे बजावले. एकंदर सगुणाचे दिवस वाईट होते. अन अशात एक दिवस शंकर प्रकटला.

शंकर प्रकटायचे कारण सुट्टी नसून त्याला मिळालेली चर्चेची बातमी होती. त्याने पहिल्यांदा येऊन सगुणाला शिव्यांची लाखोली वाहिली. तिच्यावर हात उगारणार तोच दोन नंबरच्या वहिनी व अंजू मध्ये पडल्या. मोठी जाऊ कागाळ्या रंगवू लागली. सासूने बोराट्यांच्या हुकुमाची कल्पना दिली. मोठा दीर 'शंकऱ्या तू माझ्यावर आळ घेतला होतास, पाहतोस ना ही कशी आहे ते' म्हणायला लागला. सगुणा आज शंकरलाही ऐकत नव्हती. 'तुमचे प्वार हाय हे, मी असली तसली नाय तुमच्या आईसारखी' म्हंतल्यावर शंकरने तिला लाथ मारली. मात्र ती तिच्या कुशीत लागली व ती नुसतीच खाली पडली. पहिल्यांदा शंकर शेताकडे धावला. त्याने यम्याला ओढून बदडत गावात घरासमोर आणले. 'बोल ..... बोल आता, तुझेच पाप हाय न ह्यो? ' असे म्हणून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागला. त्यावर यम्या विव्हळत होता. मात्र त्याने मार खाताखाताच एक बाँब फोडला. 'तुमची घरवाली नाय, मोठ्या बाई यायच्या माझ्याकडे' असे म्हणून मोठ्या जावेकडे बोट दाखवले. तिला तर घेरीच आली. मग यम्या म्हणाला 'नवरा घरात नुसता बसतो असे सांगून मला भेटायला यायच्या, मी गरीब हाय, पण माणूसच हाय'.

यम्याच्या या विधानावर शंकरला काय करावे तेच समजेना. त्याने पहिल्यांदा मोठ्या भावाला धरले. त्यावर मधले भाऊ मध्ये पडले. सगुणाने सासूचा उद्धार केलेला असल्यामुळे सासू भडकलेली होतीच. तीही मध्ये पडली. शंकरने सासूला ढकलून दिले. लोक आता मजा घ्यायला लागले. एवढ्यात मोठ्या भावाने स्वतःची सुटका करून तो यम्याकडे धावला. यम्या पळू लागला. सासूने काठी घेऊन सगुणाच्या अंगावर मारायला सुरुवात केली. सगुणा ओरडत असतानाच शंकर धावला. त्याने आईलाच काठी हाणली. सासू निपचीत पडल्यावर तो सगुणाला घेऊन सुईणीकडे धावला. दुर्दैवाने सगुणाचा गर्भ राहिलेला नव्हता. शंकर आक्रोश करत होता. सगळे गावच रडत होते.

हा प्रकार झाल्यानंतर शंकरने त्वेषात घरात प्रवेश करून मोठ्या भावाच्या डोक्यात दगड घातला अन मोठ्या भावाच खून केला. स्वतःचे कृत्य पाहून जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा तो पळत सुटला. त्याने बस धरून दुसऱ्या गावाला कसेतरी प्रयाण केले.

इकडे सगुणा अंजूच्याघरी बरी होत होती. तिची सर्व स्वप्ने भंगली होती. शेजारच्याच घरात तिची सासू व हेवा करणारी व स्वप्न धुळीस मिळवणारी थोरली विधवा जाऊ राहत होत्या. दोन दीर व दोन जावाही होत्या. माहेरचे सगुणाकडे धावले होते. पण या परक्या गावात एकंदर दहशतीचे वातावरण पाहून सगुणाला भरपूर धीर देण्यावाचून ते काही करू शकले नव्हते. तिला घेऊन जाण्याचा विचार त्यांनी मांडला, पण 'खुन्याची बायको' म्हणून हिला काय स्थान मिळणार असा विचार करून त्यांनी आधीचा विचार रद्द केला. शंकर कुठे असेल हेच तिला कळत नव्हते. तिला काय, कुणालाच कळत नव्हते. पोलीस येऊन जाबजबाब घेऊन जायचे. सारख्या चौकश्या करायचे. पत्ता लागत नव्हता. अशात पंधरा दिवसांनी बातमी आली. शंकर सापडला व पोलीस कोठडीत आहे. आता सगळ्यांनाच सारखे तिथे जावे लागत होते. जवळपास महिन्याने सर्व तपासाच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यावर शंकरवर खटला भरला गेला.

हे सर्व होत असताना सासू बोराट्यांच्या मिळणाऱ्या सामर्थ्यामुळे गावात टिकून राहात होती. विधवा जाऊ हळूहळू शेतात जाऊ लागली होती. यम्याने केव्हाच पोबारा केलेला होता. दोन दीर व जावा आपापली कामे करत होती. गाव अजून या घटनाचक्राला विसरलेले नव्हते. मुले जरी इतर मुलांमध्ये खेळत होती तरी त्यांच्या मनावर अजून सावट होते. बापाचे ठेचलेले डोके डोळ्यासमोर येत होते.

शंकरला जन्मठेप झाली. सगुणाचे संसाराचे स्वप्न संपले. तिला आता गावात काहीच स्थान नव्हते. आधीची सहानुभुती हळूहळू कमी होऊ लागली. एका खुन्याची बायको असा हळूहळू तिचा उल्लेख होऊ लागला.

सगुणाच्या काय, कुणाच्याच मनातून भूतकाळ जात नव्हता. एक दिवस एक विलक्षण घटना घडली. शिकारीवर गेलेले असताना बोराटे एका
टेकाडापाशी हार्ट ऍटेकने गेले. या घटनेने जे व्हायचे असेल ते होवो, पण सासूचे महत्त्व प्रचंड वाढले. कारण जाताना त्यांनी चक्क आपली एक 
चतुर्थांश दौलत तिच्या नावावर केली होती. ही एक अजबच घटना म्हणावी लागेल.

आता सासूच्या भोवती दोन्ही मुले व तिन्ही सुना घिरट्या घालू लागली. चवथी सून, सगुणा मात्र या कुटुंबापासूनच दूर होती. तसेही, तिला कुणीच जवळ करणार नव्हते. तिच्यामुळे दोन भाऊ आयुष्यातून उठलेले होते. एक सून विधवा झालेली होती व त्यापुर्वी तिची अब्रू गावासमोर यम्याने काढली होती. सगुणाचे स्वतःचे मूल तर जगलेच नव्हते. इतक्या अवलक्षणी सुनेला कोण जवळ करणार?

सासू राणीसारखी वागू लागली. घरात दुरुस्त्या झाल्या. सासूने दोन गडी पाळले. ते सासूच्या व थोरल्या बाईंच्या सूचनेवरून आता मधून मधून
सगुणाला त्रास देऊ लागले. कधी अंजूच्या - जिथे सगुणा अजूनही राहात होती - झोपडीवर दगड टाक, घरासमोर लघ्वी कर, रात्री चित्रविचित्र आवाज काढून घाबरव, असे! एकदा त्यांच्यातल्या एकाने सगुणाकडे पाहून डोळा मारला. त्यांना आता सगुणा ही सार्वजनिक संपत्ती वाटत होती. त्यातच एकदा एकाने तिला ओढायचा प्रयत्न केला. तेव्हा सगुणा कशीबशी बोंब मारत गावात धावली.

नवरात्र आले. नवरात्र आले अन सगुणाचे दिवस पालटलेच. देवीने काही चमत्कार केला की काय असे वाटावे इतके पालटले.

अष्टमीला गावातल्या बायका घुमत होत्या. सगुणा पाहात होती. अचानक काय झाले कुणास ठाऊक, सगुणा जोरात उठली अन सगळ्यांसमोर एका विशिष्ट परीघामध्ये एका विशिष्ट तालात नाचायला लागली. कुणाला माहीत नव्हते, पण ही तिच्या आईने तिला जाताना दिलेली आयडिया होती. 'पोरी, काहीच जमलं नाय तर सरळ अंगात येतंय असं दाखव, लय लोक यडं व्हतात त्यानं'

सगुणाने ही आयडिया उत्तमपणे अमलात आणली. तिच्या त्या लयबद्ध घुमण्याने व नाचण्याने लोक अवाकच झाले. इतर घुमणाऱ्या बायका अन अंगात आलेल्या एक दोन बायका जरा हळूहळूच हालचाली करत होत्या, सगुणा बेभान फिरत होती. अंगात आलेल्या दोन बायकांनी तिचा एकंदर आविर्भाव पाहून स्वतःच्या हालचाली वाढवल्या. पण त्यांना काही सगुणासारखे नाचता येईना. त्या उगाचच डोके वर खाली करत किंवा हातवारे करत नाचू लागल्या. त्यामुळे त्या आणखीनच बीभत्स दिसू लागल्या. मात्र सगुणा अत्यंत शिस्तीत नाचत होती. घुमणाऱ्या बायका हळूहळू थांबल्या. लोक अवाक झालेले होते. आजवर चार नवरात्रे झाली पण हिच्या अंगात आले नाही, आज नवरा अन मूल गेल्यावर आले, याचा अर्थ देवीचा कोप होऊ शकतो हेच खरे. लोकांच्या मनातील विचार सगुणाला नाचता नाचता किंचित अंधुकसे जाणवत होते. ती आणखीन त्वेषाने नाचू लागली. नाचता नाचता तिने त्या दोन बायकांच्या समोर येत क्रोधिष्ट चेहरा केला अन विचारले 'मी असताना तुम्ही या गावात का येता, या गावाला माझा आशीर्वाद हाय'. त्या बायकांना आता स्वतःला सिद्ध करणे अत्यावश्यक झाले होते. त्याही रागात नाचायला लागल्या. सगुणाने 'ही देऊळगावराजाच्या वेशीवरची विसाबाई अन ही चिखलीची म्हातारीय, आम्ही भवानी हाय' अशी आरोळी ठोकली. गावातले लोक तर अवाक झालेच पण त्या दोन बायकांना काय करावे हेच समजेना. त्या नुसत्याच 'नाही नाही' म्हणत भेलकांडू लागल्या. त्यांचा दमही संपायलाच आला होता. त्यातच कुणीतरी आपल्या तान्ह्या मुलाला सगुणासमोर ठेवले. 'लय भलं होईल याचं, वेशीच्या म्हसोबाला कोंबडं दे' असा सल्ला देऊन टाकला. झाले. आता दर्शनाला रांगच लागली. हा प्रकार कसा थांबवावा हे तिच्या सासूला किंवा कुठल्याही दिराला, वहिनीला व गड्यांना समजत नव्हते.

सगुणाने गावाकडे पाहात 'लय कोप झाला व्हता हितं, त्यात या दोघी व्हत्याच कुटाणा करायला, आता मी आलेलीय' अशी एक गर्जना करून टाकली.

तोपर्यंत गावाच्या प्रत्येक उंबऱ्यावरील प्रत्येक गडीमाणसासकट प्रत्येक माणुस तिथे पोचला होता. कुणी नारळ आणले, कुणी प्रसाद आणला, सगळे दर्शनाच्या रांगेत होते. सगुणा बेभान मुंडी हालवत होती. प्रत्येक गोष्टीला 'मला ह्यं लागत नाय' असे म्हणत होती. शेवटी कुणीतरी हिय्या करून विचारले, 'भवानीमाते तुला काय नैवेद्य द्यावा? ' त्यावर सगुणा 'मला माणूस लागतंय' म्हणाली अन सन्नाटा पसरला.

एकंदर तीन तास तो प्रकार चालला होता. सगुणा दमायला लागली तशी हळूहळू झोपडीकडे सरकली व आशीर्वाद दिल्यासारखे करत म्हणाली 'उद्यापास्न आम्ही हितंच हाये आमच्या भक्तांसाठी, आणि राक्षस मारणारे गावातले'. असे म्हणून ती झोपडीत शिरली अन बाहेर एकच जयजयकार झाला. अंजू धावत झोपडीत आली तसा सगुणाला धोका जाणवला. ती पुन्हा मुंडी हालवत म्हणाली 'ये चिमणे, हितं आमचा निवास हाये, तू चालणार न्हायस' हे म्हणताना तिला अपारय यातना होत होत्या, पण तिच्या शांततेसाठी व गुपीतासाठी हे करणे भाग होते.

अंजू घाबरून बाहेर आली व दोघा चौघांशी बोलली. एकंदर गावावर भवानीचा इतका प्रभाव होता की पंधरा मिनिटांत अंजूचे सामान दुसऱ्या एकाच्या झोपडीत गेले. तोपर्यंत सगुणा घुमत होती. शेवटी सामसूम झाल्यावर ती थांबली. आता खरा धोका होता. आपण देवी वगैरे नसून साधी एक स्त्री आहोत हे तिला माहीत होते. कुणाला कळले किंवा कुणाला संशय आला तर? तिने पुन्हा थोडा वेळ घुमायचे नाटक केले. त्याच अवस्थेत ती झोपडीत फिरली. झोपडीच्या भिंतीना कुणाचे डोळे वगैरे  तर लागलेले नाहीत ना याची खात्री केली. बाहेर चक्क कुणीतरी रांगोळीने संपूर्ण झोपडीला बॉर्डर काढलेली होती. त्याबाहेर अनेक नारळ होते. एक माणूस समोरच्या बाजूला घोरत पडला होता. त्याच्याकडे बहुधा 'गुरव' होण्याची जबाबदारी दिलेली असावी.

सगुणा जिंकली होती. भवानीमातेच भयानक अवतार गावाला दाखवून तिने बोबडी वळवली होती.

खरी परीक्षा संपली होती. आता फक्त नाटक करत बसायचे.

दुसऱ्या दिवशी उठल्यापासून जो तो सगुणाच्या झोपडीला नमस्कार केल्याशिवाय जात नव्हता. नवरात्रात अंगात येणाऱ्या बायकांचे महत्त्व नंतर तितके कुणी ठेवत नाही. मात्र सगुणाचा काही तासांपुर्वीचाच अवतार इतका जिवंत वाटला होता की अजून प्रभाव होता. मात्र हा प्रभाव कमी कमी होणार होता.

यासाठी गावाला सतत धक्के देत राहाणे अत्यावश्यक होते हे सगुणाने जाणले होते. सकाळी ती अचानक तिरीमिरीत उठल्यासारखी उठून पंधरा वीस घरे पार करून एका घरात पोचली. रस्त्यात तिला सगळे नमणारेच भेटले. त्या घरात एका मुलाला फारच बरे नव्हते. सगुणाने कुणाचीही परवानगी न घेता तिथे प्रवेश केला. घरातल्यांना अस्मान ठेंगणे झाले. तिच्या पूजेला सुरुवात करणाऱ्यांना ती 'थांबा' असे म्हणून त्या मुलाकडे गेली अन म्हणाली ' याला गाईचे तूप घाला अन तिळाचे तेल छातीवर चोळा, गेल्या तीन दिवसात जर घरातल्या कुणी पाप केलेले नसेल तर हा बरा होईल' . या तिच्या विधानात तिने मुद्दाम एक ग्गोची करून ठेवलेली होती. बरा नाही झाला तर तुम्ही पाप केले होतेत म्हणायला ती मोकळी होती. पण ही गोची लक्षात येऊनही तिच्या प्रभावात ते लोक इतके होते की आधी त्यांनी तिला नमस्कार केला अन गाईचे तूप अन तिळाचे तेल आणायला धावले. सगुणा वेगात झोपडीत परतली. ती अजून दोन दिवस वाट पाहणार होती. जर तो मुलगा बरा नाही झाला तर इतर कुठल्यातरी घरात जाऊन काहीतरी असेच सांगणार होती. प्रभाव संपायच्या आत अंधारात खडॅ मारायलाच हवे होते. नाहीच जमले तर शेवटी 'आता येथे सगळे ठीक होणार आहे, आम्ही तुळजापुरला चाललो' असे म्हणून माहेरी पळून जायचा निर्धार झालेलाच होता.

आश्चर्य म्हणजे संध्याकाळी मुलाच्या तब्येतीला उतार पडल्याची बातमी गावात गाजली. पुन्हा झोपडीसमोर रांगा लागल्या. यावेळेस सगुणाने बाहेर यायला भाव खाल्ला. 'आम्ही नाय येणार, आम्ही उद्या दर्शन देणार' म्हणू लागली. जरासे तरी 'हपापल्यासारखे न वाटणे' आवश्यकच होते.

त्या मुलाच्या आईवडिलांनी पैसे, प्रसाद ठेवले अन त्यांनी शेजारच्यांना बोलवून कोंबडीचे जेवण केले. 'आम्ही पाप केलेले नाही' हे सांगण्यासाठी ते सर्व होते खरे.

सगुणा तिच्या या चमत्कारावर फार तर चार, पाच दिवस तगली असती. कारण गावात बरेच लोक आजारी होते, सगळ्यांचेच घरचे तिथे खेट्या मारत होते. सगळ्यांना कसे बरे करणार? बर, गावात एक वैद्यही होता. त्याने काही खरे बिरे शोधून काढले तर पुन्हा नवीनच वाद व्हायचा.

सगुणा पुन्हा तिसऱ्याच दिवशी बाहेर पडली. तिने वेशीवरच्या एका छोट्या देवळासमोर बैठक मारली. ते खंडोबाचे देऊळ होते. तिथे तिने जय मल्हार हा जप जोरात आरंभला व पुन्हा अंगात येण्याचा चमत्कार करून दाखवला. यावेळेसची ताकद जास्तच होती. चार दिवस सतत
पौष्टीक पदार्थ प्रसादात होते. तिला चांगलाच जोर आला. सगळे गाव जमा झाले. सगळ्यांनीच जप केला. तासाभराने सगुणाने घोषणा केली की 'आम्ही आलो आहोत हे कळल्यावर महाराज गावात येऊन गेले, ते इतरवेळेला अकोल्याला राहतात' हे ऐकल्यावर 'खंडोबा' दिसल्याच्या आनंदात
गावाने जयजयकार केला. पण हे पुरेसे नव्हते. तिने 'मागच्या शेताडीत वडाखाली त्यांनी गावाला भेट म्हणून काहीतरी ठेवले आहे म्हणाले, बघून या' असा
हुकूम सोडला. लोक लगबगीने धावले.  वडापाशी गर्दी झाली. काहीच मिळत नव्हते. तेवढ्यात कुणीतरी ओरडले. 'तोडा' ! एक सोन्याचा तोडा तिथे
सापडला. तो कालच सगुणाने अलगद दिसेल असा ठेवला होता. तो तिला लग्नात माहेरहून मिळाला होता. आता तो तोडा सासूला किंवा घरातल्या
कुणाला दिसू नये यासाठी ती धावली. तिने तो हातात घेतला व कंबरेपाशी खोचून ठेवला. 'उद्या या पैशातून गावासाठी महाप्रसाद करा' असा आदेश सोडून
ती झोपडीत गेली. लोक चर्चा करत निघून गेले. रात्री तिने गावातल्या सोनाराला बोलवले. 'याचे पैशे किती रं? ' या तिच्या प्रश्नावर त्याने अंदाजे
किंमत सांगीतली. त्यावर ती म्हणाली, 'हा तोडा कुणाला दावलास तर महाराज वाईट तळपट करतील तुझं' . ही धमकी ऐकून तो गारठला.
त्यावर ती म्हणाली, 'हा तोडा आम्हीच आमच्या भक्ताकडून पुन्हा विकत घेऊ, कुणाला विकायचा नाय, कुणाला दावायचा नाय'  त्याची मुंडी हालली. 'आन वर गावाचे शाप तुला लागतील ते येगळंच' . या धमकीने त्याचा चेहरा पाहून ती निश्चींत झाली. सोनाराने थोड्या वेळाने पैसे आणू दिले. त्यातली किरकोळ रक्कम तिने 'गुरवा'कडे देत त्याला कुणालातरी द्यायला सांगून 'उद्या महाप्रसाद हाय सांग गावाला' म्हणून सांगीतले. उरलेले पैसे पाहून सामसूम झाल्यावर ती खूप रडली. पण शानमध्ये जगता यावे यासाठी माहेरची भेट त्यागणे जरूरीचे होते.

असे प्रकार चालू झाले. कधी गावात नारदमुनी येऊन गेले तर कधी मारुती सगुणाशी गप्पा मारून गेला. त्यात सुमारे दहा अडचणींवर ती जे उपाय सांगायची त्यातील तीन ते चार तरी कर्मधर्मसंयोगाने सुटायच्याच. अंगात येणे तर हुकुमीच होते. आता तिचा गवगवा दोन चार जवळपासच्या गावात झाला. देऊळगावराजाच्या दैनिकाने मात्र अजून दखल घेतलेली नव्हती. सगुणा त्याचीच वाट पाहात होती.

आता ते एक छोटेसे तीर्थस्थळ व्हायच्या मार्गावर आले. व्यवसाय उभे राहिले. पान टपरी, मिसळ, आलू बोंडा, सावजी जेवण अन काय काय!

सगुणा कधीच अंजूच्या झोपडीतून खास बांधलेल्या मातीच्या चार खोल्यांच्या घरात आली होती. तिच्या हाताला गुण होता. तिला वाचा प्राप्त होती. तिचा माहेरचा तोडा तर कधीच परत आला होता. सासू, दीर अन जावा आता
इतक्या वचकून होत्या की त्यांच्याकडे कुणाचे लक्षच नव्हते. उलट त्याच भीतीने येता जाता कपाळाला हात लावून पुटपुटायच्या. माहेरचे लोक आता
शानमध्ये यायला लागले. त्यांच्या स्वागताला फारच महत्त्व आले. त्यात पुन्हा रस्सीखेच सुरू झाली. सगुणामातेचे कुटुंबीय आमच्याकडे राहतात की तुमच्याकडे यावर वाद होऊ लागले.

त्यात भाट निर्माण झाले. पूजेची, दर्शनाची कंत्राटे घेतली जाऊ लागली. लोकांच्या असंख्य अडचणी सगुणा ऐकू लागली. आपल्याबाबतीत जे झाले त्याहूनही अनेक भयंकर प्रकार जगात आहेत हे तिला समजले. तिने परतफेड म्हणून आपल्या एका खोलीत अंजूला येणाऱ्या नैवेद्यरुपी दानाचा हिशोब ठेवण्यासाठी नियुक्त केले. रात्री मात्र अंजूला ती परत पाठवायची. न जाणो डोळा लागला अन कशामुळे तरी खरे स्वरूप कळले तर?

अन एक दिवस तिच्या सासरी जोरदार भांडणे झाली. मोठ्या जावेने दोन नंबरच्या जावेला बदडले. दोन नंबरचा दीर जरा शांत असल्यामुळे तो फक्त मध्ये पडला. हे सगुणाला कळल्यावर तिला हवी ती संधी मिळाली.

सगुणाने आज 'या कुटुंबाचा पंचनामा होणार हाय' असे फर्मान जारी केले. सगळे 'देवळासमोर' जमले. हा प्रकार शंकरला जन्मठेप झाल्यानंतर जवळपास वर्षाने होत असल्यामुळे व मध्ये सगुनाचे अनेक चमत्कार गावाने पाहिलेले असल्यामुळे हा सूड असेल अशी शंका कुणालाच आली नाही.

'या घरातील या नवरा बायकोंन्ला ह्य घर मिळावं, आन संपत्ती मिळावी, या विधवेला त्या तिकडं वेगळ्या झोपडीत ठिवा अन या म्हातारीला हाकलून द्या, या विधवेला गावाने शिळे खायला द्या, आन ते नवरा बायको हाय त्यांना या नवरा बायकोंचे शेत करून मजूरीवर राहायला सांगा'

खरे तर एखाद्या जज्जच्या आविर्भावात तिने हा निर्णय घेऊन टाकला होता. यावर वकील दिले जातात अन आपलेही पितळ उघडे पडू शकते हे ती विसरली. भावनेच्या भरात तिने एका क्षणात चार वर्षांचा सूड पूर्ण केला. तिला सतत साथ देणारी दोन नंबरची वहिनी अन ते दीर यांचे तिने भले करून टाकले.

यावर सासूने हंबरडा फोडला तर विधवा जाऊ आक्रमक झाली. 'अवं ही द्येवी बिवी न्हाय, रांड हाय रांड, आमचे घर नासवलेच आता आविष्य नासवतीय' असे म्हणून ती धावली. सगुणामातेच्या भक्तांनी तिला धरली अन चांगल्या चार लगावल्या. दोघींना गावातल्या बायकांनी पिटून काढले. म्हातारी रात्रीचीच गावाबाहेर पळून गेली तर विधवा जाऊ कशीतरी एका घरात जागा मिळवून राहिली. तीन नंबरचे दीर जाऊ भेदरून उभे होते त्यांनी सगुनामातेला नमस्कार केला व सूट मागीतली. सगुणामातेने 'पाव शेत घ्या तुम्हाला' अशी सूट दिली. दोन नंबरच्या दीर जाऊ यांनी मात्र मनापासून नमस्कार केला.

सगुणाच्या आयुष्यातील एक अध्याय संपला होता. खरे तर हा अवतारही आता संपायला हवा होता. पण चटक लागलेली होती. पाच-सहाशे लोकांवर आपण एकटे राज्य करू शकतो याची चटक. सगुणा आता बदलली होती. गर्विष्ठ झालेली होती. आपल्या एका फटकाऱ्यात आपले सासर उद्ध्वस्त झाले हे पाहून तिला अत्यानंद होणे साहजिक होते पण हे आपण कुणाच्याही बाबतीत करू शकतो हे गावातल्यांना समजले आहे या भावनेने ती बेदरकार झालेली होती.

एक दिवस सगुणाने एका माणसाला ढोपरांवर चालत दर्शनाला येण्याची शिक्षा दिली. तो बिचारा गावभीतीने आलाही.

आधी अंगात येणाऱ्या बायका आता कधीच 'साध्यासुध्या गृहिणी' ठरलेल्या होत्या. त्यांचीही जाहीर निंदा गाववाले करायचे. 'अंगात येतं न्ह्याय व्हय तुमच्या द्येव? हा हा हा'!

अजून काही महिने गेले. आता सगुणादेवी हेच त्या गावाचे भूषण ठरले होते. बोराटेवाडी हे नाव बदलून सगुणानगर करावे काय यावर काहींचा विचार चाललेला पाहून सगुणा फारच सुखावली. आपणही तसेच राहायला हवे या भावनेतून तिने एका कंत्राटदाराला भेटायला बोलावले. आपल्या घराबाहेर एक मोठे कुंपण, घरात काही डागडुजी अशी अनेक कामे त्याला सांगीतली. तो अकोल्याचा राहणारा होता. डोंगरातल्या जमीनी पाहून तेथे काही धनाढ्य लोकांची फार्म हाउसेस बांधता येतील का हे पाहणाऱ्या कंपनीने त्याला बोराटेवाडी व आजुबाजूच्या काही गावांचा सर्व्हे करायला सांगीतला होता. अर्थातच, बोराटेवाडीत येऊन सगुणादेवींचे दर्शन घेणार नाही असा कुणी माणूस असेल काय? तोही आला. त्याच्या कामापेक्षा सगुणाचेच काम असल्याने त्याला लवकर प्रवेश मिळाला. त्याच्या प्रवेशप्रक्रियेमध्ये एरवीचे भाट, गुरव आवश्यकच नव्हते. त्याने प्रथम सगुणादेवीला नमस्कार केला. आश्चर्यकारकरीत्या 'ही जिवंत बाई आहे' हे त्याला तिचे दर्शन घेतानाच समजले. फारशी खोलवर चर्चा केलेली नसल्यामुळे 'बोराटेवाडीत सगुणादेवीचे दर्शन घ्यायला विसरू नका' एवढाच सल्ला तो ऐकत राहात होता. समोरची स्त्री तर हालती बोलती होती की? मग त्याने आणलेला प्रसाद तिच्या समोर ठेवला व दानाची रक्कम दानपेटीत टाकली. सगुणाने अत्यंत प्रसन्ना वगैरे झाल्यासारखे भाव चेहऱ्यावर आणत त्याला अंजूकडे पाठवले. अंजूने सगुणादेवीच्या मनातील कामे सांगीतल्यावर त्याने 'हे कंत्राट कंपनीला कशाला द्यायचे, आपणच नफा कमवू' या हेतून तीनच तासात आपला प्रस्ताव मांडला. सगुणाला पैशाची कमतरता नव्हतीच, पण देवीची सहाय्यिका घासाघीस करते असे वाटू नये म्हणून तिने अंजू काही बोलायच्या आधीच 'तथास्तू' शैलीमध्ये होकार प्रदर्शित केला.

त्या कंत्राटदाराचे नाव महेश  होते, पण त्याला भैय्या भणतात असे त्याने सांगीतले अन सगळे त्याला भैय्याच म्हणू लागले.

या भैय्याने पंधरा दिवसात आपल्या कंपनीला 'फार्म हाउसेसबाबतचा स्टडी चालू आहे' असे सांगत इकडे येऊन काम सुरू केले. परत गेल्यावर मात्र तो सुट्टिचाच इकडे यायला लागला. हे काम जवळपास दोन महिने चालणार होते. दर आठवड्याला भैय्या यायला लागला. आता गावात तो सुपरिचित होताच. पण भैय्या जात्याच हुषारही होता. सगुणादेवीकडून गावाचा कायापालट करण्याचा आशीर्वाद मिळवून त्यांच्याच पैशाने आपणही नफा मिळवू शकतो हे लक्षात आल्यावर त्याने तो विषय अंजूकडे काढला. सगुणादेवींना त्यात स्वतःचाच फायदा दिसला. देवीसाठी आसपासची चार पाच गावे वर्गणी काढून काहीतरी करू शकतील व त्यातून आपल्याकडे संपत्तीचा नवा ओघ येईल हे सगुणाने जाणले.

जरासा वेळ काढून सगुणाने भैय्याला बोलवून त्याला 'या कामात दैवी हेतू आहे' असे सांगीतले. भैय्याने कंपनीत राजीनामा दिला व पूर्णवेळ तो
आधी देवींचे स्वतःचे काम व नंतर गावाच्या कामाबाबत चर्चा, वर्गणी जमवणे असे प्रकार करू लागला.

भैय्या आता गावातच राहात होता. मात्र बराच वेळ त्याला 'सगुणा आश्रमावर' काढायला लागायचा. त्याला मिळणारा देवीचा आध्यात्मिक सहवास पाहून त्यालाही बऱ्यापैकी मानसन्मान प्राप्त झाला. भैय्या खुष झाला. देवीला खुष ठेवणे हे जीवितकार्य असल्याप्रमाणे वागू लागला.

त्याने एक दिवस एक विधान केले. 'मातेला आपण एक आदरार्थी नाव देऊयात, गुणाक्का, मी भैय्या व त्या गुणाक्का' या विधानाला विरोध करण्याचे तसे कुणालाच कारण नव्हते. सगुणेला भक्त आपल्याला कोणत्या नावाने ओळखतात याच्याशी कर्तव्यच नव्हते, भक्त भक्ती करतात इतकेच तिला महत्त्वाचे होते.

देवी सगुणा ची गुणाक्का झाली. भैय्या तिचा दूत झाला. तसे गुणाक्कानेच जाहीर करून टाकले. आता देवीला मिळणाऱ्या प्रसादातील कोंबडी वगैरे भैय्याला मिळू लागली. त्यात आणखीन भैय्याने अकोल्याच्या एक दोन धनिकांना तिथे आणून काहीतरी अडचण सांगण्यास भाग पाडले. ते दोघे भलतेच प्रभावित होऊन बऱ्यापैकी दान देऊन गेले. भैय्या आता हळूहळू गुणाक्काचा ताईत बनू लागला. आश्रमाचे काम जोरात चालू होतेच.

आज अंजू सकाळी येऊ शकली नव्हती. दुपारी एकदमच येऊन सर्व काम करावे असे तिने ठरवले होते. नाही म्हंटले तरी तिलाही गावात आता भरपूरच महत्त्व होते. पण ती मनाने साधीच राहिली होती. ती आश्रमात आली तेव्हा गुणाक्का विश्रांती घेत होती. साक्षात भवानी मातेचा अवतार विश्रांती घेतो आहे म्हंटल्यावर काय, अंजू पण जरा स्थिरावली. त्यातच तिला आतून काहीतरी आवाज आला म्हणून तिला वाटले
की देवी बहुधा जाग्याच असाव्यात. ती आत गेली तेव्हा देवींच्या खोलीचे दार आतून लोटलेले होते. ती परत निघाली तेव्हा खिदळण्याचे आवाज आले म्हणून थबकली.
देवी 'सगुणा' असतानाही अन नंतरही कधीच खिदळलेली तिला माहीत नव्हते.

जरा वेळ थांबून शेवटी तिने एका फटीतून पाहिले. भैय्या अन सगुणा अध्यात्मातून मोहाकडे प्रवास करत होते. एकमेकांच्या मिठीत त्यांचा आनंद मावत नव्हता. अंजूला चक्कर यायची बाकी राहिली होती. त्यात तिच्या हाताने चुकून दार ढकलले गेले. भैय्याने व सगुणाने एकदम तिला पाहिले अन ते गांगरूनच गेले. एका क्षणात 'ही राहिली तर आपले काही खरे नाही' या विचाराने सगुणा तशीच तिच्यावर धावली. पण अंजू निसटली. बाहेर आली तेव्हा दुपारच्या दर्शनासाठी काही भक्त येऊन खोळंबलेले होते. अंजू सुसाट वेगाने व भयातिरेकाने धावत बाहेर आलेली पाहून ते चक्रावतायत तोच कोणतेही भान न राहिल्यामुळे सगुणाही धाडकन तिथे पोचली. देवीचे हे असले दर्शन घ्यायला कुणीच आले नव्हते. पण दोन बायकांमध्ये हे काय चालले असावे याचा उलगडा होत नसतानाच अचानक आतून भैय्या बनियन व पँटवर प्रकटला.

अख्ख्या गावात बोंबाबोंब झाली. सगळे लोक जमा झाले सगुणाने चीजवस्तू जमा करायला घेतल्या. पण बाहेर गलका वाढू लागला.  भैय्या घाबरून शेळीसारखा बसलेला होता. शेवटी सगुणाने शक्कल लढवली. 'मी देवी व्हऊन भाइर जात्ये, तू लयी मागनं ये' असे म्हणून ती देवीचा वेश करू लागली. तेवढ्यात खोलीच्या दारावरच थापा पडू लागल्या. सगुणाच्या पायातले बळच गेले. भैय्याने दार उघडल्यावर आत घुसलेल्या लोकांनी त्याला मरेस्तोवर मारायला सुरुवात केली. सगुणाने तीच संधी समजून डोक्यावरून पदर घेत दारातून कण्णी कापली.

बाहेर अनेक बायका होत्या, त्यांच्यात मिसळायची तिला भीती वाटत होती पण पर्यायच नव्हता. ती त्या बायकांमध्ये मिसळून हळू हळू मागे मागे सरकू लागली. तेवढ्यात भैय्याला मारत मारत लोकांनी बाहेर आणले. त्या धक्काबुक्कीमध्ये सगुणाच्या तोंडावरून पदर बाजूला झाला अन शेजारया बाईला ती दिसली. त्या बाईने बोंबाबोंब करताच सगुणा सापडली.

सगुणाला बाहेर आणण्यात आले. भर गावासमोर तिला बायका मारू लागल्या. सगुणा विव्हळत होती.

त्यात अंजूने कुठुनतरी 'पोलीस आले, पोलिस आले' अशी बोंब मारली. खोटीच! लोक सैरावैरा पळू लागले. संधी साधून आहे त्या परिस्थितीत सगुणा गावातून निसटली. वेशीपाशी तिला तिची सासू अन विधवा जाऊ कुठल्यातरी माणसाला घेऊन येताना दिसल्या. घाबरून ती खडका आड लपली. त्या दोघींना अजून गावातल्या भानगडीचा पत्ताच नव्हता. त्या गेल्यावर ती पुन्हा पळाली तेव्हा लांबून गावातले लोक पळत येत असलेले तिला दिसले.

तिने आज फारच वाकडी वाट घेतली. देऊळगावराजापर्यंत आपण गावातल्यांच्या पुढे पोचणार नाही हे तिला समजून चुकले. अत्यंत काट्याकुट्यांची वाट घेत ती जवळपास दोन तासांनी स्थानकापाशी पोचली तेव्हाही गावातले काही लोक तिथे तिचा शोध घेत असलेले दिसले. कशीबशी ती अंधार होईपर्यंत लपून बसली. अंधार झाल्यावर ती 'अगदी निघायच्या बेतात असलेली एस. टी.' शोधू लागली. आजही आपल्याला अंजूनेच वाचवले हे ती विसरू शकत नव्हती.

शेवटी नागपूर गाडीत प्रवेश मिळाल्यावर तिने जवळ कशीबशी जपलेली चीजवस्तू तपासली. काही सोने अन चारशे ते पाचशे रुपये आहेत म्हंटल्यावर ती
निश्चींत झाली.