आयुष्यात एकदा तरी भागवतकथा ऐकावी असे म्हणतात. मला आपल्या आयुष्यात हा योग किमान साठी-सत्तरी उलटल्याशिवाय येणार नाही ह्याची खात्री होती. परंतु बहुधा परमेश्वराला मला त्या भक्तिसागरात लवकरात लवकर बुचकळून काढायचे असावे. परिणामी माझ्या अपेक्षेपेक्षा फारच लवकर, म्हणजे वयाच्या तिशीच्या आतच तो सुवर्णयोग जुळून आला.
माझ्या मैत्रिणीच्या आईने तिच्या कालवश झालेल्या सासूसासऱ्यांच्या पुण्यस्मरणार्थ हरिद्वार येथे ऐन मे महिन्यात आयोजित केलेल्या भागवत सप्ताहाचे मला व माझ्या आईला साग्रसंगीत आग्रहाचे निमंत्रण दिले. मी उन्हाळ्याचे कारण पुढे करणार, तोच तिने माझ्यासाठी खास ए. सी. प्रवास व ए. सी. खोलीची व्यवस्था करू असे भरघोस आश्वासन दिले. आधीच मला भागवतकथासप्ताहा विषयी अपार उत्कंठा होती, त्यात महाराष्ट्रातील अतिशय नामवंत भागवत कथाकारांना मैत्रिणीच्या आईने कथेसाठी आमंत्रित केले होते. चोख बडदास्त ठेवली जाण्याची खात्री होती आणि सर्वात कळस म्हणजे हरिद्वारला गंगेच्या काठापासून थोड्या अंतरावरच कथासप्ताहाचे स्थळ होते! सर्वच गोष्टी एवढ्या सुंदर जुळून आल्यावर पुढचे दहा दिवस अविस्मरणीय रीतीने पार पडणार याची मला पक्की खात्री होती आणि झालेही तसेच!
१४ मे ला पहाटे चार वाजता पुण्याहून गोवा-निजामुद्दीन एक्सप्रेस ने आमचा जवळपास शंभर - दीडशे लोकांचा जथा निघणार होता. आमच्यापैकी चार-पाच लोक सोडले तर बाकी सर्व मैत्रिणीचे नातेवाईक होते. १३ मे ला सायंकाळी माझा नाशिक येथे कार्यक्रम होता. कार्यक्रम रात्री उशीरा संपणार व मला तर लगेच पहाटेपर्यंत पुणे स्टेशन गाठायचे होते. कार्यक्रमाच्या आयोजकांना मी माझी अडचण सांगितली. त्यांनीही तत्परतेने माझ्या दिमतीला त्यांची गाडी व विश्वासू ड्रायव्हर दिला व सांगितले की माझा ड्रायव्हर तुम्हाला पहाटेपर्यंत वेळेत ट्रेनमध्ये बसवून देईल. आणि त्यांनी त्यांचा शब्द खरा केला. रात्री उशीरा ११ वाजता कार्यक्रम संपल्यावर मी गाडीत बसले आणि आयोजकांच्या ड्रायव्हरने कोठेही गाडी न थांबविता मला ठीक पहाटे पावणेचार पर्यंत पुणे रेल्वे स्टेशन वर आणून देखील सोडले होते!
आमची ट्रेन आल्यावर सगळेजण भराभर गाडीत चढलो. माझा व आईचा ए. सी. डबा असल्याने तिथे फारशी गर्दी नव्हती. रात्रभर जागून काढल्याने मला कधी एकदा बर्थ वर देह लोटून देतो व सुखनिद्रेचा अनुभव घेतो ह्याची घाई झाली होती. पण जेमतेम तास-दोन तास डोळा लागला असेल तोवर आमच्या यजमान परिवाराने त्यांच्या आदरातिथ्याची चुणूक दाखवायला सुरुवात केली. प्रथम गरमागरम वाफाळता चहा आला, त्या नंतर नाश्त्याची पाकिटे व बिसलेरी पाण्याच्या बाटल्या घेऊन चक्क यजमान स्वतः हजर झाले. गाडीतील त्यांच्या सर्व नातेवाईकांना ते जातीने नाश्त्याची पाकिटे व पाण्याच्या बाटल्या पुरवित होते. मग दर अर्ध्या तासाने खाण्याच्या विविध पदार्थांची सरबत्तीच सुरू झाली. पोहे, कचोरी, समोसे, मिठाया, ज्यूस, चहा, पाणी, ढोकळा..... माणसाने खायचे खायचे म्हणून किती खावे? एक तर उन्हाळ्याचे दिवस आणि त्यातून हा आदरातिथ्याचा महापूर....!!!! थोड्याच वेळात मला ट्रिक लक्षात आली. आपण एखाद्या पदार्थाला नाही म्हटले तर तो पदार्थ घेऊन येणारे इतका आग्रह करीत की आपल्यालाच लाजायला होत असे. मग त्यांचा असा आग्रह 'सहन' करण्यापेक्षा तो पदार्थ मुकाट्याने ठेवून घ्यायला सुरुवात केली. महाराष्ट्रातील प्रत्येक मोठ्या स्टेशनला आमच्या यजमानांचे अजून नातेवाईक ह्या यात्रेत सामील होत होते व येताना त्यांच्याबरोबर खाद्यपदार्थांचे मोठमोठे बॉक्सेस घेऊन येत होते!!
एका प्रकारे अतिशय सुरेख नियोजन केले होते ह्या सफरीचे! कोणालाही कसलीही उणीव भासू नये, त्रास होऊ नये ह्यासाठी यजमान परिवार व त्यांचे नातेवाईक खरोखरीच मनापासून झटत होते. त्यांच्या दिवसभरात ट्रेनमधून असंख्य चकरा झाल्या असतील व रात्रीही त्यांच्यातील पुरुषमंडळी जागरूकतेने डब्यांमधून गस्त घालत होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्ली आले आणि एवढा वेळ ए. सी. चे सुख घेतलेल्या मला दिल्लीच्या उन्हाळ्याची जाणीव होऊ लागली. सर्वांनी स्टेशनवरील क्लोकरूममध्येच अंघोळी-पांघोळी उरकून घेतल्या. भुकेचा तर प्रश्नच नव्हता एवढी आमची पोटे आदल्या दिवशीच्या अखंड खाद्य माऱ्याने तुडुंब भरली होती. तरीही ठराविक अंतराने खाद्यपदार्थ आमच्या दिशेने येतच होते!
अखेर हरिद्वारला जायच्या गाडीत बसलो. एव्हाना तीन बसेस भरतील एवढी आमची जनसंख्या होती.
माहोल पूर्ण पिकनिकचा, धमालीचा होता. गाणी, गप्पा, अंताक्षरी....प्रवासाचा पहिला टप्पा सुरळीत पार पडल्याने सगळेच जरा निवांत झाले होते. कडकडीत उन्हात प्रवास केल्यावर पुन्हा आमच्या बसेस मुख्य रस्त्यापासून जवळच एका निसर्गरम्य स्थळी दुपारच्या भोजनासाठी थांबल्या. येथे मात्र यजमान परिवाराने आतिथ्याची शर्थच केली होती. आमच्या जवळपास दोनशे लोकांच्या तांड्यासाठी त्यांनी दिल्लीहून एका आचाऱ्यालाच पाचारण केले होते, आणि आम्ही जेव्हा भोजनस्थळी पोचलो तेव्हा आचाऱ्याच्या मदतनीसांनी व यजमानांच्या अजून काही नातेवाईकांनी पाहुणचाराची जय्यत तयारी केली होती. झाडांच्या सावल्यांत, प्लॅस्टिकच्या खुर्च्यांवर बसून आम्ही तळपत्या सूर्याच्या साक्षीने पुरी, भाजी, हलवा, पुलाव, मठ्ठा, लोणचे अशा शाही भोजनाचा आस्वाद घेतला व पुढे निघालो. आतापर्यंत माझ्या मनात आपण भागवतकथेला चाललोय की
खाद्ययात्रेला, असे सवाल येऊ लागले होते. परंतु 'आलीया भोगासी असावे सादर' अशा अर्थाचे थोर विचार करत आला क्षण सुखाचा मानण्यात मला धन्यता वाटू लागली होती. मजल-दरमजल करीत एकदाचे आम्ही हरिद्वारला पोहोचलो. सायंकाळची वेळ होती. गंगेच्या दर्शनाची घाई झाली होती. यजमान परिवाराने त्यांच्या समाजाच्या अद्ययावत धर्मशाळेत आम्हा सर्वांसाठी खोल्या आरक्षित केल्या होत्या. पण त्या खोल्या ताब्यात घेईपर्यंत धीर कोणाला होता! सर्वांनी बॅगा लॉबीतच सोडल्या व मिळेल त्या वाहनाने गंगातीरी पोहोचलो. "मातस्त्वं परमासि शक्तिरतुला सर्वाश्रया पावनी । लोकानां सुखमोक्षदाखिलजगत्संवंद्यपादांबुजा ॥ " हे गंगे, हे माते, हे जगत जननी, तुझ्या चरणकमलांचे दर्शन घेण्यास सारे विश्व व्याकुळले असते... त्या तुझ्या चरणांशी मी नतमस्तक आहे! सायंकाळचे ते गंगेचे मनोहर रुप डोळ्यांत साठवित हुरहुरत्या मनांनी आम्ही पुनश्च मुक्कामी पोहोचलो. वचन दिल्याप्रमाणे खरोखरीच यजमानांनी माझ्या खोलीत विशेष ए. सी. ची सोय केली होती! स्वर्गसुख ह्यापेक्षा वेगळं काय असतं? खोलीत जाऊन जरा फ्रेश होत होतो तोवर रात्रीच्या जेवणाची वर्दी आली. खरे तर आता प्रवासाचा शीण जाणवत होता. फारसे खायची पण इच्छा नव्हती. मात्र गेलो नसतो तर यजमानांना वाईट वाटले असते. एवं च काय, मी व आई खाली आवारात उभारलेल्या खास भोजनशाळेकडे निघालो.
सर्व पाहुण्यांच्या स्वागताची चोख तयारी केलेली दिसत होती. मांडवाबाहेरही लोकांना बसायला खुर्च्या टेबले मांडली होती. मांडवात तर सर्वत्र चकचकाटच होता. यजमानांच्या जवळच्या परिवारातील सर्व पुरुष जातीने पगडी, फेटे घालून स्वागताला उभे होते. वयस्कर लोकांचे पायी पडून आशीर्वाद घेण्यात येत होते. प्रत्येक माणूस व्यवस्थित जेवतोय ना ह्याकडे घरातील स्त्रियांचे बारीक लक्ष होते. आम्हाला बरेचसे लोक अनोळखी होते. मग त्यांच्या परिवारातील विविध लोक आमची ओळख स्वतःहून करून घेत होते. आमचा अंदाज होता, रात्री प्रवास करून आल्यावर साधे कढीभाताचे जेवण असेल. पण येथेही त्यांनी साग्रसंगीत जेवणाचे आयोजन केले होते.
मी कसेबसे दोन घास खाल्ले. सर्व स्वयंपाक साजूक तुपातील.... जेवणात भरपूर तळलेल्या, तुपातील पदार्थांची रेलचेल... असले जेवण मला नक्कीच मानवणारे नव्हते. खोलीवर परत आले पण अस्वस्थ वाटू लागले. जरा शतपावली करावी म्हणून बाहेर आले तोच माझ्यासाठी खास निरोप आला की तुम्हाला यजमानीण बाई शोधत आहेत. आता नवे काय? असे वाटून काहीशा बुचकळ्यानेच मी यजमानीण बाईंना गाठले. मला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावरचे टेन्शनचे ढग जरा मावळलेले दिसले. "बरं झालं बाई तू भेटलीस ते! एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय... बघ ना तुला काही करता आलं तर.... " मला काहीच उलगडा होईना.... आता कसला प्रॉब्लेम? आणि मी काय मदत करणार?
माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहून त्या उत्तरल्या, " अगं, आमच्या भागवत कथा सांगणाऱ्या महाराजांबरोबर त्यांना साथ करणारी गायक, वादक मंडळी असतात. आमचे महाराज वेगळ्या ट्रेनने आले आणि त्या गायक-वादक मंडळींपैकी मुख्य गायकांची ट्रेन चुकली. गाड्यांना गर्दी एवढी आहे की ते लगेच येऊ शकतील असे वाटत नाही. तर तू गाशील का त्यांच्या ऐवजी? " आता थक्क होण्याची माझी खेप होती. मी जरा चाचरतच उद्गारले, "पण मला तुमची ती भजने, गाणी कशी येणार? मला तर काही माहीत नाही.... " ताबडतोब त्यांनी माझा हात धरला व मला लगोलग त्यांच्या महाराजांच्या कक्षात घेऊन गेल्या. महाराजांना त्यांनी अगोदर सांगून ठेवले असावे, कारण त्यांनीही माझे खुल्या हास्याने स्वागत केले. मी माझी अडचण सांगितल्यावर त्यांनी, ''तुम कुछ चिंता मत करो, यह किताब रख लो । बहुत ही सरल, सीधे भजन है । गानेमें कोई दिक्कत नही होगी तुम्हे । बस, मैं जैसा गाता हूं उसे ठीक ठीक वैसेही फॉलो करना... यदी कुछ यहां वहां हो गया तो हमारे और बाकी साथी सम्हाल लेंगे.... तुम बस मन लगा के गाना । राधेश्यामके चरणोंमें तुम्हारी सेवा अर्पन करना ।" इत्यादी इत्यादी बोलून मला अगदी निरुत्तर करून सोडले. झाले! एका अपरिचित ठिकाणी, अपरिचित समूहाबरोबर, अपरिचित गाण्यांना गायचे मी कबूल करून बसले.....
दुसऱ्या दिवशीपासून माझ्या एका अनोख्या व्रताचा आरंभ झाला.... येथील जेवण, खाणे अतिशय रुचकर होते, परंतु जड होते. तुपातील पदार्थ सकाळ, दुपार, संध्याकाळ खाण्याची सवय नसल्याने असे खाणे घशाशी येत असे. त्यात मी गायचे कबूल केल्यामुळे सगळीच पंचाईत! मग सकाळी माफक फलाहार करायचा, गंगेत डुबकी घ्यायची, खोलीवर येऊन आवरायचे व त्यानंतर भागवत कथा सप्ताह स्थळी जाऊन इतर वादकांबरोबर त्या त्या सत्रात म्हणावयाच्या भजनांची व आरत्यांची तालीम करायची.. अल्प वेळातच सत्र सुरू झाले की जागरूकतेने कथेचा आनंद लुटतानाच महाराजांच्या इशाऱ्याकडे लक्ष ठेवायचे, योग्य ठिकाणी गायचे, आरत्या म्हणायच्या असा कार्यक्रम सुरू झाला. दुपारच्या जेवणानंतरच्या सत्रात लोक हमखास डुलक्या काढायचे. पण मी भागवत कथा पहिल्यांदाच ऐकत होते. महाराजांची ओघवती, रसाळ वाणी, मनोरम हृदयस्पर्शी कथापट, कसलेल्या वादकांची प्रोत्साहक साथ आणि शेवटच्या कर्पूरारतीत रोमांरोमांत जाणवणारे चैतन्य..... भक्ती, भक्ती म्हणतात ती हीच काय? तासनतास एकाच ठिकाणी बसल्यावरही पाठीला रग न लागणे, थकावट न जाणवणे, चित्तवृत्ती आल्हादित राहणे, कथेत इतके गुंगून जाणे की वेळेचेही भान न उरणे.... मला खूप मजा येत होती. सकाळ सायंकाळ गंगेचे दर्शन, गंगास्नान, गंगारतीचा सोहोळा अशी पर्वणी मिळत होती. जवळपास खूप सुंदर देवळे होती, तिथेही गेल्यावर उल्हसित वाटत असे. आणि गाण्याच्या ह्या अनपेक्षित संधीमुळे माझा रोजचा आहार अगदीच मित झाला होता. दुपारी व सायंकाळी घासभर ताकभात खायचा (फक्त त्याच एका पदार्थात साजूक तूप नसायचे! ) आणि इतर लोकांना अक्षरशः छप्पनभोगांवर ताव मारताना निरिच्छ वृत्तीने पाहायचे हाच माझा खाण्यापिण्याशी त्या दहा दिवसांत आलेला संबंध! नाही म्हणायला एके सायंकाळी आम्ही समोरच्या विशाल निसर्गरम्य क्षेत्र व्यापलेल्या हनुमानाच्या सुंदर मंदिरात गेल्यावर तेथील मुख्य पुजाऱ्यांनी प्रसादाचा खिचडी व शिऱ्याचा द्रोण हातात ठेवला.... प्रसादच तो! त्यामुळे तो खाल्ल्यावर घसा व पोट दोन्ही शांत राहिले.
एक दिवस आमच्याबरोबर पुण्याहून आलेल्यांपैकी एकाने हार की पोडीवरील विशिष्ट ठिकाणी मिळणाऱ्या चाट-कचोरी-पकोड्यांची तोंड फाटेस्तोवर स्तुती केली. (म्हणजे हे महाशय रोज आमच्याबरोबर सकाळ-सायंकाळ भोजनशाळेत जेवून पुन्हा खवय्येगिरी करायला भ्रमंती करत होते तर! ) साहजिकच मनात ते ते पदार्थ चाखण्याची उत्सुकता निर्माण झाली. त्या ठिकाणी जाऊन एका पदार्थाची ऑर्डर दिली... म्हटले बघू या, जर चव आवडली तर पुढची ऑर्डर देऊ. पण हाय! येथेही मला आडवे आले 'सरसोंचे तेल'! तेथील सर्व व्यंजने एकतर सरसोंच्या तेलात किंवा साजूक तुपात तळली जात होती. पहिल्या घासालाच माझा चेहरा बघण्यासारखा झाला आणि बहुधा हा सप्ताह पूर्ण होईपर्यंत आपली 'ताकभात व्रता'तून सुटका नाही ह्याची खात्री पटली.
आहाराची किरकोळ बाब सोडली तर मला खूप मजा येत होती. रोजची कथा संपल्यावर पुढच्या कथेची उत्सुकता लागत असे. नव्या नव्या चालींची, ब्रज शैलीची, त्या त्या उच्चारांसहित भजने गाताना ही मजा येत असे. कधी मी थोडी चुकले तरी महाराज व श्रोते सावरून घेत असत. नंतर दोन दिवस अचानक महाराजांचा आवाज बसला. त्याही परिस्थितीत ते मोठ्या कष्टाने, संयमाने व धीराने कथा सांगत होते. माझ्यावरची गाण्याची जबाबदारी अजूनच वाढली होती. दुसरीकडे त्यांच्या मुख्य गायकाचा गावाहून निरोप आला होता की तो काही गाड्यांच्या गर्दीमुळे येऊ शकत नाही. आमच्या यजमानीण बाई माझ्यावर विलक्षण खूश होत्या. त्या व त्यांच्या परिवारातील इतर लोक येऊन माझ्या गाण्याची, अडचणीच्या वेळी मदत करण्याची स्तुती करून मला संकोचून टाकत असत. खरे तर मी वेगळे काहीच करत नव्हते! पण त्या लोकांना त्याचे अतिशय अप्रूप वाटत होते हेच खरे!
बघता बघता दहा दिवस भुर्रकन उडून गेले. कथा मोठ्या जल्लोषात, उत्सवात समाप्त झाली. त्या रात्री आयोजित केलेला भोजन समारंभ आतापर्यंतच्या भोजनांना लाजवेल एवढा जंगी, शाही होता.
मी अर्थातच ताकभाताच्या डायटवर होते! दुसऱ्या दिवशी सर्व लोकांनी आपला मुक्काम हालविला. आम्हीही साश्रू नयनांनी गंगामाईचा निरोप घेतला.
तिच्याकडे पुन्हा लवकर बोलाव म्हणून प्रार्थना केली आणि निघालो. येताना आम्ही वेगवेगळे झालो होतो, कारण अनेकांचे पुढे इतर प्रवासाचे बेत होते. यजमान परिवार मागील सर्व आवरासवर करायला हरिद्वारलाच थांबले होते. ह्या खेपेस आमचा परतीचा प्रवास अतिशय शांत पार पडला. घरी पोचलो, अंघोळी उरकल्या, आवरले. बहिणीने जेवणाची ताटे घेतली होती. पानात वरणभात पाहून मला काय आनंद झाला ते वर्णन करणे कठीण आहे! गेले दहा दिवस सकाळ सायंकाळ दालबाटी, मालपुवा, छोले, कचोरी, समोसे, ढोकळे, गट्ट्याची भाजी, फाफडा, खाकरा, पकौडी वगैरे पदार्थ आणि मिष्टान्नांचे हारेच्या हारे पाहून थकलेल्या माझ्या मनाला व जिभेला घरच्या वरणभाताने जणू नवसंजीवनी मिळाली! ती सहल कायम स्मरणात राहील ती अविस्मरणीय अशा भागवत कथेच्या अनुभवाने, गंगेच्या मनोहारी सहवासाने आणि न भूतो न भविष्यति अशा अन्नवर्षावामुळे! आज ह्या घटनेला अनेक वर्षे लोटली. आमच्या यजमानांनी उदार पाहुणचार हा काय असतो हे त्यांच्या वर्तनातून दाखवून दिले आणि परमेश्वराने गंगेच्या तीरी भागवत कथेचे अविस्मरणीय श्रवण करताना मला अनोख्या अशा कृष्णप्रिय 'ताकभात' व्रताची ओळख करून दिली!!
--- अरुंधती कुलकर्णी