अंतर्नादच्या निमित्ताने...

१२ जानेवारी रोजी पुण्यात 'अंतर्नाद' नामक अभूतपूर्व असा २७५० हिंदुस्थानी शास्त्रीय गायकांचा सहभाग असलेला, पं. राजन-साजन मिश्रा, शंकर महादेवन, गायत्री अशोकन, चित्रा रॉय यांसारख्या दिग्गजांनी खुलविलेला संगीतमय विश्वविक्रमी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला.
आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकरजी यांचे सुरेख मार्गदर्शन व आनंदी उपस्थिती त्या निमित्ताने ७५,००० श्रोतृवर्गाच्या जनसमुदायाने अनुभवली.
संगीत सोहोळा सुंदरच झाला! गणेशाची आरती झाल्यावर 'श्री' रागातील सुरावटींनी श्रोत्यांना अंतर्मुख केले.
शंकर महादेवन यांच्या सुमधुर, चतुरस्त्र, सहज गायनाने व आलापीने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले.
त्यांनी गायलेले भोला शंकर भोला भजन व शंकरा रागातील आलाप त्यांच्या भरदार व लवचिक गायनाची साक्ष देणारे ठरले. गायत्रीच्या गायनातून शांत, मुलायम, सौहार्दपूर्ण व स्वरमधुर गायनाचा प्रत्यय आला, चित्रा यांनी आपली अदाकारी दर्शविली तर पं. राजन - साजन मिश्रांच्या 'बसंत बहार'ने कार्यक्रमात बहार आणली. शशी व्यास यांबरोबरच्या शर्वरी जमेनीसच्या सूत्रसंचालनासही रसिकांनी दाद दिली.
२७५० गायकांनी गायलेल्या व शंकर महादेवन ह्यांनी उत्स्फूर्तपणे पुढे चालू ठेवलेल्या 'हरी सुंदर नंद मुकुंदा' गाण्याच्या तालावर अनेक श्रोत्यांची पावले थिरकली.
कार्यक्रमाला अनेक राजकीय पुढारी, योगाचार्य, पोलिस अधिकारी, उद्योजक, कलावंतांनीही आपली उपस्थिती लावली होती.
एस. पी. कॉलेजचे मैदान तरुणाईचे प्राबल्य असलेल्या श्रोत्यांनी नुसते फुलून गेले होते.

श्री श्री रविशंकरजी यांनी ह्या निमित्ताने सर्व उपस्थितांना ध्यानाचा अप्रतिम अनुभव तर दिलाच, शिवाय सर्वांना शुभ-संदेश ही दिला.
त्यांनी देशी बीज, देशी गायी, स्त्रियांचा सन्मान, भारतीय मूल्ये व संस्कृती यांचे रक्षण करण्याचे सर्व उपस्थितांकडून वचन घेतले. रसायनमुक्त शेतीचे महत्त्व सांगितले, झीरो बजेट शेतीने जमीनीच्या व भूमिपुत्रांच्या होणाऱ्या कल्याणाला अधोरेखित केले. ते म्हणाले, "निसर्गसंवर्धन हे आपले प्रथम कर्तव्य आहे. शेतीमध्ये रासायनिक खतांच्या वापरामुळे निसर्गाचे नुकसान होते आहे, जर विषच पेरले तर उगवणारही विषच, त्यामुळे नैसर्गिक शेतीला प्राधान्य द्या. पूर्वजांनी दिलेली शिकवण ही आजच्या काळाचीही गरज आहे. गायींचे रक्षण करा, मुलीच्या जन्माचे स्वागत करीत महिलांचाही सन्मान राखा, निसर्गाचा आदर करा, आपल्या मूल्यांचा अभिमान बाळगा."

संगीताबद्दल बोलताना ते म्हणाले, संगीत हा जीवनाचा कणा आहे. सर्व सृष्टीत संगीत आहे. षडज हा मयूराचा स्वर आहे, रिषभ हा वृषभाचा (बैल, गाय), गंधार अजवर्गातील प्राणी (बोकड, शेळी इ. ), मध्यम हा क्रौंच पक्ष्याचा, पंचम कोकिळेचा, धैवत अश्वाचा, निषाद हत्तीचा स्वर आहे. सर्वात पातळ स्वर सर्वात ताकदवान प्राण्याचा, हत्तीचा आहे. परंतु मनुष्यात हे सर्व स्वर लावायची क्षमता आहे. त्याने त्याचा उत्तम उपयोग केला पाहिजे. प्रत्येक प्रकारच्या संगीतात शास्त्र आहे..... भारतीय संगीत अतिशय समृद्ध आहे. आता सध्याच्या व पुढच्या पिढीने ते पुढे नेण्याची आवश्यकता आहे. हजारो वर्षांची परंपरा असलेले अध्यात्म आणि संगीत ही भारताची संपत्ती आहे. विविध देशांमध्येही याविषयी प्रचंड कुतूहल असून, तेथील नागरिक याकडे आकर्षित होत आहेत. या संपत्तीचा अभिमान बाळगा, तिचे जतन करण्यासाठी पुढे या. तणावमुक्त जीवनासाठी संगीत आणि ध्यान आत्मसात करा.
भगवद्‌गीता गायली आहे, बोललेली नाही. स्वास्थ्य असलेला माणूस गुणगुणतो. तणावमुक्त मन गाणारे असते. शास्त्रीय संगीत हे ब्रह्मांडाशी जोडणारे आहे. संगीत हे मानवाला मिळालेले परमेश्‍वराचे वरदान असून, भारतीयांनी शास्त्रीय संगीताची ही परंपरा जतन करण्यासाठी प्रयत्न करावा.

सर्व गायकांनी मिळून गायलेले 'वंदे मातरम' व त्यात ७५००० पेक्षा अधिक श्रोत्यांनी घेतलेला सहभाग हे कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू ठरले. ह्या उच्चांकाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये केली जाणार असल्याचे कळते.

-- अरुंधती कुलकर्णी

कार्यक्रमाच्या काही चित्रफीतींचे दुवे खाली देत आहे.