प्रश्न सोडवा ....

आजच्या सकाळची ही बातमी इथे डकवतोय...

दुवा क्र. १

सर्वसामान्यांच्या मनात असणारी विज्ञानाची भीती नष्ट होउन, त्यांच्यातील वैज्ञानिक रुची वाढावी, यासाठी मराठी विज्ञान परिषदेतर्फे विज्ञान रंजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा स्पर्धेचे बारावे वर्ष आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, विशेष म्हणजे ती विनामूल्य आहे.

खाली दिलेल्या प्रश्नावलीतील प्रश्नांची उत्तरे स्वहस्ताक्षरात फुलस्केप कागदावर लिहून 20 फेब्रुवारीपर्यंत मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग, टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे 411030 या पत्त्यावर पाठवून द्यावीत असे आवाहन परिषदेचे कार्यवाह विनय रर यांनी केले आहे. विजेत्यांची नावे राष्ट्रीय विज्ञानदिनी (28 फेब्रुवारी) जाहीर करण्यात येणार आहेत.
स्पर्धकांचे शिक्षण आणि वय लक्षात घेउन त्यांना पुढीलप्रमाणे पुढावा गुण देण्यात येणार आहेत. अ) शिक्षण पाचवीपर्यंत (10), सातवीपर्यंत (9), दहावीपर्यंत (7), बारावीपर्यंत (5), पदवी (3), शास्त्रशाखा (0) ब) वय वर्षे : 13 पर्यंत (6), 14 ते 16 (4), 17 ते 20 (2), 41 ते 60 (2), 61 ते 80 (4) आणि 81 हून जास्त (6). स्पर्धकांनी आपल्या उत्तर पत्रिकेसोबत स्वतंत्र कागदावर आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी, ई मेल, जन्मतारीख, शिक्षण, व्यवसाय, पुढावा गुण (वरीलप्रमाणे) आदी माहिती द्यावी.
 
प्रश्नावली
प्र. १ निरीक्षण करून उत्तरे लिहा. (गुण १०)
1. पोस्टाच्या ५ रु. किमतीच्या पाकिटाची लांबी रुंदी किती असते?
2. खेळाच्या पत्त्यांमधील कोणत्या राजाच्या हातात शस्त्र नसते?
3. २००९ मध्ये किती पौर्णिमा होत्या? २०१० मध्ये किती पौर्णिमा आहेत?
4. मोराच्या नेमक्या कोणत्या भागाचा रंग मोरपंखी असतो?
5. उंबराची फळे उंबराच्या वृक्षाच्या नेमक्या कोणत्या भागावर येतात?
6. घड्याळात मिनिट काटा सहावर असताना किती वाजता त्याचा तास काट्याशी होणारा कोन १३५ अंशापेक्षा जास्त असतो?
7. सायकलची उंची आणि पाया यांचे गुणोत्तर लिहा. (कंपनीचे नाव आणि मोडेलचे नाव लिहा)
8. घरात एका बशीत सकाळी ८ वाजता ८ चमचे पाणी ठेवले तर रात्री ८ वाजता त्यातले शिल्लक राहिलेले पाणी किती?
9. विकस व्हेपोरब या मलमात कोणती औषधी द्रव्ये आहेत?
10. तुमच्या डाव्या हाताच्या फक्त मधल्या बोटाचे टोक तळहातावर टेकले असता इतर बोटे कोणत्या स्थितीत असतात त्याची समोरून आणि बाजूने दिसणारी आकृती काढा.

प्र. २  थोडक्यात उत्तरे लिहा. (गुण  १०)
1. उजेडात आहे पण अंधारात नाही, असे काय?
2. भारतात १४ जानेवारीच्या आसपास कोणकोणते सण असतात?
3. हवामान शास्त्रज्ञांना हवेतील कोणते पाच घटक महत्वाचे वाटतात?
4. पृथ्वीवर पृथ्वीच्या मध्यापासून सर्वात लांब असणाऱ्या ठिकाणाचे नाव काय?
5. कोणत्या वनस्पतीची पाने खाल्ल्यावर साखर गोड लागत नाही?   
6. गेल्या २० वर्षात कोणत्या वाळवंटाचे क्षेत्र कमी झाले आहे?
7. मातीच्या वरच्या थरात सर्वाधिक प्रमाणात आढळणारा अधातू कोणता?
8. दुसऱ्या वनस्पतीवर वाढणाऱ्या वनस्पतीला काय म्हणतात?
9. मांजऱ्या दगडाचा रंग कोणता असतो?
10. आपल्या आहारात नियमित असणारा पण येथे न पिकणारा पदार्थ कोणता?

प्र. ३ चूक की बरोबर ते लिहा (चुकीचे असेल ते दुरुस्त करून लिहा) (गुण १०)
1. गुलाबाच्या झाडाला कधीच फळ धरत नाही.
2. मासा या प्राण्याची विष पचविण्याची क्षमता माणसाच्या क्षमतेच्या कैकपट असते.
3. एक किडा नाकावर बसून नाक तोडतो म्हणून त्याला नाकतोडा म्हणतात.
4. पाणी १००% शुद्ध राहू शकत नाही.
5. सेटेलाईट टिव्हीची अंटेना उत्तर ध्रुवाकडे रोखलेली असते.
6. वादळ येण्यापूर्वी पाणी उकळायला वेळ कमी लागतो.
7. उसाला सर्वात जास्त पाणी लागते म्हणून ऊस अधिक पावसाच्या प्रदेशात उगवतो.
8. सजीवाच्या शरीरात किरणोत्सारी पदार्थ असतातच.
9. भागाकार म्हणजे तितक्यांदा केलेली बेरीज.
10. बुडबुडा पाण्यातून वर येताना मोठा मोठा होतो.

प्र. ४ शास्त्रीय कारणे द्या (गुण २०)
1. हलवा काटेरी असतो.
2. छापील कागदात घेऊन तेलकट पदार्थ खाऊ नयेत.
3. ई-मेल पत्त्यामध्ये @ हे चिन्ह असतेच.
4. शस्त्रक्रिया करताना डॉक्टर नाकातोंडावर कापडी मुखवटा लावतात.
5. हिंदू पंचांगात कधी कधी वर्षात १३ महिने येतात.
6. आवळा खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यावर ते गोड लागते.
7. कंकणाकृती सूर्यग्रहण फारच कमी वेळा दिसते.
8. माणसाचे हात चालताना खाली तर पळताना वर असतात.
9. बोटे मोडताना कड कड आवाज येतो.
10. हत्ती आपले कान सतत हलवत असतो.

प्र. ५ सविस्तर उत्तरे लिहा (गुण १५)
1. धिरडे, घावन, आंबोळी, डोसा, उत्तप्पा यात फरक काय?
2. थंडीमुळे अगर भीतीमुळे - अंगावर काटा येतो, म्हणजे नेमके काय होते? त्यामुळे शरीराला कोणता फायदा होतो?
3. एच१एन१ असे नाव असणाऱ्या जीवाणूच्या नावातील एच आणि एन चे स्पष्टीकरण करा.
4. जैवतंत्रज्ञानाने विकसित केलेल्या बियाणांवर कोणकोणते आक्षेप घेतले जातात?
5. पेन ड्रIईव्ह मध्ये इलेक्ट्रोनिक माहिती कशी साठवली जाते?

प्र. ६ करून पाहा उत्तर लिहा (गुण २०)
1. "माणसाला बत्तीस दात असतात" या वाक्याचा पडताळा किमान १० व्यक्तींचे दात मोजून घ्या. अपवाद आढळल्यास त्याचे कारण नोंदवा.
2. अखंड सुतळीच्या सहाय्याने अ, औ, ख, छ, ज, ध, न, ढ र, क्ष ही मुळाक्षरे ५ सें. मी. उंचीची होतील अशी वळणदारपणे  काढा. प्रत्येक अक्षरास किती लांबीची सुतळी  लागली ते लिहा.

प्र. ७ स्पष्टीकरणासह सोडवा (गुण १५)
1. माझ्याकडे काही पेढे आहेत. दहा जणांना सारखे वाटले तर दोन उरतात, पंधरा जणांना सारखे वाटले तरी दोन उरतात, वीस जणांना सारखे वाटले तरी दोनच उरतात, पाच जणांना सारखे वाटले तर किती उरतील?
2. एका टेकडीवरून एकाने सूर्योदयाचा देखावा बघितला. त्या वेळी त्याला समोरच्या डोंगरामागे बरोब्बर अर्धे सूर्यबिंब दिसले. टेकडीच्या पायाथ्याशी असलेल्याने ७० सेकंदानंतर सूर्योदय बघितला तेव्हा त्यालाही समोरच्या डोंगरामागे अर्धेच सूर्यबिंब दिसले. तर टेकडीची उंची किती?
3. आठवड्यातल्या कोणत्या तरी तीन वारांची नावे एका गुप्त लिपीत - फ:किही, कुयै, पूदी -  अशी लिहिली जातात. त्यातील संकेत शोधा. तोच संकेत वापरून सर्व वारांची नावे क्रमाने लिहा. ( रवी, सोम इ. )

प्र. ८ वैज्ञानिक कथा लिहा (गुण २०) 
कल्पना करा की चंद्रावर माणसासारखे सजीव - "चांदेरे" - खोल दऱ्यांमध्ये राहतात.
ते कालगणना करतात, आकाश  निरीक्षण करतात, त्यांच्या आकाशातली सर्वात मोठी चांदणी म्हणजे पृथ्वी.
या "चांदेरे" लोकांमध्ये पृथ्वीला अनुसरून कोणत्या कथा, समजुती, कल्पना असतील? या बाबत प्रत्येकी ३०० शब्दांपर्यंत तीन छोट्या छोट्या गोष्टी लिहा.

(टीप: सदर प्रश्नावली www.mavipamumbai.org या संकेतस्थळावर पीडीएफ मध्ये उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी विनय र. र. यांच्याशी 9422048967 या क्रमांकावर संपर्क साधावा. )