फार्म हाऊसवरील खून

ओल्ड मंकचा चौथा पेग चुकून ड्राय घेतल्यावर घशातून जाळत जाणाऱ्या रमने धुंदी चढवायच्या आधी जराशी उतरवली. राघव एकटाच फार्म हाऊसवर बसला होता. कुटुंब यावेळेस परीक्षांमुळे आले नव्हते. फार्म हाउस छान शहरापासून तब्बल सत्तर किलोमीटरवर एका दरीपासून थोड्या अंतरावर बांधले होते. उन्हाळ्याचे दिवस असले तरी ते जाणवणार शहरामधे. येथे कडक थंडी होती. फार्म हाउसच्या ओसरीवर भिकूने सात वाजताच टेबल मांडले होते. राघवसाहेबांनी दिलेली ओल्ड मंक अन सोडा त्यावर ठेवून बाजूला पाणी, बर्फ वगैरे इंतजाम केला होता. राघव आरामखुर्चीत बसला होता. बाहेरून कडक थंडीचे आवरण आणि आतून गरम रमचे! राघवने पाचवा पेग भरून घेतला. लग्नाला वीस वर्षे झाली होती. राघवने या काळात अफाट प्रगती केली होती. दोन फ्लॅटस, हे फार्म हाउस, दोन गाड्या, घरात असायला हव्यात त्या व नसल्या तरी बिघडत नाही त्या सर्व गोष्टी, अनेक परदेश वाऱ्यांचे अनुभव एवढी कामगिरी मागे टाकून तो आता 'आहे ती पोझिशन फक्त टिकवायची' या विचाराने आरामात जगत होता.

आपल्याच परिस्थितीवर खूष होत त्याने विल्स शिलगावली. धुराची वलये हवेत सोडताना त्याला जणू ब्रह्मानंद लाभला असावा. त्यातच तो आवाज आला. 'आत्ता? आत्ता गेट वाजले? आत्ता कोण येणार? ' या विचाराने राघव जरा विचलीत झाला. तेवढ्यात एक जोडपे लांबून चालत येत असलेले त्याला अंधुक प्रकाशात दिसले. भिकू धावतच बाहेर आला होता. राघवने आज आपला कुत्रा आणलेला नसल्यामुळे ते जोडपे निर्विघ्नपणे ओसरीपाशी येऊ शकले.

राघवने त्यांचे निरिक्षण केले.

नवरा मध्यम उंचीचा, गव्हाळ रंगाचा, साधारण तिशीचा असावा. जाड चष्म्यातून तो राघवकडे पाहात होता. त्याच्या चेहऱ्यावर एक 'जरुरीतून निर्माण होणारे' हसू होते. लाचार नक्कीच नाही, पण सहाय्य हवे आहे असे दाखवणारे. स्त्री त्याला शोभेलशी नव्हती. तिची वेशभुषा भलतीच भरजरी होती. दागिनेही होते. दिसायला फारशी आकर्षक नव्हती. ती एकदा राघवकडे बघत एकदा इकडे तिकडे बघत होती.

राघव - कोण पाहिजे?
तो - अं.. आम्ही ऍक्चुअली लग्नाला चाललो होतो भंडाऱ्याला, गाडी बंद पडली. कशीबशी ढकलत इथपर्यंत आणू शकलो. या आडरस्त्याने कुणीच जात नाही ना? तुमचा बंगला दिसला, लाईट दिसले म्हणून थांबलो.
राघव - काय झाले गाडीला?
तो - पेट्रोलच संपले आहे. निघताना लक्षातच राहिले नाही.
राघव - बसा ना? भिकू? खुर्च्या आण
तो - थॅंक्स हं! ही माझी मिसेस. मी रवी देसाई
राघव - ओके. आय ऍम राघव पित्रे. मी भंडाऱ्याचाच आहे. कुठे जायचंय भंडाऱ्याला?
तो - कामत म्हणून रिलेटिव्ह आहेत. त्यांच्या मुलीचे लग्न आहे उद्या सकाळी. आत्ता सीमांतपूजन चालू होईल.
राघव - ओके. आता पेट्रोल काही मिळणार नाही. माझ्या गाडीतले ट्रान्स्फर करायचा प्रयत्न केला तरी फार तर चाळीस किलोमीटर जाईल बहुतेक. तुम्हाला त्यांच्यापैकी कुणाला बोलवून घ्यायचे असले तर घ्या.
तो - अं.... एक फोन करू का?
राघव - शुअर... भिकू? यांना आत ने.

तो माणूस आत गेला. स्त्री तिथेच बसून राहिली. तिने एका नजरेत राघवचा मद्याचा इंतजाम पाहिला व बाहेर तोंड वळवले. राघवने तिच्याकडे आता नीट पाहिले तर तिच्या डाव्या खांद्यावर एक रक्ताचा ओघळ होता.

राघव - तुम्हाला काही जखम झालीय का?
ती - अं? ते ... आत्ता गाडी ढकलताना एक फांदी जोरात घासली इथे. विशेष काही नाही.
राघव - तुम्हाला काही बँडेज वगैरे हवे असले तर आहे.
ती - नाही नाही, ठीक आहे.

राघवला जरा आश्चर्यच वाटले. तितक्यात आत फोनपासून रवीचे आवाज ऐकू आले.

रवी - च्च! फोनला डायल टोनच येत नाहीये. (खड खड खड खड)

तो बाहेर आला.

रवी - अं ... डायल टोनच नाहीये.
राघव - एक पाच मिनिटांनी करून बघा. माझ्या मोबाईलचीही इथे रेंज नाही येत.
रवी - मोबाईल आहे, पण मलाही रेंज नाहीये.
राघव - यांना काहीतरी जखम झालेली दिसतीय. बँडेज वगैरे द्यायचे असले तर आहे.
रवी - अं.. थॅंक्स. आम्ही आगंतुकासारखे तुम्हाला त्रास देतोय. उगीच डिस्टर्ब केलं! एक पाच दहा मिनिटे थांबून फोनवरून कुणालातरी बोलवून घेतो.
राघव - नो प्रॉब्लेम.
रवी - इथे... बाथरूम कुठे आहे?
राघव - भिकू? यांना बाथरूम दाखव.

दोघेही आत गेले. राघव डिस्टर्ब झालेलाच होता. त्याने पेग हातात घेतला अन गेटपाशी चक्कर टाकून आला. गेटपासून पन्नास एक फुटांवर एक मारुती होती. फार्महाउसच्या गेटवरील दिव्याच्या अंधुक प्रकाशात दिसत होती. हे दृश्य फारसे विचित्र नव्हते. विचित्र होते ते एक वेगळेच दृश्य! मारुतीमध्ये एक ड्रायव्हर होता. तो स्टिअरिंगला डोके टेकून झोपलेला होता.

राघव घाईघाईत आत आला. त्या दोघांपैकी रवी बाहेर आलेला होता.

राघव - तुमची गाडी आत आणायचीय का?
रवी - नाही नाही.
राघव - पण ड्रायव्हरला आत बोलवायचे असले तर बोलवा. तो अंधारात एकटा कसा झोपेल?
रवी - ड्रायव्हर? गाडी मीच चालवतोय.

राघवला 'आपल्याला चढत नाही' हे निश्चीत माहिती होते.

राघव - म्हणजे? गाडीत ड्रायव्हर बसलाय की तुमच्या?
रवी - छे हो? हा हा हा हा!
राघव - यू प्लीज सी युवरसेल्फ? की कुणी दुसराच गाडीत येऊन बसला आहे?
रवी - ओह! असे कसे होईल? चावी इथे आहे. मी बघून येतो.
राघव - मीही येतो.

दोघे चालत गेटपाशी गेले तर गाडीत कुणीच नव्हते. राघवला हा भलताच धक्का बसला. त्याने एक मिनिट मनाशी विचार केला. साडे चार पेगनंतरही आपण विचार व्यवस्थित करू शकतो हे त्याला पक्के ठाऊक होते. आपण ड्रायव्हरच्या सीटवर माणूस बघितला हे काही तो विसरू शकत नव्हता. एकंदर परिस्थिती त्याला संशयास्पद वाटली. यांना ताबडतोब कटवायला पाहिजे हे त्याने मनाशी ठरवले.

राघव - भिकू? एसीपी साहेबांचा फोन आला का रे?
भिकू - कोणाचा?
राघव - एक काम कर. यांना चहापाणी दे. मीच विचारतो ते कुठे पोचले आहेत ते.

रवी या वाक्यावर काहीच प्रतिक्रिया दाखवत नव्हता. राघवचा अंदाज असा की आणखीन कुणीतरी, अन तेही खात्यातला मोठा अधिकारी येणार हे ऐकून काहीतरी चुळबुळ होईल. अजून ती बाई आतच होती. राघवने फोनपाशी जाऊन 'हां, ऑन द वे ना? किती वेळ, ओके ओके, मी पुढच्या पेगसाठी थांबतोय' अशी बडबड करून फोन ठेवला. बाहेर आला तर रवीच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते.

राघव - तुम्ही मला वाटते एक काम करा. आमचे ए सी पी साहेब येतायत, ते इथे एक अर्धा तास थांबून पुढे जाणार आहेत. त्यांच्या गाडीतून जा? काय?
रवी - तुमचा फोन बंद आहे साहेब.

या वाक्याने राघवला 'आपल्यावर हा कुणाचा कोण अविश्वास दाखवतोय' याची रास्त चीड उत्पन्न झाली. तो चिडून म्हणाला.

राघव - मिस्टर रवी. माझा फोन बंद आहे की चालू ते मला माहीत आहे. मी तुम्हाला काय सांगतोय त्यावर विचार करा.
रवी - तुमचा फोन चालूच होता. मगाशी मी त्याची केबल तोडून आलो.
राघव - काय? (राघव ताडकन उभा राहिला. त्याने आत जाऊन फोन पाहिला व बाहेर आला. )

राघव - ओ भाऊ, काय थट्टा करताय? केबल आहे की?
रवी - आता जाऊन बघा बरं?

राघव पुन्हा आत गेला तर तीच केबल तोडलेली दिसली. आता मात्र राघव पिसाळला.

राघव - ए चल्ल, कोण आहे तू? ऑ? भिकू? काहीतरी आण रे हातात माझ्या
भिकू - साहेब, साखळी आहे, देऊ का?
राघव - दे दे.

भिकू धावत एक साखळी हातात घेऊन ओसरीवर आला. आता भिकूला साधारण अंदाज आला होता.

भिकू - ओ? कोणे तुम्ही? व्हा बाहेर.
राघव - भिकू.. ती बाई आत आहे तिला बाहेर काढ पहिली.
रवी - अहो थांबा थांबा, मी नुसती गंमत करत होतो. खरोखरच फोनची केबल आधीच तुटलेली होती.
राघव - बाहेर हो.

तेवढ्यात ती बाई लगबगीने बाहेर आली.

राघव - ओ बाई, चला निघा. चल ए भाऊ, आता साखळीने मारीन. भिकू, यांच्या गाडीचा नंबर बघ काय आहे ते. उद्या गेल्यावर खटलाच लावतो. चल ए, चल.

भिकू धावत गेटबाहेर गेला. तोपर्यंत रवी व ती बाई भेदरलेल्या नजरेने मागे मागे सरकत होते.

रवी - अहो साहेब, आम्ही तुम्हाला डिस्टर्ब केलं हे खरं आहे पण आम्ही काहीही केलेले नाही. आम्ही जातो इथून, तुम्हाला जास्त त्रास देत नाही. तुम्ही उगीच गैरसमज करून घेताय.
राघव - चल चल, हो बाहेर साल्या.

एवढे म्हणेपर्यंत ते दोघे गेटच्या बाहेर जातात अन भंडाऱ्याच्या दिशेने चालायला लागतात. राघव त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे जवळपास दहा मिनिटे बघत असतो. शेवटी ते दिसेनासे होतात तेव्हा तो धावत आत येऊन फोनची केबल बघतो तर ती तोडलेली असते.

राघव प्रचंड धक्का बसल्यामुळे पुन्हा ओसरीवर येतो. हा काय प्रकार झाला अन का झाला हेच त्याला समजत नाही. एकदा त्याला असे वाटते की आपली गाडी घेऊन ताबडतोब इथून भंडाऱ्याला निघून जावे. पण एक तर सत्तर किलोमीटरचे अंतर, शरीरावर शैथिल्य अन त्यात रस्त्यात ते दोघे पुन्हा भेटण्याची शक्यता! त्यापेक्षा इथेच थांबावे. उजाडले की गाडी काढावी अन वाटेत रेंज आली की घरी फोन करून सांगावे. नाहीतर दहाच किलोमीटरवर पोलीस ठाणे आहे तिथे तक्रार नोंदवावी. नाहीतरी त्यांच्याच हद्दीत असणार हा भाग! ते कोण कामत आहेत तेही हवे तर लगेच शोधून काढता येतील. तिथे त्या दोघांना धरले की झाले. इथे येऊन लेकाचे फोनची केबल का तोडून गेले हे काही समजत नाही. त्यात राघवला वाटते की आपला आपल्या घराशी संबंध राहू नये म्हणून तर कुणी असे केले नसेल? पण त्यात कुणाचा काय फायदा? आपली तर कुणाशी दुष्मनीही नाही. बहुधा लुटारू जोडपे असावे. भिकू अन आपण असे दोघे पाहून, साखळी पाहून अन एसीपी हे नाव ऐकून नुसतेच पळून गेले असावेत. पुढच्या वेळेपासून कुत्रा अन एखादा माणूस गुरखा म्हणून आणायलाच हवा.  हा विचार करून राघव आपला पेग घ्यायला हात पुढे करतो तर तिथे एकाऐवजी दोन ड्रिंक्स असतात. राघव पुन्हा चक्रावून जातो. दोन्ही पेग अर्धवटच! म्हणजे लेकाचा तेवढ्यात पिऊनही गेला म्हणायचा. हा भिकू कुठे गेला?

राघव - भिकू? ए भिकू?

भिकूची ओ काही येत नाही. आता मात्र राघव गळाठतो. पुन्हा दोन घोट लावून गेटपाशी येतो तर गाडीच नाही. गाडी गेली? काय चाललंय काय? हे काही खरे नाही. राघव पुन्हा भिकू, भिकू म्हणून हाका मारतो. कुठूनतरी कण्हल्यासारखा आवाज येतो. तो तिकडे बघतो तर एका बाजूला भिकू विव्हळत पडलेला. राघव धावत तिथे जातो तर भिकू 'मारू नका, मारू नका' म्हणून विव्हळत असतो.

आता राघवला काही समजेनासे होते. तो आपली गाडी काढून त्यात भिकूला ठेवून भंडाऱ्याला जायचे ठरवतो. लगबगीने आत येतो. ओसरी ओलांडून हॉलमधून जाताना पुन्हा फोनकडे लक्ष जाते. तुटलेली केबल पाहून तो आणखीनच नव्याने घाबरतो. कसाबसा धावत स्वतःच्या बेडरूममध्ये जातो अन तिथले दृश्य पाहून मात्र त्याला भोवळच येते.

मगाशी येऊन गेलेल्या जोडप्यापैकी पुरुष त्याच्या बेडवर निष्प्राण अवस्थेत पडलेला असतो. त्याच्या गळ्यावर आवळल्याच्या खुणा असतात. डोळे व जीभ बाहेर आलेली. राघवच्या डोळ्यासमोर गरगरायला लागते. तो पायात मटकन बसतो. त्या दृश्यावरून त्याची नजर हटतही नसते अन तिकडे बघावेसेही वाटत नसते.

दहा पंधरा मिनिटांनी कसाबसा जोर केल्यावर तो उठतो अन गाडीची किल्ली घ्यायला जातो तितक्यात पोलीसच्या गाडीचा आवाज ऐकू येतो. खूप लांबून आल्यासारखा. राघवला घडणाऱ्या घटनांचे फक्त साक्षीदार व्हावे लागत असते. गाडीचा सायरन जवळ जवळ येऊन शेवटी फार्महाऊसपाशीच थांबतो. धाडकन काही जण उतरून घराकडे धावतात. राघव बसलेला असतो तेथे तीन पोलीस पोचतात. एकजण पटकन राघवला धरतो. प्रेताच्या सान्निध्यात असताना माणसे दिसली याचाच राघवला आधार वाटत असतो. हा आधार जाणवेपर्यंत त्याला आणखीन तीन गोष्टी जाणवतात. एक म्हणजे पोलिसाची पकड घट्ट आहे, दुसरे म्हणजे जो मेला आहे तोच बाहेरून धावत आत येत आहे अन तिसरे म्हणजे मगाचची बाई प्रचंड धक्का बसल्यासारखी ओसरीवर उभी आहे.

बाहेरून आलेला मगाचचा माणूस हंबरडा फोडतो.

रवी - साहेब, हाच तो.
पोलीस - ए नीट बोल, काय झाले ते

रवी जवळपास तीन चार मिनिटे रडून घेतो. बाहेर ती बाई कोसळल्यासारखी खुर्चीत पडलेली असते. पाणी पाजल्यावर रवी कसाबसा उठतो अन बोलायला लागतो.

रवी - साहेब, यानेच मारले माझ्या भावाला.
पोलीस - हे प्रेत कुणाचे?
रवी - हा माझा भाऊ आहे. रवी

राघव आत्तापर्यंत बराच सावरलेला असतो.

राघव - ए... ओ साहेब, रवी हा आहे. हा माणूस कोण माहीत नाही.
रवी - अरे चूप
पोलीस - ए तू काय झालं ते सांग
रवी - साहेब माझ्या भावाचा कंन्स्ट्रक्शनचा बिझिनेस आहे. या हरामखोराला ऍग्रीमेंटवर सही करावी म्हणून पाच लाख हवे होते. आम्ही तिघे भंडाऱ्याहून निघालो. याच्या घरी आलो तर हा पीत बसला होता. म्हणे असे व्यवहार शहरात करणे योग्य नाही. भावाने आमच्यासमोर याच्याकडे पैशाची बॅग दिली. याने याच्या नोकराला ती आत ठेवायला सांगीतली.
पोलीस - कसलं ऍग्रीमेंट?
रवी - माझ्या भावाची कंपनी आहे, देसाई इस्टेटस म्हणून
राघव - ऑ? देसाई इस्टेटस? देसाई इस्टेटसचे ऍग्रीमेट पेंडिंग होते हे बरोबर आहे, पण देसाई स्वतःच आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे ते राहिले होते. पैशाचा काय संबंध?
पोलीस - तू थांब रे, ए तू बोल.
रवी - हा खोटारडा आहे साहेब. पैसे घेतल्यावर याने भावाला ड्रिंक्स ऑफर केले. भाऊ कधीच घेत नव्हता. पण कंपनी म्हणून मी घेतले. पाहिजे तर माझ्या तोंडाचा वास बघा.
पोलीस - पुढे?
रवी - नंतर यांच्यात अचानक टर्म्स वरून खूप बाचाबाची झाली. पाच लाख देऊन टाकलेले असल्यामुळे भावाच्या हातात काहीच राहिले नव्हते. आम्ही मध्ये पडलो, पण कुणीच ऐकत नव्हते. भाऊ मला म्हणालासुद्धा, दारू पाजली म्हणून लगेच मिटवायला बघतोयस का? विचारा माझ्या बायकोला.

राघव - ए कुत्र्या, ओ, हा काय वाट्टेल ते सांगतोय. याने भिकूलासुद्धा मारलंय.
पोलीस - म्हणजे? आणखी एक खून आहे?
राघव - नाही, जिवंत आहे तो.
रवी - साहेब हा साफ खोटे बोलतोय. यांच्यात मारामारी व्हायची वेळ आली तेव्हा मी अन माझी बायको म्हणालो की आपण उद्या बोलूया. तर भावाने आम्हाला अन याला शिवीगाळ केली. बायको तर जायलाच निघाली होती. तितक्यात भाऊ म्हणाला मी बाथरूमला जाऊन येतो. मागोमाग हाही गेला फोन करतो म्हणून.
राघव - ए .. ए... ओ ह्याचे ऐकू नका...
रवी - गप्प! गप्प बस! थोड्या वेळाने हा बाहेर आला पण भाऊ काही येईना. आम्ही दहा मिनिटे वाट बघितली. शेवटी मी बाथरूमपाशी जाऊन हाका मारल्या तर माथरूमचे दार उघडेच होते. मी हळूच आत पाहिले तर भाऊ नव्हताच. मग मी इकडे तिकडे पाहिले. स्वयंपाकघरात पाहिल्यानंतर सहज याच्या बेडरूममध्ये पाहिले तर माझा भाऊ .... (रवी जोरजोरात रडू लागतो. )

राघव - ए .. ओ साहेब, अहो ही काय बनवाबनवी आहे?
पोलिस - गप्प बस! हां, मग काय झालं रे?
रवी - मी बायकोला सांगीतलं.  आम्ही धावत सुटलो. गाडी घेऊन सरळ सरळ तुमच्या चौकीवर आलो.
पोलीस - काय रे? खून करतोस का ****?
राघव - अहो नाही साहेब. हेच दोघं आले होते. गाडी बंद पडली म्हणून. यांनी भिकूलाही मारले आहे. हा बघा आला भिकू. काय रे भिकू? सांग तुला कुणी मारले?
भिकू - साहेब, आजवर या माणसाच्या बंगल्यावर काम केलं. मला नाई वाटलं हा असा आसल! आज यानं मलाही मारलं! या साहेबांचा तर गळाच आवळला.

हे ऐकून राघव भिकूच्या अंगावर धावतो.

भिकू - मला म्हणाले मी फोनची वायर तोडली आहे. खबरदार कुणाला झालेला प्रकार सांगीतलास तर.
राघव - साहेब, तुम्ही या प्रेताचे ठसे बघा. तो आमच्याबरोबर बाहेर बसलेला असेल तर त्याचे ठसे मिळणारच.

या वाक्यावर रवी व भिकू एकमेकांकडे पाहतात. त्यांचे पाहणे राघवही पाहतो अन पोलीसही पाहतात. पोलिसांच्या दृष्टीने सगळेच संशयीत! मात्र या प्रकरणात तर अक्षरशः सगळेच संशयीत वाटण्यासारखी परिस्थिती दिसते.

पोलीस त्या सगळ्यांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवतात. त्यांची चौकशी सुरू होते. इतके साधे प्रकरण उलगडायला किती वेळ लागणार? कशाला सतराशे साठ प्रकार करत बसायचे?

पो - तुमच्या गळ्यावर खुणा कशाच्या आहेत बाई?
ती - झाडाची फांदी घासली
पो - तुमचा नवरा अन दीर जुळे का?
ती - हो
पो - तुमच्या अंगावर हे इतके दागिने, नवरा इतका साधा, दीर मात्र श्रीमंत दिसतो कपड्यांवरून
ती - आम्ही श्रीमंत नाही आहोत. हे दागिने ...
पो - अगदी लग्नाला चाललेले लोक घालतात तितके दागिने आहेत हे.
ती - मला सवय आहे.
पो - तुम्हाला सवय आहे, दीराला सवय आहे. तुमचे मिस्टर अगदी साधे? अं?
ती - हे खरच साधे आहेत.
पो - फक्त दारू पितात, दीर पीत नव्हते.
ती - तुम्हाला काय म्हणायचंय?
पो - प्रश्न आम्ही विचारणार. तुम्ही नाही. आल्यापासून तुम्ही आत गेला होतात?
बाई - नाही. म्हणजे, हो, एकदा बाथरूमला जाऊ आले होते.
पो - आणखीन कोण आत गेले होते?
बाई - माझे मिस्टरही आत जाऊन आले होते.

पो - हां! तर तुमच्या भावाने यांना पाच लाख दिले.
रवी - हो साहेब.
पो - भाऊ अनमॅरिड का?
रवी - हो साहेब
पो - तुम्हाला काय वाटतं? नुसत्या टर्म्स न पटल्यावरून खून होईल?
रवी - साहेब तो माणूस प्यायलेला होता.
पो - प्यायलेले तर तुम्हीही होतात की?
रवी - साहेब मी एकच पेग घेतला, तोही अर्धा.
पो - म्हणजे पाच लाख मिळूनही बाचाबाची झाली अन त्यातून खून झाला?
रवी - हो साहेब

पो - हां! काय रे? तुला कोणी मारलं?
भिकू - मालकांनी
पो - कसं मारलं?
भिकू - माझ्या डोक्यात काहीतरी जोरात मारलं!
पो - कधी?
भिकू - हे लोक निघून गेल्यावर
पो - तू खून होताना पाहिलास का?
भिकू - नाही साहेब, मी बघितले तेव्हा हे दोघ पळून चालले होते. मला संशय आला म्हणून मी आधी यांच्या मागे धावलो. मागून साहेब त्यांच्या खोलीतून आले. ते माझ्यामागे धावले. हे लोक गाडी घेऊन निघून गेल्यानंतर साहेबांनी मला दमात घेतलं! झालेलं सांगायच नाही म्हणाले. काय झाले होते तेच मला माहीत नव्हते. मी आत जाऊन पाहिलं तर हे साहेब मेलेले. मी इतका घाबरलो साहेब, मी म्हणालो 'तुम्ही असं कसं काय केलंत' त्यावर त्यांनी मला काहीतरी मारलं!
पो - दुसरं कुणीही आलं नव्हतं?
भिकू - नाही साहेब
पो - बाहेर सगळे बसलेले असताना कुणीही आत आलेले नव्हते?
भिकू - नाही साहेब.
पो - तुला भांडणाचे आवाज नाही आले?
भिकू - थोडे आले साहेब, पण मी दुर्लक्ष केलं. मी स्वैपाक करत होतो.
पो - त्या बाई म्हणतायत की त्या आत येऊन गेल्या.
भिकू - माझ लक्ष नसेल तेव्हा
पो - ते साहेबही म्हणतायत की ते आत आले होते बाथरूमला
भिकू - मला खरच माहीत नाही साहेब.
पो - मग तू बाहेर कशाला गेला होतास?
भिकू - साहेबांनी फरसाण... आपलं ... काहीतरी धावपळ झाली असं वाटलं म्हणून
पो - फरसाण काय?
भिकू - नाही, ते आधी मागीतलं होत त्यांनी
पो - किती आधी?
भिकू - हे लोक यायच्या आधी
पो - म्हणजे हे लोक यायच्या आधी तु फरसाण द्यायला गेला होतास त्यानंतर एकदम ते लोक धावले तेव्हा गेलास?
भिकू - हो साहेब.
पो - मग ते धावल्यावर तू कुठपर्यंत धावलास?
भिकू - गेटपर्यंत
पो - आणि तुला साहेबांनी मारलं कुठे?
भिकू - त्यांच्या खोलीत
पो - मग मारल्यावर खोलीतून तू बंगल्याच्या बाहेर जाऊन पडलास?
भिकू - मी पुन्हा त्या पळालेल्या लोकांची मदत मागायला कसातरी धावलो साहेब.
पो - मग त्या बाईंच्या खांद्याला कधी लागलं?
भिकू - पळताना
पो - तू बघितलंस?
भिकू - म्हणजे, पळतानाच लागलं असणार
पो - म्हणजे त्यांना लागलेल आहे हे तुला माहीत आहे?
भिकू - हो.
पो - साहेबांच्या खांद्याला लागल की बाईंच्या
भिकू - बाईंच्या खांद्याला लागलंय साहेब
पो - तुला फटके पाहिजेत का फटके?
भिकू - मी काय केलं नाही साहेब. तुम्ही मला का ओरडताय?
पो - तू ते लोक आल्यापासून बाहेरही गेला नाहीस, तिथे दुसरा ग्लास कुणी ठेवला? बाईंच्या खांद्याला लागलंय हे कसं समजलं तुला?

आता भिकू गळाठला. पोलिसांचा आवाज ऐकूनच रडायला लागला.

हळूहळू त्याने सगळी कहाणी सांगीतली. त्याचा जबाब घेतल्यावर इतर दोन आरोपींच्या म्हणण्यात काही तथ्यच राहिलेले नव्हते.

भिकूची कहाणी अशी!

रवी देसाई हाही कॉंट्रॅक्टर. मात्र देसाई इस्टेटस त्याची नव्हती. ती वेगळी. रवी चांगला श्रीमंत! त्याची पत्नी हीच त्याची साथीदार! मूलबाळ नव्हते. रवी देसाईचा जुळा भाऊ प्रसन्न हा तसा गरीब. तो अविवाहीत होता. पण व्यवसायात बिझी असलेल्या जुळ्या भावाची पत्नी संसारात सुखी नाही हे त्याने हेरले होते. काही कारणाने त्यांच्यातील बोलणी चालणी वाढत जाऊन त्याला आता छुप्या प्रेमाचे स्वरुप आले होते. त्या स्त्रीलाही प्रसन्नकडून सदोदीत कंपनी, सुखदुःखे शेअर करणे व अर्थातच भोगसुख मिळत होते. प्रकरण वाढू लागले. भावाच्या कानावर गेल्यावर त्याने एकदोनदा दोघांचीही कान उघाडणी केली. मात्र त्याचा संशय संपलेला नव्हता. एकदा सकाळी सकाळी रवीने प्रसन्नला आपल्या पत्नीसोबत आपल्याच खोलीत पाहिले. त्याचा कंट्रोल गेला. आता याचा परिणाम काय होणार हे काही दोघांना समजत नव्हते. रवीने पत्नीला सोडले तर प्रसन्नकडे इतके पैसे नव्हते की ते दोघे रवीसारख्याच राहणीमानात राहू शकतील. त्या प्रसंगाच्या रागाच्या भरात रवीने प्रसन्नला थपडा मारल्या. पत्नीलाही एकदोन थपडा मारल्या. प्रसन्नला हाकलून दिले. मात्र प्रसन्न एवढ्या मोठ्या घरातून गेला नाहीच. कुठेतरी लपून बसला. दुपारी त्याने वेळ पाहून झोपलेल्या प्रसन्नचा गळा आवळला. आता या प्रेताचे काय करायचे हे काही त्यांना समजेना. दोघेही हतबुद्ध झालेले होते. शेवटी पत्नीने प्रसन्नला सांगीतले की तिच्याकडे पुर्वी काम करणारा भिकू लांब एका फार्महाउस वर काम करतो. तसल्या एरियामध्ये कुठेतरी दरीत प्रेत टाकून द्यायचे अन 'प्रसन्न गुप्त झाला आहे' असा बभ्रा करून प्रसन्नने रवी व्हायचे. तिने कसातरी भिकूचा संपर्क काढला. भिकूची प्रथम तो प्रकार ऐकून अन प्रसंग पाहून पाचावर धारण बसली. मात्र एक लाखाच्या मोबदल्यात तो प्रेताची विल्हेवाट लावण्यात मदत करायला तयार झाला. त्यातच भिकूने देसाई म्हणून कुणीतरी येणार होते अन त्यांचे काम होते पण साहेब त्यांना ओळखत नाहीत ही अमूल्य माहिती पुरवली. प्रसन्नने बराच विचार करून व भिकूशी सतत संपर्कात राहून संध्याकाळी फार्म हाऊसवर रवीच्या पत्नीसोबत प्रवेश मिळवला. बाथरूमला जाण्याच्या निमित्ताने पत्नी आत गेली व तिने भिकूला गाडीची किल्ली दिली. गाडीतून उतरताना आम्ही मुद्दाम प्रेत ड्रायव्हरच्या जागी ठेवलेले आहे असे सांगीतले. त्यांच्यामते कुणी रस्त्याने गेलेच तर संशयाला जागा उरणार नव्हती. फार्महाउसवर कुणीतरी आले असून त्यांचा ड्रायव्हर गाडीत आहे असे वाटले असते. मात्र ते प्रेत तसे ठेवताना नेमकी एक फांदी तिच्या मानेवर जोरात घासली गेली. नंतर नेमकी राघवची गेटवर चक्कर झाली. ती झाली नसती तर पुढचे अनेक प्रश्न आले नसते. पण राघव पुढच्या बाजूने गेटपाशी आलेला बघून भिकू थबकून झाडीत लपला. राघव गेल्यावर अत्यंत त्वरेने त्याने ते प्रेत ओढत झाडी आणले व मागच्या बाजूने बेडरूममध्ये आणून ठेवले. लाईटमध्ये प्रेत बघितल्यावर त्याची बोबडीच वळली. असा भयानक चेहरा झला असेल याची त्याला कल्पना नव्हती. तो कसाबसा स्वयंपाकघरात गेला. तो पर्यंत राघवने एसीपींना फोन करण्याचे नाटक झालेले होते. फोनची केबल तोडलेली नाही हे रवीने राघवला सांगताच रवीने काही सेकंद हासण्याचे नाटक केले. त्याने जेव्हा पाहिले की भिकू पटकन फोनपाशी येऊन पुन्हा आत निघून गेला तेव्हा तो म्हणाला की पुन्हा बघा केबल तोडलेली आहे. त्याने भिकूला हाक मारून साखळी मागीतली होती. ती बाईही तोपर्यंत बाहेर आलेली होती. तिनेही मागच्या खिडकीतून पाचलाख असलेली एक बॅग बेडरूममध्ये आणून ठेवलेली होती.

दोघे घाबरून पळाल्यासारखे दाखवत निघून गेले व उतारावरून गाडी स्टार्ट न करता तशीच नेली. जरा पुढे जाऊन चौकीत तक्रार आहे असे सांगून पुन्हा फार्म हाऊसवर आले.

प्रसन्न भिकूकडून ब्रॅंड ऐकून आधीच ओल्ड मंक पिऊन आला होता. राघवचे लक्ष नसताना भिकूने फक्त एक अर्धा भरलेला ग्लास तिथे ठेवला होता.

जाताना प्रसन्नने लाकडी दंडुक्याने भिकूच्या डोक्यावर हलका प्रहार करायची मात्र आठवण ठेवली होती.

कदाचित नुसतेच प्रेत दरीत ढकलले असते तर पाप झाकले गेलेही असते.