सतीश शेट्टी यांना मरणोत्तर सजग नागरिक पुरस्कार

७ फेब्रुवारी २०१० ला पुण्यात सजग नागरिक मंचा तर्फे सतीश शेट्टी यांना मरणोत्तर सजग नागरिक पुरस्कार देण्यात आला. संस्थापक विवेक वेलणकर यांनी पुरस्कारामागची भूमिका विशद केली. अण्णा हजारे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार होता परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे  ते येऊ न शकल्याने त्याच क्षेत्रातील एक खरेखुरे  आयडॉल सातारा जिल्ह्यातील शिवाजी राऊत यांच्या हस्ते देण्यात आला. सतीश शेट्टी यांचे एक धाकटे बंधू संदीप शेट्टी व अमेरिकेतून आलेले दुसरे बंधू संतोष शेट्टी यांनी तो स्वीकारला. माहिती अधिकार क्षेत्रात सामाजिक काम केलेले सतीश शेट्टी हे भारताच्या दुसर्‍या  स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्मा ठरले. सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुंभार या प्रसंगी उपस्थित होते. त्यांनी सतीश शेट्टी काम करीत असलेल्या माहिती अधिकाराच्या कागदपत्रांच्या पैकी काही भाग आपल्या संकेतस्थळावर टाकला आहे. भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची परिस्थिती बरी असल्याचे आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.

 सतीश शेट्टी हा माहिती अधिकाराच्या चळवळीतला एकांडा शिलेदार होता. माहिती अधिकार चळवळीतील काम करणार्‍या

संस्थांना फारसा माहीत नव्हता. सतीश शेट्टीच्या हत्येनंतर कुटुंबावर झालेला आघातातून देखील सावरून संदीप शेट्टी यांनी त्यांना  असंख्य लोकांच्या भेटीतून आलेले अनुभवावरून जे आकलन झाले त्याबद्दल उत्तम भाष्य केले. कुठेही अगतिकता नव्हती. आत्मविश्वास होता. मुंबईच्या एका पत्रकाराने तुम्ही ही सतीश शेट्टीची चळवळ पुढे चालवणार का? असा प्रश्न विचारला त्यावेळी ही एका व्यक्तीची चळवळ कशी झाली? असा प्रतिप्रश्न विचारून त्यांनी ही समाजाची चळवळ आहे व यासाठी प्रत्येक व्यक्ती स्वत:च लीडर होऊ शकते असे सांगितले, सतीश शेट्टी चळवळी मध्ये एकटा का पडला याचे उत्तर देताना त्यांनी सांगितले की सतीश हा बरोबर किंवा चूक अशा दोन उत्तरात काम करीत होता. इंटरलेक्चुअल जो ग्रे एरिया शोधत असतात तो त्याला कधी जमला नाही. त्यामुळे तो कॉंग्रेसच्या सेवादलात टिकला नाही, अण्णा हजारेंच्या संघटनेत सुद्धा टिकला नाही. लोकशिक्षण हाच एक मार्ग असल्याचे मत मात्र संदीप शेट्टींनी आवर्जून नोंदवले.

   शिवाजी राऊत यांनी युवा व मध्यमवर्ग या चळवळीपासून दूर आहे. प्रसारमाध्यमांनी माहिती अधिकार चळवळीचे विश्लेषण

जेवढे करायला पाहिजे त्या प्रमाणात केले नाही असे सांगून अध्यात्माने इहवादी प्रश्न सुटत नाहीत त्यासाठी संघर्ष व आत्मसन्मानाची जिगर आणि जिद्द लागते. ही चळवळ जीने का व जाननेका अधिकार आहे. त्यासाठी रक्त सांडावे लागणार आहे. सतीश शेट्टी जर जोशी, देशपांडे, पवार, देशमुख असता तर त्याच्या बलिदानाचा वेगळा अन्वयार्थ महाराष्ट्राने लावला असता. सतीश शेट्टीच्यात एक आत्मनिर्भरतेची चमक राऊत यांना पूर्वीच दिसली होती.   अण्णांच्या सोबत काम करताना यशदाच्या तत्कालीन महासंचालकांना [ माझ्या माहितीप्रमाणे रत्नाकर गायकवाड. ] माहिती अधिकाराखाली काही माहिती सतीश शेट्टींनी विचारली होती. ही माहिती देणे त्यांच्या गैरसोयीचे होते. त्यांनी अण्णांना हे सांगितले व अण्णांनी सतीश शेट्टीला आपल्या संघटनेतून बाजूला केले. हे सांगावं की नाही असा संभ्रम राऊतांना पडला होता. पण त्यांनी ते नम्रपणे सांगितले. भविष्यात ही चळवळीला  कार्पोरेट व राजकारणी यांच्या अभद्र युतीला तोंड द्यावे लागणार आहे. ही कोणा एका व्यक्ती विरुद्धची चळवळ नसून व्यवस्थेला शुद्ध करीत जाणारी चळवळ असल्याचे प्रतिपादन करण्यावर राउतांचा भर होता. एकूणच शिवाजी राउतांनी चळवळीचा एक उत्तम आढावा या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेतला.

कार्यक्रम हा अत्यंत हृद्य झाला. अनेक क्षेत्रातील मान्यवर आले होते.

नेहमी प्रमाणे आम्ही आपल्यासाठी या कार्यक्रमाचे जमेल तसे  ध्वनिमुद्रण केले आहे. आपल्याला ते ऐकता येईल. पहिल्या

ध्वनिफितीत संदीप शेट्टी आपले मनोगत व्यक्त करताहेत तर दुसर्‍या ध्वनिफितीत शिवाजी राऊत आपले विश्लेषण

सांगताहेत. ऐका.

दुवा क्र. १