महाराष्ट्रात खरोखरच वीजटंचाई आहे काय? असल्यास त्यावर उपाय कोणकोणते?वीजनिर्मिती महाराष्ट्रात हवी की नको?

महाराष्ट्रात सद्ध्या जैतापुर/माडबन अणु-ऊर्जानिर्मितिप्रकल्पानिमित्ताने वेगवेगळी मते प्रगट होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही चर्चा उपस्थित केली आहे.विदर्भातले चंद्रपुर हे महाराष्ट्रातले प्रथम क्रमांकाचे प्रदूषणग्रस्त शहर असावे. तिथल्या आसमंतात औष्णिक वीजप्रकल्प होण्यापूर्वी शुद्ध हवा आणि शुकशुकाट होता. आज कमालीचा धूर आणि गजबज आहे. प्रदूषणासकट विकास, किंबहुना डीस्पाइट पोल्यूशन ---प्रदूषण असूनही विकास , ही संकल्पना तिथल्या जनतेने स्वीकारलेली , तिला मानवलेली दिसते. कसलाही रोजगार मिळत असेल आणि व्यापार-उदीम भरभराटत असेल तर तो कोणत्याही परिस्थितीत हवा, मग प्रदूषण गेलं खड्ड्यात अशी टोकाची निकड तिथे जाणवते. उद्या समजा विदर्भ महाराष्ट्रातून वेगळा झाला तर विजेचा खूप मोठा उगमसाठा (सोर्स) परराज्यात ज़ाईल. तेव्हा आणि एरव्हीही विजेची गरज शक्यतो स्थानिकरीत्या भागावी, दूरवरून संक्रमण खर्चिक ठरते असे काही लोक  म्हणतात .  आधी सत्वर विकास; कोणत्याही किंमतीत विकास, हे आपल्याला पटते का? विकासासाठीच्या त्वरेविषयी आपण काय म्हणता? स्थलांतर,निर्वसन, याबाबत आपली काय भूमिका आहे? सर्वत्र,विशेषतः कोंकणामध्ये शेती, त्यातूनही भातशेती तोट्यात आहे. कोंकणी लोकांनी आंबे, काजू, रतांबे, जांभळे करवंदे अननस इ.च्या योगे(च) समृद्धी गाठावी का, तशी ती गाठणे शक्य आहे का, आदरातिथ्य उद्योग (हॉस्पिटॅलिटी-कृषिपर्यटन) कोंकणी माणसाच्या गुणसूत्रांना साज़ेसा आहे का, शिक्षित पण अकुशल अशा सामान्य कोंकणी व भारतीय माणसाविषयी आपल्याला काय वाटते?

मनोगती आपापली मने,संगणक-पेने गतिमान करतील ?