वर्तुळ

            वर्तुळ

नेहमी अबोलपणे तु
माझं मन जपलंय
पण वाटतं मलाही कळावं
काय तुझ्या मनात लपलंय

भेटायला उशीरा आले म्हणून
नेहमी तु माझ्यावर चिडलाय
त्यामागची तगमगच सांगते
किती माझ्यावर जीव जडलाय

आपल्या माणसासाठी हारणं
यातलं सुख तुला कळलंय
म्हणून मला जिंकवण्यासाठी
हारण्याकडेच तुझं मन वळलंय

कितीही लपवलंस माझ्यापासून
तरी माझं प्रेम मनात साठलंय
प्रत्येक वेळी आठवांनी माझ्या
तुझ्या डोळ्यात पाणी दाटलंय

चिडणं, रुसणं, लाड अन् प्रेम
या सगळ्यातून तु माझं मन राखलंय
तुच व्यास अन् तुच परीघही
तुझंच वर्तुळ मी माझ्याभोवती आखलंय.

............ आरती कदम