मूक
तू आलीस माझ्या घरात;
मी ओलांडलेलाच उंबरठा ओलांडून;
माझा नवरा तुझ्याशी वाटताना;
गेले होते मी मुळापासून कोलमडून.
खरंतर माझ्या देण्याचा;
इथे प्रश्नच नव्हता;
माझ्याकडून सगळं लुटायचं;
हाच नियतीचा डाव होता.
कुठेतरी पायवाटेवरून अडखळले;
म्हणून आई न होण्याचा शाप मिळाला;
अन माझ्या नवऱ्याने त्याचा वंश;
वाढवायचा नवा मार्ग शोधला.
तो कुठूनतरी सुखी होतोय;
म्हणून मी मूक राहिले;
दुरावलेल्या माझ्या नवऱ्याच्या;
सावलीला कुरवाळत राहिले.
उभारला स्वप्नांचा पारिजात माझ्या दारी;
आशेची खोटी फुले माझ्या पदरी;
पण पारिजाताला लळा तुझा;
अन सडाही तुझ्याच अंगणी.
तरी अजूनही एक आशा आहे;
पडावं माझं निर्माल्य तुझ्या पारिजाताखाली;
तेव्हा तरी मला भारून टाकावं;
तुझ्या त्या रेशमी फुलांनी.