अरूस,
तुला मुद्दामच असं मोघम संबोधलं आहे, बरोबरीच्या नात्यानं. नमस्कार-आशिर्वाद हे प्रकरण नाही म्हटले तरी कांहीसा दुरावा निर्माण करणारे वाटते, नाही कां?
एक मनोगती, 'ध्येयवेडा’,ने नुकतेच त्याच्या कांही सामाजिक अनुभवांबद्दल लिहिले होते, ते तूं वाचले असेलच. त्यावर प्रतिसाद देताना 'श्रीवत्स’ ने म्हटले आहे की ’संवेदनशील मन असणे हे एक अत्यंत चांगलं लक्षण आहे.' पुढे, रूपेश बक्शी ने म्हटले आहे की, 'समाजात जगताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटतात, आपल्याला त्यांच्या परिस्थितीची जाणीव होणे, कळवळा येणे, म्हणजे खरे जीवन.' तूंही सामाजिक कार्यातील तुझे वेगवेगळे अनुभव सांगत असतेस्.
तेव्हा, संवेदना जागती असणं हे मानवी मनाच्या जिवंतपणाचं लक्षण असतं हे खरंचय्. असं मनच नवरसांचं पान करू शकतं आणि असं पान केल्यानंतर चित्ताला जे प्रतिसाद द्यावेसे वाटतात, ते जी अनुभूती घेते, त्याची पावती कशी मिळते? तर, कधी अंगावर रोमांच उभे राहातात, कधी दरदरून घाम सुटतो, कधी डोळ्यातून अश्रू वाहू लागतात - कधी आनंदाने तर कधी दुःखाने, कधी मुक्तपणे नाचावेसे वाटते, कधी हृदयात एव्हढे दाटॄन येते की जीव गुदमरतो, हुंदके द्यावेसे वाटतात, मिठीत अनुभूती विरून जाते, कधी अनुभूती चित्तात साठविण्यासाठी डोळे मिटले जातात वगैरे वगैरे. वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या अनुभूती येत राहातात व वेगवेगळ्या प्रकारे मनाकडून प्रतिसाद दिले जातात.
वैयक्तिक आयुष्य जगताना असो किंवा सार्वजनिक कार्य करताना असो, कांही घटनांमध्ये सहानुभूतीला प्रतिसाद देत जे कांही आपल्या हातून घडते, त्या घटनेनंतर संवेदनेची संवेदना कधी हंसते तर कधी मौन होते तर विषण्णता मनाला उदासीन करते. त्यातही, प्रतिपक्षाच्या कृतघ्नपणाचा अनुभव हा एक मनाच्या परिक्षेचा क्षण असतो. अशा घटनेचा प्रतिसाद मनात इतका तीव्र उमटतो की संवेदनेच्या संवेदनेला उदासीनता येते. पुढे आवश्यक प्रसंगीसुद्धा ती प्रतिसाद देण्यापासून परावृत्त करते. मग, माणसाच्या ’जाऊं देत्’, ‘मरुं देत्‘, ‘मला काय त्याचे’ अशा वृत्तीचं प्रदर्शन घडतं. समाजाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने असं घडणं, हे मारक ठरणारे असतं. म्हणून, मी एक शिकलो की मन विषण्ण होऊ द्यायचे नाही.
माझे एक स्नेही होते. माझ्यापेक्षा वयानं वडील. मी वयाच्या पंचविशीत तर ते त्यावेळी चाळिशीच्या पुढे गेलेले. यांचा नि माझा संबंध कसा आला, ते सांगतो. मी नव्या नोकरीच्या निमित्ताने १९७२मधे दिल्लीला गेलो होतो. पहाडगंजच्या बृहन्महाराष्ट्र भवनात राहात होतो. कुणी ओळखीचे नाही, कुणी नात्याचं नाही. मराठी सोडून दुसरी भाषा सराईतपणे बोलता येत नव्हती. योगायोगाने सांगलीचा एकजण... ठाणेदार तिथे आला. आम्ही समवयस्क होतो. तो दूरदर्शनच्या प्रशिक्षणासाठी आला होता. कांही दिवस भवनात काढून आम्ही दोघे मिळून लक्ष्मीनगरला एका बरसातीत-इमारतीच्या वरच्या गच्चीवर बांधलेल्या खोलीमध्ये-राहावयास गेलो. दोघे मस्त मजा लुटत होतो. भवनाच्या समोरच नूतन मराठी विद्यालय आहे. तिथे मराठी नाटक दाखविणार होते.... कट्यार काळजात घुसली.. मी व ठाणेदार दोघेही नाटक पाहायला गेलो होतो. परत घरी जाताना रात्र बरीच झाली होती. आम्ही बसच्या अगदी मागच्या सीटवर बसलो होतो. लक्ष्मीनगर हा शेवटचा थांबा येईपर्यंत सारे जण उतरून गेले होते. मी, ठाणेदार व बसचा वाहक गप्पा मारत होतो. शेवटी उतरताना लक्षात आले. कुणीतरी तबला-डग्गा बसमध्ये विसरून गेले होते. तो घेऊन घरी गेलो. दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन सूचना फलकावर एक सूचना लावून आलो. ज्यांचा कुणाचा तो तबला डग्गा असेल, त्यांनी ओळख पटवून घेऊन जावा. इथून पुढची कथा मजेदार आहे. त्या शाळेत शिकवणाऱ्या सौ. भावे यांनी घरी जाऊन या सूचनेबद्दल श्री. भावे यांना सांगितले. मला दूरध्वनी आला. या संभाषणादरम्यान श्री. भावे यांनी मला जणू आदेश दिला... 'तुमचा बेडबिस्तरा उचला... टॅक्सीत बसा नि सरळ माझ्याकडे या.’
घरी येऊन ठाणेदारला सारी कथा सांगितली. तो भावेंकडे येण्यास तयार होईना. 'ही दिल्ली आहे... कुणावर विश्वास ठेवायचा? कोण भावे, त्यांना तूं पाहिलेही नाहीस आणि चालला राहायला?’ त्याने वाद घातला, पण मी ऐकेना म्हटल्यावर तोही तयार झाला. आम्ही भावेंकडे दाखल झालो. त्यांनी तो तबला-डग्गा लालजी गोखले यांचा असल्याचे सांगितले. मला घेऊन मग ते लालजी गोखल्यांकडे गेले. तबला त्यांचा त्यांना सुपूर्त केला. पोहे-चहा घेऊन आम्ही परतलो. भावे यांच्या संगतीत दिवस मस्त जात होते.
तीन महिन्यांचे प्रशिक्षण संपवून ठाणेदार सांगलीला परतला. भावे यांना तीन मुलगे होते. पैकी थोरला कांही आजारपणाचे निमित्त होऊन निवर्तला होता. दुसरा मुलगा गिरीश नागपूरला त्याच्या मामाकडे राहात असे. तो कांहीतरी पाचवी-सहावीत शिकत होता. त्याला ताप येणे सुरू झाले, तेव्हा गिरीशला मामाने दिल्लीला आणून सोडले. सुरुवातीला साधा डॉक्टर, मग स्पेशालिस्ट, नंतर ऑल इंडिया मेडिकल इंस्टिट्यूटमधील औषधोपचार सुरू झाले. तिथे घेतलेल्या परिक्षेत डॉक्टरांनी निदान केले... अप्लास्टिक ऍनिमिया-रक्तक्षय! गिरीशला ताबडतोब रक्त द्यावयाचे होते. भावेंचा मला कार्यालयात दूरध्वनी आला. या आजाराबद्दल मला कांही माहिती नव्हतीच. लगेच गेलो, रक्त दिले व कार्यालयात परतलो. माझं हे वागणं अगदी कॅज्युअल होते . गिरीशचे दुखणे कांही महिने चालले. दरम्यान भावेंचे वडील मुंबईत राहात. ते निवृत्त होऊन दिल्लीला आले. अधून मधून गिरीशला रक्त देणे सुरू होतेच. गिरीशची नि माझी तसेच त्याच्या आजोबांची नि माझी गट्टी जमली. आजारपणातून मुक्तता व्हावी, या हेतूने गिरीशची मुंज झाली. त्याचा उपयोग अर्थात् झाला नाही ती गोष्ट वेगळी. दरम्यान माझी बदली मुंबईला झाली. माझी बदली रद्द व्हावी, यासाठी आजोबांनी सत्यनारायण पूजेचा नवस केला. मीही मग सत्यविनायकाची पूजा कबूल केली. नारायण बळी कां विनायक ह्याची परीक्षा पाहायची वेळ आली नाही. आजोबा नि मी एकाच खोली झोपत असू. उन्हाळ्याचे दिवस असल्याने घरातील बाकी सरे वरच्या गच्चीत झोपायला जात. एके दिवशी पहाटे सूर्यनमस्कार घालायला म्हणून आजोबा जागे झाले, पण त्यांना अर्धांगवाताचा झटका आला, त्यातच हृदयाघात झाला. ते कोम्यात गेले आणि दुसऱ्या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अस्थिविसर्जन यमुनेत माझ्या हाती झाल्या, हा योगायोग.
गिरीशचा ’जोका’ म्हणजे मी मुंबईत येऊन दाखल झालो आणि कांही महिन्यात गिरीश गेल्याचे कळले. बसमध्ये मिळालेल्या तबल्या-डग्ग्याच्या निमित्ताने भावे यांच्या कुटुंबात मी दाखल झालो होतो. जेमतेम दहा-अकरा महिने त्यांच्यात राहिलो. कॅज्युअली एकदा केलेल्या रक्तदानाने भावे कुटुंबियांशी माझे नाते पक्के बांधले गेले. गिरीश गेल्यानंतर भावेवहिनी सुन्न झाल्या होत्या. ते स्वाभाविक होते. पण, भावेजींवर झालेला परिणाम कुणाला दिसला नाही. त्यांचे कार्यालयात जाणे, सायंकाळी पेटी काढून गाण्यात रमणे सुरूच राहिले. त्यांना एकदा सहज विचारले, 'अहो, जरा वहिनींकडे पाहा, त्यांना सांवरले पाहिजे..’ वगैरे. भावे म्हणाले, 'त्याचं कायंय्, आपली सारी नाती ही गेल्या जन्मीची देणीघेणी चुकती करण्यासाठीच असतात. एकदा हा व्यवहार मिटला की नातेही संपते. गिरीशचे आमचा मुलगा म्हणून जे कांही देणेघेणे होते, ते मिटले... नाते संपले... त्यात दुःख ते काय मानायचे? पुढचे हिशोब आपल्याला चुकते करायचेत्, ते आता करायचे म्हणजे झाले!’ जीवनाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन या प्रसंगातून मला मिळाला. सख्ख्या नात्यापेक्षाही हे नाते पक्के झालेले मी अनुभवतोय्... माझी संवेदना हे सारे आठवून हंसते, आनंदित होत राहाते!
सध्या एवढेच सांगतो व पुरे करतो. अजून कांही प्रसंग पुढच्या पत्रातून...
तुमच्यातील एक मनोगती,
- यशवंत