मूनरूफ

"मानसी अग झालं कि नाही तुझं? किती वेळ? " मिलिंद ची रोज सकाळ सारखी आजही अखंड बडबड चालू होती.
"आले आले.. डबे भरतेय. " मानसी ही ठरलेली उत्तर देत होती. लग्नाला दोनच महिने झाले होते. अजूनही उष्ट्या हळदीचा वास तसाच होता.

मिलिंद आणि मानसी आय टी पार्क मध्ये प्रेमात पडलेल्या असंख्य जोडप्यांपैकीच एक. एकमेकांना साजेसे. दोघेही सुशिक्षित, सुसंस्कारित. लव्ह मरेज. थोडसं घाई-गडबडीत झालेलं. नाही पळून-बिळून नाही केलं. मिलिंदच्या बाबांना पाच महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने लग्न गडबडीत उरकावं लागलं.

"मानसी आवर ना! गाडी जाईल. " -मिलिंद परत.

मिलिंदचे बाबा सेवानिवृत्त होते. ते आज घरी नव्हते. मिलिंदच्या बहिणीकडे नाशिकला ते हवाबदलासाठी गेले होते. ते घरी असले कि त्यांची सकाळी छान करमणूक होत असे. मिलिंद आणि मानसीची धावपळ आणि त्यातूनही त्यांची शाब्दिक झोंबाझोंबी बाबांना दिवसभर फ्रेश ठेवायची. मानसीला ते शक्य तेवढी मदत करत. पण त्यांच्या तब्येतीला जपण्यासाठी मानसी त्यांना काही करून देत नसे. मिलिंदची आई त्याच्या लहानपणीच म्हणजे तो आठवीत असतानाच देवाघरी गेली. मोठ्या बहिणीने आणि बाबांनीच त्याचा सांभाळ केला होता.

मिलिंद-मानसीचं घर एका जुन्या वाड्यात होता. ते वाड्याच्या मालकाचे भाडेकरू होते. कधीतरी वाड्याचं बांधकाम होऊन स्वत:ची हक्काची जागा होईल अश्या अपेक्षेनी मिलिंदच्या बाबांनी दुसरं घर घेतलं नव्हतं.   मिलिंदला ते नवा flat घे म्हणून मागे लागले होते. तसा त्याने घेतला ही असता पण बाबांच्या बायपासमध्ये झालेल्या खर्चामुळे flat चं त्याने लांबणीवर टाकलं होतं. परत आयत्या वेळेस वाड्याच्या मालकाने बांधकाम काढलं तर पैसे तयार हवे म्हणून तो इतरत्र पैसे गुंतवण्यास तयार नव्हता. मानसीनेही समजूतदारपणे सगळं कलाकलानं घेतलं.

 ***

संध्याकाळी एका डिनर पार्टीला जाऊन दोघं उशिरा परत आली. खूप दिवसांनी मिलिंदने बाईक बाहेर काढली होती. ऑफिसला जाताना ऑफिसची बस असल्याने बाईक काढायची वेळ येत नसे. तसाही बाईकवरून ऑफिसला जायला मानसीचा नकार होता. ट्राफिक आणि अपघात ह्याला घाबरून!

बाबा ताईकडे गेल्याने मिलिंद मानसीला एकांत मिळाला होता. दोघं एकमेकांना लग्नाआधी आठेक महिने ओळखत होती. पण नव्या भूमिकेतून समोरच्या माणसाला नव्याने जाणून घेत होते. मिलिंद डोळे मिटून, बेडवर पडून, मानसीची वाट पाहत होता. "वर्क डेला कशाला पार्ट्या ठेवतात हे लोक? त्यातून मानसीच्या मैत्रिणीची पार्टी म्हणजे, असून अडचण न जाऊन खोळंबा! ", पडल्या पडल्या त्याचा मनात विचार चालू होता, "पण गाडी छान होती. "

मानसी आवाराआवर आणि दुसऱ्या दिवशीची तयारी करून बेडवर येऊन बसली. "मिलिंद! तुला संध्या आणि आनंद कसे वाटले? " -मानसी.
"चांगले आहेत... बोलायला, वागायला", डोळे न उघडता मिलिंद म्हणाला.
"सॅंडी माझी खूप जुनी फ्रेंड आहे" मिलिंदच्या केसात हात फिरवत मानसी म्हणाली. तिच्या हात फिरवण्याने मिलिंदला अजूनच झोप यायला लागली.
"काय रे ऐकतोयेस ना? ", त्याला मध्येच हलवून उठवत मानसी म्हणाली, "त्यांची गाडी पण छान आहे नाही"
"हं"- मिलिंद. डोळे मिटलेलेच.
"ए आपण पण घ्यायची गाडी? " -मानसी.
"हं"-मिलिंद.
"हं नाही. ए खरं सांग ना. कधी घेऊयात आपण गाडी? घर नाहीतर गाडी तरी"-मानसी.
"उद्या", असं म्हणत मिलिंदने मानसीला डोळा मारला. हाताने तिला स्वत:कडे खेचलं.
"उं शहाणा आहेस मला माहितेय उद्या कधी येत नाही... " -मानसी. पुढचं तिला काही बोलताच आलं नाही. कारण तिचे ओठ...

 ***

"मिलिंद! सॅंडी आज गाडी घेऊन आली होती ऑफिसला. तिने लायसन्स काढलं. आम्हाला चक्कर पण मारली अरे तिने". मानसीचं बोलणं प्रोसेस न करता मिलिंद ऐकून स्टोअर करत होता.
"ऐकतोयेस ना रे! " -मानसीने खात्री केली.
"हो बोल. ", बँकेची स्टेटमेंटस चेक करण्याचं महत्वाचं काम करत मिलिंद टेबलापाशी बसला होता.
"अरे त्यांच्या गाडीला मूनरूफ आहे" -मानसी.
"ओह बर" -मिलिंद.
"काय मस्त वाटतं मूनरूफ! " -मानसी.
"ए आपणही गाडी घेतली की मूनरूफ सांगू हं! पैसे जास्त पडतात पण I think we can afford that much! ", जीभ चावून हसत मानसी म्हणाली.
"बर" -मिलिंद.
"कधी घेऊयात गाडी? ", मानसी परत मुळपदावर.
"घेऊयात" -मिलिंद. गाडी घेणं अशक्य नव्हतं पण ती घेतली आणि घराचं निघालं तर पैसा कुठून उभा करायचा? हा त्याचा प्रश्न होता.
"घेऊयात पण कधी? " -मानसी टेबलापाशी येऊन उभी राहिली. बोलताना थोडी अधीर वाटली, म्हणून मिलिंदने वर पाहिलं. आत्तापर्यंत RAM मध्ये स्टोअर केलेलं सगळा कॅशेत आणलं.
"घेऊयात ना घाई काय आहे? ", तिला शांत करण्याच्या उद्देशाने मिलिंद म्हणाला.
"घर नाहीतर गाडी तरी घे मला", मानसी नाराजीच्या स्वरात म्हाणाली. ज्या घरात मिलिंदचं बालपण गेलं, त्याच्या आईच्या आठवणी आहेत ती जागा त्याला सोडून द्यायला सांगणं तिच्या मनाला पटणार नव्हतं म्हणून घराच्या बाबतीत तिनं स्वतःला समजावला होतं. त्याची जाणीव मिलिंदलाही होती.
"हे बघ मानसी, तुला माहितेय बाबांच्या बायपासचा मोठा खर्च आत्ताच झालाय. माझ्या शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते पण चालू आहेत. आपल्या लग्नाच्या वेळी झालेला खर्च वेगळाच. " -मिलिंद. मानसी तोंड फुगवून ऐकत होती. "आपण घेऊयात न गाडी. पण गाडी घेतली आणि वाड्याचं काम निघालं तर मग त्याचे पैसे कुठून आणायचे? मग अजून एक हप्ता मागे लावून घ्यायचा का? तुला माहितेय घराच्या पैशासाठी आपल्याला तयार असायला हवं. मालक कधीही काम सुरू करेल. ", मिलिंद पोटतिडकीने बोलत होता.

"काही महिने थांब. थोडे पैसे गोळा झाले की घेऊ. " तो तिला समजावत म्हणाला.
"माझ्या बँक अकौंटमध्ये आहेत ना ते वापर. " -मानसी.

"मानसी त्यात तुझे लग्नाआधीचे काही पैसे आहेत. ते मी घेणार नाही. आणि उरलेली रक्कम आपत्कालीन म्हणून ठेवायचं ठरलंय ना आपलं? " -मिलिंद. आपला अहंकार मध्ये न आणता मिलिंदने तिला स्पष्ट सांगितलं.
"पण मी सांगतेय ना तुला ते पैसे वापरायला मग तुला काय प्रोब्लेम आहे? " -मानसी आततायीपणे म्हणाली.
"मानसी तुला कळत नाहीये. " -मिलिंद.
"मग सांग ना मला. " -मानसी.
"आत्ता नको. तुझं डोकं शांत झाल्यावर. " -मिलिंद. मानसी धुसफुसत स्वयंपाकघरात गेली. दोन-तीन भांडी आपटल्याचा आवाज आला. मिलिंद परत क्रेडीटकार्डसचे चार्जेस पाहण्यात गुंग झाला.
 

दोन दिवस मानसीच्या रागात आणि मिलिंदने तिचा राग काढण्यात गेले. "बाबा ताईकडे आहेत, चांगला वेळ मिळालाय तर ही भांडत काय बसलीय? " मिलिंद विचार करत होता. "She is wasting time! ", असा विचार करून हळहळत होता. "काहीतरी करायला हवं! "
"१०-१५ दिवसात बाबा परत येतील. एवढा रुसवा पुरे झाला का? का continue करावा? बाबांसमोर नको राग वगैरे... " अशी मानसीचीही मनात तारेवरची कसरत चालू होती.
 

 ***

आज मानसीला ऑफिसमध्ये उशीर होणार होता. तिच्या प्रोजेक्टचा रिलीज होता. मिलिंद नेहमीच्या बसने घरी आला. नेहमीचे व्यवहार सुरळीत चालले असले तरी मानसीच्या मनात अजून गाडीचा विषय होताच. "काय करावं हिच्या रागाला? आज काय वार.. बाबांना यायला किती दिवस? " असं म्हणून मिलिंदने कालनिर्णय पाहिलं. आणि एकदम काहीतरी दिव्य सापडल्यासारखं "येस" म्हणून ओरडला. "कसं अगदी जुळून आलंय", मनातलं अलगद ओठांवर आलं. घाईघाईत बाईक काढून तो चौकाच्या दिशेने निघाला.

रीलीझमुळे मानसीला उशीर झाला म्हणून तो तिला बाईकवरून stop वर आणायला गेला. दमली होती बिचारी. घरी आली तशी पर्स टाकून म्हणाली,
"आईचा फोन आला होता. चंद्राला औक्षण कर म्हणून. आज कोजागिरी आहे वाटतं. मी कॅलेंडर पाहिलंच नाही रे! मसाल्याचं दुध पण केलं नाही! "
"हो का कोजागिरी? ओह बर"-मिलिंद.
हातपाय धुवून मानसी स्वयंपाकघरात गेली. gas वर पातेल्यात मसाला दुध ठेवलं होतं.
"हे कोणी केलं? तू केलंस? " -मानसी.

"येस ma'm! गरम आहे म्हणून झाकलं नाहीये" -मिलिंद.
"तुला माहित होतं आज कोजागिरी आहे ते? " -मानसी.
"हो मी मघाशी कॅलेंडर पाहिलं. " -मिलिंद- "आता ते शेजारी झाकलेलं पातेलं बघ"
तिने पाहिलं तर त्यात सुकी भेळ होती आणि शेजारी ओल्या भेळेची तयारी पण. तिला एकदम मस्त वाटलं. एकदम सही!
"तू हे सगळं केलंस? सॉलिड आहेस. " -मानसी.

"हं"- मिलिंद - "बर तू औक्षणाची तयारी कर आणि गच्चीत ये. "
"गच्चीत कशाला? चंद्र इथे खिडकीतून पण दिसतोय की! " -मानसी.
"अग कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र एका कवडातून पाहणार तू? त्याची बेज्जती आहे ही. ", मिलिंद डोळा मारत म्हणाला "ये मी भेळ आणि दुध घेऊन पुढे जातोय" -मिलिंद.

मानसी ऑफिसचा पश्चिमी पेहराव बदलून, छान पंजाबी ड्रेस घालून, औक्षणाचं ताट घेऊन गच्चीत आली. मिलिंदने गच्चीचा चेहराच बदलला होता. त्याने स्वत: झाडून, पाणी टाकून गच्ची साफ केलेली होती. मधोमध सतरंजी टाकली होती. त्यावर गुलाबाच्या पाकळ्या पसरल्या होत्या.
"हे पण तू? " -मानसी.
"मग आमचा चंद्र दमून भागून यायचा होता ना? " मिलिंदच्या ह्या बोलण्याने, अंगावरून मोरपीस फिरावं तसं वाटलं मानसीला. किंचित लाजलीही ती.

औक्षण झाल्यावर दोघांनी चंद्राला नमस्कार केला. दुधाचा नैवैद्य दाखवला. मग एक एक दुधाचा पेला स्वत:साठी घेऊन दोघे सतरंजीवर बसले. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रभेनी आसमंत भरून गेला होता. आकाशाच्या काळ्या मखमलीवर कोणीतरी चांदण्यांचं भरतकाम केल्याचा भास होत होता. हवा पण छान होती आणि सहवासही हवाहवासा.
"मानसी तुला मूनरूफ हवं होतं ना? हे बघ मूनरूफच आहे. आवडलं? "

"मिलिंद यू आर ग्रेट! Thank you! ", मानसी म्हणाली.
"ग्रेट वगैरे काही नाही ग! कालान्वये गाडी घेऊच आपण, तुला हवी तशी, मूनरूफवाली, पण तोपर्यंत मून पाहायचा नाही का? " -मिलिंद.
"हं" -मानसी.
"आणि मानसी आपली तर हनिमून फेज चालू आहे. आता मी तुला मून दिला तू मला हनी नको द्यायला? " - असं लाडाने म्हणत मिलिंद मानसीकडे झुकला.
त्याला दूर ढकलून, मानसी उठून, धावत गच्चीचा जिना उतरू लागली. जाताना हसत मागे वळून म्हणाली, "देईन ना ढगांच्या दुलईआड! "

संपदा म्हाळगी-आडकर