प्रयोग : तक्षशीलेच्या ऱ्हासाचे आख्यान

मित्रहो,

'तक्षशीलेच्या ऱ्हासाचे आख्यान' या संगीत दीर्घांकाच्या प्रयोगपूर्व प्रसिद्धी मनोगतावर झालेली आहे. त्याबद्दल प्रशासकांचे आभार.

(सर्व चित्रे मोठ्या आकारमानात क्रमाने पाहण्यासाठी कोठल्याही चित्रावर टिचकी मारून सरकचित्रदर्शन सुरू करावे. )

प्रयोगाबद्दल:

हा प्रयोग पोट्टी श्रीरामलू युनिव्हर्सिटी , नामपल्ली, हैदराबाद येथे दि. २८ फेब्रु. २०१० रोजी सायं. ७:३० वाजता सुरू होऊन रात्रौ ९:३० वाजता संपला. साधारणतः २०० प्रेक्षकांच्यासमोर हा प्रयोग सादर झाला. नाट्यगृहाची क्षमता ३५० आहे. ते अगदीच गच्च भरले नसले तरी प्रेक्षकांच्या प्रतिसादाप्रमाणे प्रयोग यशस्वी झाला असे म्हणतो. (शनिवार, रविवार आणि सोमवारी होळीची सुट्टी - जी आंध्रात असते - यामुळे बरेच शक्य प्रेक्षक अनुपस्थित होते. )

पुन्हा प्रयोग होतील अशी आशा आहे.

नाटकाबद्दल :

हे कीर्तनकाराने वर्तमानकाळात लावलेले आख्यान आहे. आज सत्ययुग अवतरले आहे. सर्व प्राणिमात्र सुशील झाल्याने काहीच वाईट घडत नाही - सर्व विश्व सुखात आहे. त्यामुळे कुणाला शहाणे, सुशील करण्यासाठी हे आख्यान नाही तर ते प्राज्ञ श्रोतृवृंदाच्या निखळ मनोरंजनासाठी आहे.

कथानक घडते तो काळ अंधारयुगातला आहे. हे कथानक सूत्रधार सांगत आहे. त्याकाळी सर्वकाही वाईट घडत असे.

मगधसम्राट चंद्रगुप्त- बिंदुसार - अशोक - दशरथ - संप्रति या महान मौर्य राजघराण्यातील शालीशुक राजा हा मात्र अत्यंत नीच, स्वार्थी, कपटी(... इ. इ. ) निघाला आहे. प्रजेला पोकळ मनोरंजनात गुंगवून ठेऊन तो मनमानी कारभार करत आहे.प्रजेला खायला अन्न मिळत नसले तरी ती भाट, विट आणि गणिका यांच्या चमूंनी केलेल्या विविध कार्यक्रमांनी संमोहित होऊन सर्व समस्या विसरून गेलेली आहे. त्याला तक्षशीलेचे गुरुकुल आर्य चाणक्याच्या अर्थशास्त्राप्रमाणे राज्यकारभार करण्याचा सल्ला देत आहे. हाच काय तो एकमेव काटा त्याच्या अनिर्बंध सत्तेत सलत आहे. तो कायमचा काढून टाकण्याची संधी शालीशुक आणि त्याचे हस्तक शोधत आहेत.परंतु गुरुकुलाविषयी जनमानसात असलेला आदरभाव त्यांना गुरुकुलाविरुद्ध कोणतीही प्रत्यक्ष कृती करू देत नाही.

अशावेळी जमेलिनस नावाचा बाल्हिक देशातील यवन इतिहासकार तक्षशीलेच्या गुरुकुलात येतो आणि सम्राट चंद्रगुप्ताचे चरित्र लिहिण्यासाठी तेथील आचार्यांकडून सामग्री मिळवतो. त्यानंतर लिहिलेल्या ग्रंथात त्याने त्या माहितीच्या आधारे विपर्यस्त निष्कर्ष काढला आहे.

या ग्रंथाचा फायदा घेऊन शालीशुक आणि त्याचे साथीदार कोणती योजना आखतात? तक्षशीलेच्या गुरुकुलाचा ऱ्हास कसा होतो? या प्रश्नांची उत्तरे नाटकात मिळतात.

श्रेयनामावली

अभिनेते

कीर्तनकार - श्री. माधव चौसाळकर
सूत्रधार - श्री. पराग साठे
सम्राट शालीशुक - श्री. मायानंद ठाकूर
भाट मधुजिव्हाग्रज - श्री. चंद्रकुमार खांदाट
विदुषक शज्ञापक - श्री. प्रकाश फडणीस
आचार्य बहुकर्मा - श्री. बी. एस. कुलकर्णी
यवन जमेलिनस - श्री. अरुण शेंदुर्णीकर
आचार्य गणाधीश - श्री. संदीप काळे
भंते बोधीमित्र - श्री. अनंत कुलकर्णी
दूत शारंगधर - श्री. निखिल जोशी
भृतक - श्री. प्रमोद खांदाट
विशाखादत्त - चि. चैतन्य ठाकूर
शिष्य - चि. ऋषभ सोमण,अजित जोशी,सोहम चौसाळकर,कु. अक्षिता काळे
साथी - श्री. योगेश शेट्टी व इतर

संगीत दिग्दर्शन
श्री. पराग साठे

प्रकाशयोजना
प्रा. भास्कर शेवाळकर

वेशभूषा आणि रंगमंच
सौ. सुवर्णा नाईक

रंगभूषा
पी. बाबूराव आणि मंडळी

वाद्ये
तबला - श्री. संजय माहूरकर
पेटी - श्री. श्रीनिवास जोशी

उल्लेखनीय योगदान
श्री. प्रकाश धर्म श्री. प्रकाश तुळजापूरकर

लेखन आणि दिग्दर्शन
श्री. विजय नाईक