माझे बंगलोर आगमन - भाग १

शेवटी हो-नाही करता करता बंगलोर मध्ये आगमन झाले. नजर सारखी हृिशिकेश ला शोधत होती. त्याच्या म्हणण्याप्रमाणेच त्याला सकाळी सकाळीच फोन करून उठवून सांगितले होते की १/२ तासात पोचतो आहे म्हणून,  तरी लेकाचा आला नव्हता.  तशी सखी (बायको) माझ्याआधीच २ महिने आली होती आणि तिने घ्यायला यायची तयारीही दाखवली होती,  पण तोंड वर करून नवऱ्यांचा बायको पेक्षा मित्रांवरच जास्त विश्वास असतो हे सांगून तिला माझा साफ नकार कळवला होता.  आतापर्यंत वाट बघून तास झाला पण "मित्राचा" पत्ताच नाही.  आता काय?  हा प्रश्न मनात मधमाश्यान्सारखा घोंगावत होता.  तरीही जरा वेळ काढावा म्हणून दुकानावरच्या पाट्या बघितल्या तर मला माझ्या संकटांची जाणीव झाली कारण सगळ्या दुकानांवरच्या पाट्या म्हणजे न्युडल्स चिकटलेल्या आणि त्याला मस्त गडद रंग फासलेला (क्षण भर मला कन्नडमध्ये असलेल्या पाट्या बघून राज साहेबांची आठवण आली), कळत नाही म्हणून मान वळवावी तर मनातील अनेक प्रश्नरूपी मधमाश्या चावत होत्या. बरं आतापर्यंत बायकोला फोन करून बोलवण्याइतपत माझ्या अहंकाराला सुरुंग लागला नव्हता म्हणून मी माझा मोर्चा रिक्षावाल्याकडे वळवणार तोच, मनात माझ्या हितचिंतकांचे  अनाहूत सल्ले/ आदेश आठवले की रिक्षावाल्यांकडे जायचे नाही, हे म्हणजे हात पाय बांधून पाण्यात ढकलायचे आणि आता पोहायला लागा म्हणायचे. एकाचवेळी मनोमन सगळ्या नातेवाईकांचा सल्ला धुडकावत, पाकिटामधील पैसे मोजत रिक्षावाल्याकडे गेलो म्हणालो "भैय्या, बनेरघट्टा रोड जाना है, चलोगे क्या? " यावर त्याने ताडले की नवीन पाखरू आले आहे, म्हणाला "उंदू गुंदू यदरी अप्परफ ज्स्दफ्कोल्फ, इल्ला"!!! (हे शब्दशहा नाहीयेत पण असेच काहीतरी कन्नड होते). जसे तो कन्नड मध्ये बोलला तसे मी घूमजाव केला आणि परत जागेवरच जाऊन बसलो. आतामात्र चिडून हृिशिकेशला फोन करून शिव्या घालणार तेव्हढ्यात मघाचाच रिक्षावाला एका पोलिसाला घेऊन माझ्याकडे येताना दिसला.

आता मात्र जरा अतीच त्रास होणार असे मानून मनाची तयारी करीत असतानाच, पोलिसाची जवळ येऊन "गूड मॉर्निंग, सर"  वाक्य ऐकू आले, सर ऐकल्यावर क्षणभर मी इकडेतिकडे बघितले आणि ते वाक्य मलाच उद्देशून होते ह्याची खात्री झाल्यावर थोडा दिलासा मिळाला. मग रिक्षावाला-पोलिस यांची कन्नड आणि माझी- पोलिसाची इंग्रजी या सगळ्यांची कसरत करत शेवटी पोलिसाचा "यू गो विथ हिम" असा सल्ला वजा आदेश कानांवर येऊन आदळला आणि तो मी पाळणार इतक्यात हृिशिकेश येऊन टपकला आणि अजून गोंधळ वाढला आता हृिशिकेश, पोलिस, रिक्षावाला आणि मी असा चोपात्री फड चालू झाला. मग मी शिस्तीत गुपचुप माघार घेतली आणि टपरी वर जाऊन बसलो आणि टिपीकल पुणेरी स्टाइल ने अंगुली निर्देश करत एक पेय मागितले आणि जे तो देईल त्याची वाट बघत बसलो. तर मंडळी, अश्या रितीने माझे बंगलोर शहरात आगमन आणि स्वागत झाले आणि मी सुटकेचा निःश्वास टाकला.

पेयपान झाल्यावर मी टाकलेला सुटकेचा निःश्वास परत आत घेतला, कारण मला जिथे जायचे होते तिथला पत्ता हृिशिकेशला सुद्धा माहीत नव्हता. झालं, एका दिवशी इतक्या गोष्टी सहन करायची माझी ताकद संपली होती (म्हणजे ती तर कधीच संपली होती, पण लग्न झाल्यामुळे जरा जास्त त्रास सहन करायची सवय झाली होती).  अशा रीतीने हृिशिकेश, मी आणि ते माझे नसलेले लटांबर बंगलोर दर्शनाला निघालो आणि तब्बल ६ तासांनी आमच्या लहानशा भाड्याच्या बंगल्यात प्रवेश केला.

                                                                                -- उर्वरित लेख पुढील भागात...

(नमस्कार वाचकहो, हा माझा पहिलाच अनुभव लेखन प्रपंच, चूक भूल द्यावी घ्यावी, आपले या लेखा बद्दलचे विचार, मते, उणीव आणि आवडल्याची पावती स्वागतार्ह आहे, आणि वाचकांनी नोंद घ्यावी की ह्या खऱ्या घटनेचा काही भाग कथेमध्ये नाट्यमयता निर्माण करण्यासाठी  बदलला गेला आहे)