मोडी लिपी

गेल्या महिन्यात मला इतिहास संशोधक मंड्ळाच्या सौजन्याने मोडी लिपी शिकण्याचा योग आला. ह्या क्लास मध्ये माझ्या सकट अनेक तरुण तरुणी व ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग होता. १९ दिवसांच्या या क्लास ने माझी एका विस्मरणात गेलेल्या लिपीची ऑळख झाली व टाकाची छापील मोडीतील लेख वाचण्या इतपत माझी प्रगती झाली. श्री मंदार लवाटे हे तरुण् शिक्षक आम्हाला खुपच जिव्हाळ्याने शिकवीत. महाराष्ट्राच्या शिवकालीन व पेशवेकालीन ईतिहासाची ओळख करावयाची असेल तर मोडी वाचता येणे व त्याचा सतत अभ्यास करणे आवश्यक आहे हे त्त्यांनी आमच्या मनावर यशस्वी रित्या बिंबवले. ते स्वतः गेल्या ८ वर्षांपासुन यात रस घेत असुन त्यांची प्रगती आश्चर्य कारक आहे याचे कारण त्यांनी आपला व्यवसाय सांभाळुन या विषयाला वाहुन घेतले आहे.या वर्गाचा एक महत्व पुर्ण फायदा म्हणजे मिळालेली खुपच रंजक माहिती. एक म्हणजे इतिहासाची मोडी लिपीत जवळ जवळ १५ लाख पाने अशी आहेत की जी अजून वाचल्या गेली नाहीत आणी त्यात दडलेला इतिहास ही आपणास माहीत नाही. दुसरी बाब म्हणजे मोडी लिपी चे जाणकार अख्ख्या महाराष्ट्रात केवळ १०० आहेत हेही कारण या अप्रकाशित इतिहासामागे असावे.पूर्वी मोडी लिपीतच सर्व खाजगी व कार्यालयीन व्यवहार महाराष्ट्रात होत असले तरी हिचा उगम नक्की माहीत नाही. एका विचार प्रवाहानुसार महादेव यादव व रामदेव यादव् यांचे काळात(१२६०-१३०९) हेमाडपंतांनी(किंवा हेमाद्री पंडीत) ही लिपी विकसीत केली तर काहीच्या मते हेमाडपंतानी हि लिपी श्री लंके हुन आणली.काही विद्वांनाच्या मते मोडी हा शब्द मौरयी या वरुन आला असावा यावरुन असे निदर्शनास येते की मोडी चा उगम किवा याचे हे रुप मौरयी लिपी वरुन प्राप्त झाले असावे. मौरयी लिपी ही मौर्य वंशाच्या काळात वापरली जात असे. भारतावर मौर्य वंशाचे राज्य हे इ.स्.पुर्वी ३२२ ते १८५ या दरम्यान होते. मोडी लिपी हि लिहिण्यास जलद असल्याने देवनागरी पेक्षा तिला अधिक महत्व प्राप्त झाले. लेखणी न उचलता हि लिपी लिहिता येते कारण देवनागरी सारखे मोडीत शब्द तोडावे लागत नाहीत.चार्लस विल्कीन याने ह्या लिपीचे टाईप तयार केले जेणे करुन काही मर्यादित स्वरुपात छपाई साठी त्याचा उपयोग झाला. हि लिपी १९५० पर्यंत वापरात होती त्यांनंतर मात्र तिचा वापर अधिक्रुत पणे बंद केला गेला कारण छापण्यासाठी ती अवघड होती. आणी तेंव्हापासुन मराठी देवनागरीत् लिहील्या जाउ लागली.आपल्याला मोडी वाचता येते हा अनुभव खरच सुखद आहे. उपक्रमावरिल मित्रांनी हि लिपी अवगत करण्याचा जरुर् प्रयत्न करावा व इतिहासाची अप्रकाशित पाने उजेडात आणण्यास हातभार लावावा.