फिर आया मौसम आयपीएल का !

फिर आया मौसम आय पी एल का ।  पुन्हा एकदा धूमधडाका आय पी एलचा.  मनोरंजन का बाप ...इति सोनी टिव्ही :) 
पुन्हा ते तासनतास टीव्ही ला चिकटून बसणं, पुन्हा संध्याकाळच्या सगळ्या कार्यक्रमांना कात्री !! टिव्ही वर फक्त सोनी आयमॅक्स !!
गेल्या दोन वर्षांपासून ह्या आय पी एल नं जो काही धुमाकूळ घातलाय ना की ज्याचं नाव ते !  त्या ललित मोदीला एक कडक सॅल्यूट !!  त्याने हे जे काय प्रकरण सुरु केलंय त्याला खरंच तोड नाही.  पैशांचा पाऊस पाडून खेळाडूंना त्याने आकर्षित केलं आणि प्रेक्षकांनाही !
मला क्रिकेटमधलं फार काही कळतं अशातला भाग नाही.  पण आजूबाजूचं सगळं विश्व जेव्हा  ह्या आयपीएल मधे गळ्यापर्यंत अडकलेलं असतं तेव्हा मलाही त्यात उडी मारावीच लागते.  "मारलेला शॉट काय सही होता", रनरेट कसा काढायचा, वाईड बॉल, नो बॉल, हॅट्रीक,  फ्री हीट कधी मिळते, विविध देशांतल्या देखण्या खेळाडूंची नावं ...... इतपत व्यवस्थित कळतं आणि इतक्या माहितीच्या जोरावर सकाळी फिरायला जाताना अगदी तावातावात चर्चा मात्र नक्कीच करता येते.  कारण तसंही बाकी सिरीयल्स बंद असल्यामुळे बोलायला काही फारसे ज्वलंत विषय नसतात :)
आयपीएल सुरु व्हायच्या आधी खरं तर हॉकी इतक्या प्रेमाने बघत होतो पण पहिल्या पाकिस्तानवरच्या विजयानंतर सगळ्याच मॅचेस फ्लॉप झाल्यामुळे तिकडे सेमीफायनल, फायनल ह्यात काहीच राम उरला नाही.  इकडे आयपीएलच्या पहिल्याच मॅचपासून जी काय धम्माल सुरु झाली की त्यामुळे हॉकीकडे दुर्लक्ष करण्यावाचून पर्यायच उरला नाही.  "फिर दिल दो हॉकी को" हे फक्त जाहिरातीतच राहिलं.
क्रिकेटबद्दल मला फार काही पुळका आहे अशातला भाग नाही.  पण मुलगा आणी नवरा इतक्या आत्मीयतेने बघतात ना की अगदीच आऊट ऑफ क्राऊड फील यायला नको म्हणून बघते इतकंच !  पण एकदा का कुठलंही काम करायचं म्हटलं की झोकून द्यायचा स्वभाव !!  त्यामुळे २५ एप्रिल पर्यंत आता फक्त आयपीएलच :)
पिल्लू आणि नवरा मॅच व्यवस्थित आणि शांतपणे बघत असतात पण मी बघायला लागले की माझा माझ्याही नकळत आरडाओरडा सुरु होतो.  अरे, मॅच काय शांतपणे बघायची गोष्ट आहे.....??  तिकडे सचिनचं शतक होत आलं की माझी भाजी करपते, रनरेट वाढला की पोळ्या वातड होतात.  युवराज च्या सिक्सरमुळे झकास मूड बनतो.  इन्व्हॉल्व्ह झालं की हे असं होणारचं ना !!
आयपीएलचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे "सर्वसमभाव" .  सगळ्या देशांमधले खेळाडू अगदी गुण्यागोविंदाने (?) एकत्र खेळत असल्यामुळे बघायला वेगळीच मज्जा येते.  सचिनमुळे "मुंबई इंडियन्स" जरी आवडती टीम असली तरी पंजाब च्या युवी ला सुद्धा झुकतं माप असतंच.  धोनीमुळे चेन्नई कडे पण सॉफ्ट कॉर्नर असतोच.  जयसूर्या, तेंडूलकर विकेट मिळाली की एकमेकांना मिठी मारतात, युसुफ पठानच्या झुंजार शतकानंतर शेन वॉर्न खुश होतो...हे बघायलाच किती छान वाटतं ना !! मॅच बघतांना पण काही टेन्शन नसतं.  मस्तपैकी एंजॉय करता येते.  सगळ्या खेळाडूंच्या खेळाचं स्वच्छ मनानं कौतुक करता येतं.  हेच आहे आयपीएल चं यश !!
आता तर फक्त दोनच दिवस झालेत.  झालेल्या सगळ्याच मॅचेस चुरशीच्या झाल्या आहेत.  सध्या तरी युसुफ पठान जोरदार चर्चेत आहे.  बघूया पुढे काय काय होतं ते...... कोणकोणते विक्रम घडतात, मोडतात, कोण जिंकतं !!