तो आणि मी (आणि तीही)

प्रसंग पहिला :
मी त्याला कडेवर घेऊन फिरतोय. तो झोपावा म्हणून देवाचा (आणि त्याचाही) धावा करतोय. थोड्या वेळाने तो झोपतो. नाक फुरफुरत असतं. सर्दीने वहात असतं. मी त्याला खाली ठेवतो. त्याचं नाक पुसतो. त्याच्या अंगावर शाल घालून झोपणार एवढ्यात तो रडत रडत उठून बसतो. पुन्हा कडेवर घेऊन फिरणं, खाली ठेवणं आणि त्याचं रडणं असं चक्र दोन-तीन वेळा झाल्यानंतर मी त्याला घेऊन उठतो आणि (नाईलाजाने) सुवर्णमध्य म्हणून बीनबॅगवर जाऊन रेलतो. त्याला डुलवत डुलवत झोपवण्याचा प्रयत्न चालूच. तो मधेच झोपतो.. थोडा वेळच. पुन्हा रडत उठतो. त्याच्या नाकातल्या आणि डोळ्यातल्या पाण्याने माझा खांदा भिजत असतो. जागा असेन तेव्हा तेव्हा मी अंधारातच त्याचं नाक/डोळे पुसत असतो. असं अर्धवट जागत अर्धवट झोपत चरफडत चरफडत आणि दुसऱ्या दिवशीच्या ऑफिसमधल्या कामाचा विचार करत मी रात्र काढतो. पहाटे कधीतरी झोप लागते.
सकाळी गजराच्या लाथेने मी उठतो. त्याला जरा शांत झोप लागलेली असते. त्याला खाली ठेवण्यापूर्वी एकदा त्याच्या चेहऱ्याकडे बघतो. वाहतं नाक कधीच थांबलेलं असतं. चोंदलेलं असतं. सुकलेलं असतं. म्हणजे रात्री खांदा भिजवणारं पाणी फक्त डोळ्यातलं असतं. नाकातलं नाही. कारण एक नाकपुडी कधीच बंद झालेली असते. मी चरकतो. रात्रभर एका नाकपुडीने आणि तोंडाने श्वास घेण्याचा त्याचा प्रयत्न चालू असतो आणि त्यातून ती रडरड, अस्वस्थता आलेली असते. माझ्या अंगावर काटा. हजार पातकांचं ओझं खांद्यावर पडल्याप्रमाणे भासतं. मी अजूनच गुदमरतो.
प्रसंग दुसरा : (काही आठवड्यांनंतर)
रात्री दोन-अडीचचा सुमार.. शेजारी चुळबुळ होते. ती वाढते, रडण्याचा आवाज. स्वर चढत चढत जात टिपेला लागतो. त्याला प्रेमाने, दामटवून झोपवण्याचे सगळे प्रयत्न फसल्यावर कडेवर घेऊन फिरण्याचा एकमेव रामबाण उपाय शिल्लक असतो. मी त्याला उचलतो, कडेवर घेतो, फेऱ्या मारायला लागतो. साधारण ४० सेकंदात तो एकदम गाढ ... मला पुन्हा झोप लागायला १५-२० मिनिटं लागतात.
दुसरी रात्र. घड्याळ अंदाजे ३ वाजवत असावं. शेजारी चुळबुळ, रडं आणि टिपेचा आवाज ठरल्या क्रमाने घडतं. मी पुन्हा रामबाण मारतो. ५० सेकंदात लक्ष्यवेध. मला झोप लागेपर्यंत अर्धा तास उलटून जातो.
तिसरी रात्र. मी प्रचंड दमलेला. सलग ३-४ रात्रींची अनियमित आणि अर्धवट झोप. त्यामुळे गाढ गाढ गाढ झोपेत. इतका की मला थेट 'टिपेचा आवाज' वाली शेवटची पायरी ऐकू येते. शक्तिपात झाल्यासारखा मी उठत नाही. उठू शकत नाही. पण रडं सहन न होऊन अखेर उठावं लागतंच. "च्यायला, काय वैताग आहे" असं उधळत.. पण क्षणभरच. पण अचानक मला एवढ्या झोपेत असूनही काहीतरी चुकीचं बोलल्याचं जाणवतं. मी जीभ चावतो. चुकीच्या जाणीवेने की चुकीचं बोलल्याला शिक्षा देण्याच्या जाणीवेने? दुसरं असावं बहुतेक.
प्रसंग तिसरा : (काही दिवसांनंतर) 
नुकताच ऑफिसमधून घरी आलेलो. जेमतेम कॉफी पिऊन होते ना होते तोवर पिल्लू उठतं. रडायला लागतं. त्याला कडेवर घेतो. फेऱ्या मारतो. तरीही हळू आवाजात रडरड चालूच. मी जरा ओरडल्याच्या स्वरात बोलून जातो "अरे कडेवरच आहेस की... आता काय डोक्यावर घेऊन नाचू?" अर्धवट झोपेत आपली मान माझ्या खांद्यावर विसावणाऱ्या त्याला प्रश्न पडला असावा की हा एवढा का बिथरला? एवढं ओरडायला झालं काय? त्याचं उत्तर माझ्याजवळ नसतं. यावेळी मी नजर चुकवत नाही की जीभ चावत नाही. सरळ माफी मागतो त्याची. "सॉरी राजा सॉरी" असं म्हणत. होप त्याला कळलं असेल मला काय म्हणायचंय, काय सांगायचंय. "सॉरी राजा सॉरी" मागे मोठ्ठाच्या मोठ्ठा माफीनामा दडलेला असतो !!!
-----------------------
* या सगळ्या प्रसंगांत उल्लेख फक्त 'तो' आणि 'मी' चेच असले तरी 'यत्र, तत्र, सर्वत्र' किंवा फरहान अख्तरने सोप्या भाषेत '"सन्नाटा सुनाई नही देता और हवाए दिखाई नही देती" म्हटल्याप्रमाणे 'ती' सगळीकडे आहेच. त्याच्याबरोबर, माझ्याबरोबर आणि आम्हा दोघांबरोबरही. आणि कधीही सॉरी म्हणायची पाळी येऊ न देता !!!