अरुणाचल ...

अरुणाचलचा दौरा संपला। प्रवास, प्रवास अणि फ़क्त प्रवास! तब्बल ८ राज्य, १७ नद्या (गोदावरी, वर्धा, महानदी, संख, गंगा, ब्रह्मपुत्रा,लोहित), दक्खनच्या पठारावरून सातपुड्याच्या दक्षिणेकडून दंडकारण्य, मग छोटा नागपूर करून गंगेचे विस्तीर्ण मैदान, अहोमच्या पुण्यभूमीतून अरुणाचल गाठले! एकंदर प्रवास ९००० कि.मी. चा... १५ दिवस... १२ वीर.. प्रचंड थकवा आला, पण ज्या क्षणी लोहित चे निळेशार पाणी बघितले आणि थकवा गायब... परत तेवढाच प्रवास करायला तयार..
आम्ही अगदी पूर्वेच्या टोकाल जाऊन आलो. काहू नावाचे खेडे आहे पूर्वेच्या टोकाला. ९ घरांचे गाव! ITBP ची छावणी आहे. १९६२ ला चीन याच भागातून आले होते म्हणे. खरं तर हा अभ्यास दौरा! पण दौर्यात अभ्यास कसा करावा, हे मला न उलगडलेले कोडे आहे. पण बरेच छान अनुभव आले. यालाच अभ्यास म्हणावे मग. ब्लोग लिहितो आहे त्या ठिकाणापासून जवळपास ३००० कि मी अंतरावर असलेले माझ्यासारखेच स्वतःला भारतीय म्हणविणारी लोक! विलक्षण आहे भारतभूमी! या आपल्या भारत्पुत्राना भेटण्यात काही औरच मज्जा! फरक एवढाच आहे की त्याच्या भारतीयत्ववर शंका घेतली जाते! भारतभूमी विलक्षण आहे पण त्या पेक्षा हा विलक्षणपणा जास्त विलक्षण.. असो.
अरुणाचल फिरताना एक गोष्ट प्रकर्षानी जाणवली ती म्हणजे इथला 'पवित्र आनंद', 'सत्चित आनंद'. अरुणाचलच्या हवेत एक प्रकारचा पवित्रपणा जाणवला. अगदी विशुद्धपणा. मन प्रसन्ना झाले. डोळे स्वच्छ झाले. मनातल्या, डोक्यातल्या सगळ्या वाईटपणाला परीस-स्पर्श झाला. अंतकरण शुद्ध झाले. सारी सृष्टी स्वच्छ दिसायला लागली. जग किती सुंदर आहे ते जाणवले. अशा सुंदर भूमीत कोण पाप करायला धजावेल! अहो ते पापच नको म्हणेन!! तेवढीच छान, आनंदी लोक. का नसावेत.. अशा वातावरणात दुखी व्हायला ती काय globalized थोडीच आहेत. ज्याला माझ्यासारखे लोक 'basic facilities ' म्हणतात, अशा कुठल्याच प्रकारचा सुविधा त्यांना नाहीत. मुळात त्यांना ह्या गोष्टी कधी गरजेच्याच वाटल्या नाहीत. ८-१० घरांचे छोटे गाव. गावात प्रवेश करायला झुलता पूल. आधी तर तारेला उलटे लटकून जावे लागत होते म्हणे. कुटुंबाच्या, समाजाच्या, प्रगतीच्या संकल्पनाच वेगळ्या. चांगल्या-वाईट ठरविणे कठीण. आपण कोण ठरविणारे? प्रदूषित श्वास घेणाऱ्यांनी काय ठरवावेत शुद्धतेचे, पवित्रतेचे मापदंड! स्त्रीने शेती करावी, पुरुषाने शिकार करावी अशी विभागणी. निसर्गाकडून आजीच्या गोष्टी ऐकलेली लहान मुले. यात आमची 'प्रदूषित' दृष्टी 'स्त्रियांचे स्थान', Literacy level शोधणार!
दौऱ्यात आमचा जास्त संबंध मिशमी लोकांसोबत आला. ही एक लोहित, अंजाव आणि रोइंग जिल्ह्यांमध्ये असणारी वनवासी जमात आहे. आपल्या दृष्टीने civilized नाहीत. लग्नासंबंधीचे नियम बघा. लग्नाचा प्रस्ताव घेऊन मुलाकडच्यांनी मुली कडे जायचे, हुंड्याची उलटी पद्धत, लग्न लागताना कुठल्याही प्रकारचे मंत्र नाहीत ना कुठल्याप्रकाराचे कर्मकांड. आपल्याकडे प्रचलित असलेली लग्नसंस्कार नावाचे तिकडे काही पण नाही. तरी पण अशी लग्न टिकतात नव्हे फुलतात. लग्नानंतर एक वर्ष मुलगा मुलीकडे राहायला जातो. त्यानंतर मुलीकडचे ठरवतात मुलीला पाठवायचे की नाही. या समाजामध्ये कोणी अनाथ नसत, ना लहान मुल ना कोणी वृद्ध. अशा लोकांची काळजी घ्यायला अख्खा समाज तयार असतो. त्यांना आई-वडिलांचे प्रेम मिळत. म्हातारपणात आधार मिळतो. इथे कोणी भिकारी पण नसतो. विभक्त किंवा एकट्या राहणाऱ्या स्त्रीची काळजी घेतली जाते. तिला पूर्ण स्वातंत्र्य मिळते. घटस्पोट पण नियमांनी बांधलेला. इथे घराच्या रचनेची विशिष्ट पद्धती आहे. प्राण्यांची विशेष काळजी घेतली जाते. शेकोटीच्या विशिष्ट रचनेमुळे प्राण्यांचीही काळजी घेतली जाते. यांचा महत्वाचा प्राणी म्हणजे मिथुन. थोडाफार गाय आणि म्हशीशी साधर्म्य दाखवणारा हा प्राणी मिशमी लोक फार पवित्र मानतात. याला बांधून ठेवले जात नाही. पण दुसऱ्याच्या मिथुनला कोणी हात लावत नाही. ते पाप समजल्या जातं. अशी अनेक नियम आहेत. ती काटेकोर पाने पळाल जातात. मोडल्यास शिक्षेचे पण नियम आहेत. गुन्ह्याचे क्षालन, पश्चाताप गुन्हेगारासोबत त्याचे नातेवाईक पण करतात. आता विचार करूयात नक्की civilized कोण?
प्रचलित अंधश्रद्धा, बळी देण्याची पद्धत, बहुपत्नीत्व, शिक्षा देण्याच्या क्रूर वाटणार्या पद्धती या थोड्याफार काळ्या बाजू आहेत. पण हे आपल्यासारख्या civilized समाजात पण दिसतोच की!! मग यांना मागास, आदिवासी ठरविणारे आपण कोण?
संस्कृतिक आक्रमणे जशी या भागावर झाली तशी त्या भागात पण झाली, होत आहेत. आपण त्या प्रगतीच्या किंवा वैश्विकीकरणाच्या नावाखाली स्वीकारल्या. याला cultural assimilation असे नाव दिले आणि प्रक्रियेला development . दऱ्या-डोंगरात, जंगलात राहणाऱ्या या निसर्गपुत्राच्या बाहेरच्या बद्दल निरागस भाबड्या कल्पना. भौगोलिक परिस्थितीमुळे ही निसर्गपुत्र अलिप्तच राहिली. त्यामुळे आपल्या development च्या व्याख्येत बसली नाहीत आणि आम्ही त्यांना मागास, आदी ठरविले.
आज भारत राष्ट्राच्या निर्मितीच्या ६० वर्षानंतर प्रगत पश्चिमेत राहणाऱ्या मी जेंव्हा पूर्व बघतो तेंव्हा मला माझाच राग येतो. दैनंदिन आयुष्यात येवढा संघर्ष, दोन वेळेच्या जेवणासाठी एवढी पायपीट. निसर्गाशी सतत संघर्ष. हा पवित्र वाटणारा निसर्ग आपल्याच कुशीत राहणाऱ्या या निसार्गपुत्रांची अशी कठीण परीक्षा का घेतो? तरीही हा पुत्र सतत हसताना दिसला. मन सुन्न झाले. सुख-दुखाच्या, प्रगत-मगासच्या माझ्या साऱ्या संकल्पना गळून पडल्या. दिसत होती फक्त एक खोल दरी, ज्याच्या पश्चिमेकडे मी सुख उपभोगतो आहे, माझ्या भावना व्यक्त करू शकतो, लिहू शकतो आणि दरीच्या पूर्वेकडे ३००० कि मी पलीकडे दुसरा भारतीय...
ही दरी नष्ट व्हायला हवी, हा रोजचा संघर्ष कमी झाला पाहिजे. पण त्या निसर्गाचे पवित्र नष्ट न होऊ देता. त्या निसर्गपुत्राचे हास्य, त्याच्या विशुद्ध आनंदीपणा टिकवून!!
पण कसे? कोणी सांगेन मला/आपल्याला?