निसर्ग - एक महानायक

निसर्ग मला सतत साद घालत असतो, ध्यानी - मनी - स्वप्नी तोच मला दिसत असतो.

जळी - स्थळी - काष्ठी - पाषाणी सर्वत्र चराचरात व्यापून राहिलेला निसर्ग खुणावत असतो मला.

त्याने जणू काही वेडंच केल आहे मला, . . आणि का नाही करणार वेडं ?

कारण निसर्ग आहेच तसा किमयागार,

शेकडो जादू पोतडीत असणारा अवलीया जादूगार, ज्याला फक्त देणंच माहीती आहे.

काय काय दिपवून टाकणारे चमत्कार तो करत असतो, . . ते पाहून आपले मन अचंबित होत असतं !

एखादी नवलाइची गोष्ट निसर्गात घडली की - आपण म्हणतो नैसर्गिक चमत्कार आहे हा जणू,

रोजचा निसर्ग नवीन असतो, शीळेपणा त्याला मंजूरच नाही असे म्हणू.

आणि परिवर्तन हाच जगाचा नियम आहे, हेच तो त्यातून सांगत असतो.

नित्यनूतन चैतन्याने जगत राहा हेच तो त्यातून सुचवत असतो.

अगणित रंगांची उधळण करावी ती त्यानेच, सुवासाने जगाला भारून टाकायचे कामही त्याचेच,

थकलेल्या, शिणलेल्या, चिंतेने ग्रासलेल्या तणावाखालील मनाला,

त्याची ताजी टवटवीत हिरवाई प्रसन्न करून उभारी देते ती वेगळीच !

त्याच्या गूढ निळाईत मनाची बासरी वाजू लागते नक्कीच !

सकाळी केशराचा सडा टाकून नव्या दिवसाचे स्वागत तो करतो, .. तर दिवसभर काम करण्याची उर्जा तोच पुरवत असतो.

अन रात्रीच्या वेळेस दमलेल्या - भागलेल्या जीवांवर, .. चांदण्यांची दुलई पांघरून तोच जोजवत असतो.

पण आताशा काय झालय की --

निसर्गाचं लाडकं लेकरू असणारा माणूसच निसर्गाशी राहू लागला आहे फटकून,

आणि वागू लागला आहे, आपल्याच जन्मदत्या आईवडिलांना व्रुद्धाश्रमात पाठविणार्या कृतघ्नांसारखा !

ध्रुतराष्ट्राप्रमाणे स्वार्थलोलुपतेची पट्टीच माणसाने डोळ्यांवर घेतलीय बांधून !

त्याला हेही कळत नाहीये की, निसर्ग जगला तरच आपण जगू शकू म्हणून !

'जगा आणि जगू द्या' हा मंत्रच तो विसरला आहे, .. जगण्यातली सगळी गंमतच तो हरवून बसला आहे.

सगळ्या निसर्गाला वेठीस धरून निसर्गाचं शोषण करणारा माणूस खरोखरंच एवढा उपद्रवी झालाय का ?

त्याला हेही कळत नाहीये का ? की निसर्गाचा विनाश म्हणजेच आपला विनाश आहे बरं का !

का स्वतःच्याच पायावर कुर्हाड मारून घेतो आहे माणूस? का स्वतःच्याच अस्तित्वाला चूड लावून घेतो आहे माणूस ?

कुठे गेली ती हिरवीगार वनराजी अन समुद्राचे निळेशार पाणी ? कुठे गेले ते बागडणारे लहान - मोठे प्राणी ?

कुठे हरवली पक्ष्यांची ती मंजुळ मंजुळ गाणी ?

केले डोंगर उघडे - बोडके अन जलाशय प्रदूषित । अतिलोभाने माणसाचे मनही झालं आहे कलुषित ।

ऋतुंनी आपले स्वाभाव बदलले, रोगराईला आमंत्रण मिळे । आता माणसा भोग आपुल्या विपर्रीत करणीची फळे ।

उफराट्या आपुल्या रीतीने जीवस्रुष्टिला केले जर्जर । त्यामुळे दुःखात आपुल्या माणसाने अजुनच जणू घातली भर ।

निसर्गाकडे पाठ फिरविता संकटे येती अतोनात । 'चला परत निसर्गाकडे' गाणे आनंदाचे गात ।

बापुड्वाणा झाला माणूस, करावे तरी आता काय ? 'साधी निसर्ग जीवनशैली' हाच त्यावर उपाय ।

हे निसर्गा, माणूस जरी उतला - मातला असला तरी तू त्याला उदार मनाने क्षमा कर !

कारण 'कळतय पण वळत नाही' अशा स्थितीत माणूस उभा आहे, या धोक्याच्या वळणावर !

आणि हे सर्व पाहून संवेदनशील मनांचा नक्कीच उडतोय थरकाप,

कारण त्यांना माहीत आहे की, माणसाने कितीही केल्या जरी गमजा ,

तरी निसर्गच आहे सर्वांचा बाप, निसर्गापुढे काय चालणार कुणाची टाप ?

निसर्गाने डोळे वटारले तर माणसाची काय आहे बिशाद ?

तेव्हा माणसाने वेळीच आवरलेला बरा स्वतःचा उन्माद !

प्रुथ्वी तरी कुठे ठेवली आहे माणसाने राहण्यालायक ?

पण माणसाने हेही जाणलेले बरे की - निसर्गच आहे प्रुथ्वीचा पालनकर्ता परमेध्वर अन महानायक !!

परिस्थिती हाताबाहेर गेली असली तरिही कुठेतरी दिसतोय आशेचा किरण !

काही निसर्गवेडे निसर्ग संवर्धन करून, अंशतः का होईना, फेडण्याचा प्रयत्न करताहेत निसर्गाचे ऋण !

पण हे निसर्गा, आम्ही तुला वचन देतो की,

प्रयत्नांची पराकाष्ठा करून आम्ही तुला तुझे नुकसान भरून देउ !

सुजलाम - सुफलाम वसुंधरा पुढील पिढीच्या हाती नक्कीच देउ !

सुजलाम - सुफलाम वसुंधरा पुढील पिढीच्या हाती नक्कीच देउ!

निसर्ग देतो आहे हाळी, प्रतिसाद त्याला देउ या,

चला लवकर, ताबडतोब वात निसर्गाची धरू या करण्या पृथ्वीचे नंदनवन !

चला लवकर, ताबडतोब वात निसर्गाची धरू या करण्या पृथ्वीचे नंदनवन !