तंबूतला सिनेमा

 
    आमच्या लहानपणी चित्रपट हा भारदस्त शब्द क्वचितच वापरला जायचा.सिनेमा हाच शब्द प्रचारात होता आणि आमच्या गावातल्या लोकांनाही तोच समजायचा.अर्थात गावात सिनेमाथेटर नसल्याने गावातल्या लोकांची सगळी भिस्त असायची ती जत्रेत येणाऱ्या टुरिंग टॉकीजमध्ये वर्षातून एकदा पहायला मिळणाऱ्या सिनेमावर.कधीतरी चुकुन माकुन सातारा किंवा कराडसारख्याआमच्या गावाच्या मानाने शहरात जमा होणाऱ्या परगावी गेल्यावर त्या प्रवासाची सांगता बऱ्याच दिवसाचा सिनेमाचा उपास सोडूनहोणार हे जवळजवळ ठरलेलेच असे.
     गाव सोडण्याची संधी क्वचितच मिळत असल्यामुळे आम्हा भावंडांना सिनेमा पहाण्याची हौस जत्रेतच भागवावी लागे.पौष महिन्यात आमच्या गावची जत्रा भरायची.गावाबाहेर म्हणता येणार नाही पण गावातही म्हणता येणार नाही अशा एका शेताच्या जागी ही जत्रा भरते.पौष महिना असल्याने त्या शेतातील पिके काढून शेत मोकळे केलेले असायचे.त्यावेळी आमची शाळा संस्थानी अमलामुळे सकाळी आठ ते अकरा आणि दुपारी दोन ते पाच असे.एकादे दिवशी त्या भागात रहाणाऱ्या कुणातरी मित्राकडून तोंडून "अरे जत्रेची पाल यायला लागली" अशी बातमी लागायची आणि सकाळी शाळा सुटल्यावर आमचा मोहरा त्या शेताकडे वळायचा पौषाच्या सुरवातीस हवेत छान थंडी असे.शाळेत मधल्या सुट्टीत खाणे झालेले असे त्यामुळे घरी जाण्याची फारशी घाई नसे.गावाचा विस्तारच इतका कमी की शाळेतून त्या शेतावर जायला फारफारतर पंधरा मिनिटे लागायची आणि आम्ही आतुरतेने ती पहिलीवहिली पालं पहायला लागायचे.पालं म्हणजे छोटे तंबूच असायचे.पहिलीवहिली पालं तर कापडीच असायची.तुरळक पसरलेलीपाले पाहिल्यावर अंगावर आनंदाचे रोमांच उभे रहायचे.कारण जत्रा सुरू झाल्याची वर्दी ती देत असत. त्यानंतर मोठी म्हणजे मिठाईची ,तांब्यापितळेच्या भांड्यांची,फोटोची अशी दुकाने येत ती मात्र बहुधा पत्रे उभे करून तयार केलेली असत.संस्थानी कारभार असल्याने अगदी व्यवस्थित आखणी करून पाले टाकलेली असत.उभे आडवे रस्ते अगदी व्यवस्थित आखून मगच पाले उभारल्यामुळे
जत्रेत फिरायला नंतर मजा वाटायची तरीही लहानपणी आईबापांच्या बरोबर गेलेली पोरे चुकण्याचे प्रसंग घडायचेच पण एकादे पोर
पार सापडलेच नाही असे मात्र कधी घडले नाही.
   सगळ्यात शेवटी यायची ती म्हणजे टुरिंग टॉकीज आणि सर्कसचे तंबू.हे आमच्या त्या वेळच्या कल्पनेने अवाढव्य मोठे असायचे.
जत्रा चांगली भरली तर आठ दहा टुरिंग टॉकीज आणि दोन दोन सर्कशी येत पण असे प्रसंग कमीच.चार पाच टॉकीज आणि एक
सर्कस म्हणजे अगदी डोक्यावरून पाणी.पहिली टॉकी बहुतेक आमच्या गावच्याच कोंडाजींची अशोक टॉकी असे आणि त्यानंतर एका
मागून एक टॉकीज आल्याची बातमी कानावर पडून आमचे कान धन्य होत आणि लगेच संध्याकाळी आमच्या मित्रमंडळांची
पहाणीसमिती जत्रेस भेट देऊन त्या बातमीची सत्यता पडताळून पहायची.
  कितीही टॉकीज आल्या तरी आपल्याला एकादा दुसराच सिनेमा पहायला मिळणार हे मला चांगलेच माहीत होते.तरीही तो
अनुभव म्हणजे एक "उघडले स्वर्गाचे द्वार"या प्रकारचा असायचा.त्या अगोदर बॅंड बाजासह सकाळी नऊ आणि दुपारी चार
वाजल्यापासून पुढे निरनिराळ्या टॉकीजच्या सिनेमाच्या जाहिराती गावात फिरत.या जाहिराती एका तिकोनी गाड्यावर लावून
ढकलत ढकलत टॉकीजमधले कामगार गावभर फिरत.त्या गाड्याबरोबर कर्ण्यातून सिनेमाचे नाव ओरडून सांगणारे कामगारही
असत.
   प्रत्येक टॉकीजमध्ये दररोज दोन खेळ एक संध्याकाळी सहा वाजता आणि दुसरा रात्री नऊ वाजता असे आणि दोन्ही खेळ
वेगवेगळे असत.म्हणजे पाच टॉकीजमध्ये एकादिवशी दहा खेळ होत.कोणताही खेळ लागला तरी तो आपण
पहायलाच पाहिजे असे वाटे कारण तो पहायला मिळण्याची शक्यता बहुधा कमीच असे पण एकादा श्यामची आई वगैरे लागला
तर मात्र वडिलांना विचारण्याचे धाडस तरी मोठी बहीण करी आणि बरेचदा तिला यश मिळे.मग काय विचारता तो दिवस म्हणजे
"अजी सोनियाचा घनु--- "च असायचा.
  सिनेमाला जाण्याच्या कल्पनेने तो दिवस कसा निघून जायचा काही समजायचेच नाही.नऊचा सिनेमा असेल तर आठपासून
आमची घाई सुरू व्हायची.त्यावेळी तिकिट असायचे पाच आणे.आम्ही भावंडे आणि आई अशी सगळी मंडळी जेवणखाण आटोपून
निघेपर्यन्त उशीर हा व्हायचाच.मात्र सिनेमा तंबूत असल्यामुळे हाउसफुलचा धोका कधीच नसायचा,तंबू कमी पडला तर बाजूच्या
कनाती सोडवून तंबूची क्षमता कितीही वाढवता येण्याची सोय होती.असे कनाती वाढवावे लागणे ही त्या सिनेमाच्या लोकप्रियतेची
पावती असायची.वेळेवर पोचावे ही इच्छा तर असायची पण सगळ्यांची जेवणे विशेषत:आई येणार असेल तर तिचे जेवण सगळ्यात
शेवटी होत असल्याने आणि त्यानंतर घरातली जमीन सारवून काढावी लागत असल्याने अशा सगळ्या भानगडीतून हमखास
उशीर व्हायचा त्यामुळे आम्ही पोरे अगदी रडकुंडीला यायचो,बर स्वतंत्रपणे जायची कुवत आमच्यात नव्हती आणि वडील तसे सोडण्याची शक्यताही नव्हती.
  शेवटी आम्ही मार्गी लागायचो तेव्हां सिनेमा सुरू होण्याच्या अगोदर वाजणाऱ्या शहनाईची रेकॉर्ड लागल्याचे सूर कानावर
पडायचे आणि गेले सिनेमातले पाच मिनिट गेले असे वाटून अगदी बाजीचे पंचप्राण गेल्यावर महाराजांना व्हावे तितकेच दु:ख
आम्हाला व्हायचे.
  मात्र कधीकधी याउलटही प्रकार घडायचा म्हणजे जर सिनेमा सहाचा असेल तर जेवण हा प्रकार त्यानंतर असायचा आणि
त्यामुळे अगदी वेळेच्या अगोदरच आम्ही तंबूत शिरायचे.प्रवेश हा नेहमी पडद्याच्या पाठीमागून असायचा त्यामुळे तंबूत शिरल्यावर
पांढऱ्या पडद्याचे मागूनच दर्शन झाले की स्वर्गातच प्रवेश झाला असे वाटायचे.पडद्याच्या पुढे पडद्यापासून ते थेट मागील बाजूस  जेथे
प्रोजेक्टरया गाडीपर्यंत एक आडवा दोर पडद्याशी काटकोणात तंबूचे बरोबर दोन भाग करणारा असे त्यात दोन भागात स्त्री आणि पुरुष अशी विभागणी असे.(अशी विभागणी पुढे सोलापूरला गावातल्या प्रभात व आणखी काही सिनेमागृहात पहायला मिळाली.औरंगाबादला तर सुरवातीस मागील बाजूसही आडवा पडदाच असे आणि पडदानशीन स्त्रियांची त्यामागे व्यवस्था असे हा निजामी अमलाचा परिणाम.)संसदेत ३० टक्क्याना विरोध करणाऱ्या पब्लिकला तंबूतली ही ५० टक्क्याची विभागणी मात्र बिनतक्रार मान्य असे.तंबूतील विभागणीत आम्ही मुले दोन्ही बाजूपैकी आमची वडीलधारी मंडळी  असत त्या बाजूस म्हणजे बायकांच्याच बाजूस-(कारण वडील सिनेमास क्वचितच येत आणि आलेच तरी त्यांच्या मित्रमंडळीं बरोबर रहात)जात असू.जाताना बरोबर खाली अंथरण्यासाठी सतरंजी अगर घोंगडे नेलेले असे ते योग्य जागी पसरण्याची
जबाबदारी आमच्यावर असे.ते शक्यतेवढे मोठे पसरण्याची खबरदारी आम्ही घेत असू कारण कधी कधी आमच्यापैकी काही  जणाना झोप येण्याची शक्यता असे.बरोबर खाद्यवस्तूंचा भरपूर साठा नेणे आवश्यक असे कारण सहाच्या सिनेमाच्यानंतर जेवण असे.अर्थात या खाद्यपदार्थात जत्रेतच उपलब्ध असणाऱ्या चुरमुऱ्यांचा महत्वाचा भाग असायचा.त्यामुळे जत्रेच्या सुरवातीसच आमच्या घरात चुरमुऱ्याचे एकादे पोतेच विकत घेतले जायचे सहाच्या सिनेमाला गेलो तरी आईला सगळ्यात शेवटीच यावे लागे त्यामुळे तिच्या येण्याकडे आमच्या जागेवरून लक्ष ठेवावे लागे आणि ती आल्यावर वेगवेगळ्या पद्धतीने तिचे लक्ष वेधावे लागे.अशा उशीरा येणाऱ्या आया आणि त्याच्या मुलांच्या हाकाऱ्याने सिनेमा सुरू झाल्यावरचा काही काळ दणाणून जात असे.
       अर्थात असे क्वचितच घडे कारण सहाचा सिनेमा सहाला किंवा नऊचा सिनेमा नऊला सुरू करण्याचे बंधन कोंडाजीभाईना मान्य नसे.आम्ही स्थानापन्न झाल्यावर बऱ्याचदा चालू सिनेमातली गाणी कर्कश्शपणे लागत.ती ऐकून अगदी पाठ झाली तरी सिनेमा सुरू होण्याचे नाव नसे.तंबूत सगळ्यात मागे काही लाकडी आणि लोखंडी खुर्च्या टाकलेल्या असत त्यावर बसणारी गावातील प्रतिष्ठित मंडळी म्हणजे पोलिस इन्स्पेक्टर.डॉकटर अशा प्रतिष्ठित आणि निमंत्रित मंडळींचे आगमन होण्याची वाट बघितली जाई,सिनेमा सुरू होण्याचे चिन्ह म्हणजे प्रोजेक्टरच्या गाडीवरील दोन दिव्यांपैकी एक दिवा घालवणे तसा तो गेला की चला आता सिनेमा सुरू होणार असे वाटून पुढील इच्छापूर्तीच्या आनंदाने काळीज धकधकू लागे.त्याचबरोबर उ.बिस्मिल्लाच्या शहनाईची एक तबकडी हमखास वाजू लागे.तेवढे झाले की आता खरोखरच स्वर्ग दोनच बोटे उरला असे वाटू लागे आणि दुसरा दिवाही बंद झाला आणि "शान्त रहा"ची पाटी पडद्यावर दिसू लागली मग मात्र खरेच स्वर्गभूमीत प्रवेश केला असे वाटू लागे.
  त्यावेळचे बहुतेक सिनेमे कृष्णधवलच असत.( जे.बी.एच.वाडियाचे भगभगीत रंगाचे काही त्याला अपवाद ) तरी त्यातही चालतीबोलती चित्रे समोर दिसू लागली की आम्हाला आनंदाचे अगदी भरते येई.पण हा आनंद फार काळ टिकत नसे कारण दहा पंधरा मिनिटे होतात न होतात तो कटकन फिल्म तुटे आणि एकदम विधवेच्या कपाळासारखा पांढराफटक पडदा समोर दिसू लागे.जत्रेत आणलेले सिनेमे बहुधा अनेक ठिकाणी घासून घासून फिल्म अगदी जीर्ण झालेली असे त्यामुळे दर दहा पंधरा मिनिटांनी ब्रेक घ्यावा लागे आणि त्यावेळी लोकांच्या मोठ्या आरड्याओरड्यास तोंड द्यावे लागे अर्थात तंबूच्या मालकाला आणि आम्हालाही याची संवय असे त्यामुळे सिनेमा हळू हळू पुढे सरकत असे.पण तसाही तो आम्ही आमच्या सहनशील स्वभावास अनुसरून आनंदाने पहात असू.कदाचित पुढे टी.व्ही.वरील मालिका वा सिनेमे पहाण्याची ती रंगीत तालीमच कोंडाजीभाई आमच्याकडून करून घेत होते.
  तंबूच्या सिनेमास तिकिट पाच आणे असले तरी तेवढेही पैसे नसत पण सिनेमा बघायची हौस तर दांडगी असे आमचे काही मित्र धाडसाने कनात वर करून आत घुसण्याचा प्रयत्न करत आणि कनातीजवळ सर्व बाजूना जरी टॉकीजमालकाचे कामगार पहारा देत आणि जो आत घुसताना सापडेल त्याला बेदम चोप देत असे असले तरी त्यातले काही शिवाजीमहाराजांच्या मावळ्यांच्या चपळाईने कनातीतून आत घुसत आणि अशा तऱ्हेने सिनेमाचा आस्वाद घेतल्याचे दुसऱ्या दिवशी संताजी धनाजीने मोगलांच्या तंबूचे कळस कापल्याची बातमी सांगावी त्या थाटात सांगत.मला ती चपळाई दाखवणे तर दूरच  पण सरळ सरळ समोरच्या प्रवेशद्वारातूनही कधीकधी प्रवेश करायला अडचण व्हायची.  
   एकदा माझा "गुळाचा गणपती" सिनेमा बघायची संधी अशीच हुकली.आमच्या नात्यातले एक गृहस्थ टूरिंग टॉकीजना सिनेमाची रिळे पुरवणाऱ्या कंपनीचे कर्मचारी होते आणि काही सिनेमांची रिळे ते घेऊन येत आणि त्यानी आणलेल्या रिळांचा सिनेमा चालू असेल तर त्यांच्या परिचयाच्या काही लोकांना तो सिनेमा फुकटात पाहू देण्यास टुरिंगचे मालक तयारी दाखवायचे.अशा पद्धतीने एकदा आमच्या कुटुंबातील सभासदांना गुळाचा गणपती पहाण्याचा योग आला.पण माझे आणि माझ्या भावाचे "दैव देते आणि कर्म नेते"अशी परिस्थिती झाली,कारण आम्ही फार अभ्यासू असल्याने बाकीचे सभासद अगोदर गेले तरी आम्ही अभ्यास पुरा करूनच येऊ असे त्याना सांगून घरातच बसलो आणि खरोखरच अभ्यास पार पाडून भर भर दोघे तंबूकडे धाव घेतली.तसा गुळाचा गणपती सर्वत्र खूपच प्रसिद्ध पावला असल्याने गावातील सगळी गर्दी त्याच टॉकीवरच लोटली त्यामुळे प्रवेशासाठी उभ्या केलेल्या लाकडी आडव्या काठ्यावरून गर्दी ओसंडून वहात होती.टॉकीजच्या मालकास जरी आमच्या त्या नायेवाइकाने सांगून ठेवले असले तरी आमच्यासारख्या पोरांकडे थोडेच त्यचे लक्ष जाणार आणि घरातली मंडळी तर केव्हांच आत गुप्त झालेली.आम्ही केविलवाण्या नजरेने मालकाकडे पहात राहिलो पण त्यालाही तेवढ्या गर्दीत आमच्याकडे लक्ष देणे जमले नाही आणि बरीच वाट पाहून आम्ही राम लक्ष्मण सिनेमाच्या सीतेचा शोध न घेताच घरी परत जाण्याचा निर्णय घेतला आणि शेवटी गुळाचा गणपती
आमचा हुकलाच.नंतर मी तो दूरदर्शबवरच पाहिला.माझ्या भावाने तर तेव्हापासून सिनेमाचा एवढा धसका घेतला की त्यानंतर
त्याने आजतागायत सिनेमाचे नावच कधी काढले नाही.