रंगकाम आणि रंगकर्मी::(क्ष कंपनीचे)

रंगकाम....

झाले एवढं नाव उच्चारल आणि आमच्या घरातील प्रत्येकाला उग्र वास, कपड्यांचा पसारा, खोलीतली आवरा-आवरी, भिंतींचे सुक्ष्म तडे, धुळ, अनोळखी माणसांचा घरात वावर- --ह्यापैकी एक तरी संकटाची जाणिव झाली असावी म्हणुनच माझ्या ह्या प्रपोसल चा तातडीने "करू की... दिवाळीला करू... " असा डायरेक्ट ६ महिने स्थगितीचा शिक्का मारून निकाल लावण्यात आला.

पण माझ्या डोक्यातून रंगकाम काही जात नव्हते,  खरे तर तातडीने रंग लावलाच पाहिजे असेही काही नव्हते, परंतु मध्ये एकदा जराशी ओल आली होती ती काढून घेतली पण नंतर रंग लावला नव्हता... त्यातून आत्त्ता आहे तो रंग लावून किमान १० वर्ष झाली त्यामुळे ठिकठिकाणी सुक्ष्म तडे, आणि पोपडे दिसायला लागते होते... आणि सर्वात मुख्य म्हणजे दर दिवसा-आड सकाळी सकाळी पेपर वाचताना -"घर रंगवताय? - आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा ! "... ह्या टायटल खाली येणारी जाहीरात मला खुणावर होती... डिवचत होती... आणि सारखे सारखे पॉलिश्ड रुम ची स्वप्ने दाखवत होती..  !

घरच्यांच्या मनातले प्रश्न खरतंर मलाही पडले होते, कारण माझी'च खोली सर्वात विस्कटलेली/पसरलेली/अस्ताव्यस्त वगैरे वगैरे असते.. (असं आई म्हणते-पण मला तर हवी ती वस्तू जिथे टाकलेली असते तिथे व्यवस्थित सापडते  ) आणि ती रंगवायला काढायची म्हणजे सामान हलवा हलवी आली... स्थावर सामान होते ते झाकावे लागणार, आणि बाकीचे सगळे ईकडच्या खोलीतून तिकडच्या खोलीत बदलावे (पसरावे) लागणार, दिवाणावरच्या गाद्या उश्या पण उचलाव्या लागणार, २ महिन्यापुर्वीच नवीन घातलेले कार्पेट पण उचलावे लागणार....  अरे देवा....!! पेस्ट कंट्रोल प्रमाणे रंगकामाची पण का ट्रिक निघत नाही अशी? सामान न हलवता वगैरे..  !

पण मागच्या शनिवारी मात्र पुन्हा ती जाहीरात पाहिली आणि तडक फोन फिरवला... कोटेशन, शेड सिलेक्शन वगैरे सगळे ठरवून तरी निदान हा शनिवार/रविवार तरी 'सत्कार्णी' लावायचा असा विचार केला..

एका गोड आवाजाने माझा फोन उचलला आणि हवी असलेली सगळी माहीती देऊ केली, पण त्यातही मला एकदाही किंमत कळू शकली नाही कारण तो आवाज "ऍक्चुअली खर्चाचा नक्की अंदाज आमचे फिल्ड एक्स्पर्टस'च देऊ शकतील" असे कळकळीने कळवत होता... मग मी रितसर पत्ता नोंदवला, आणि '२४ तासात व्हिजिट' ची हमी घेउन निवांतपणे पुढचा पेपर वाचायला लागलो...

झालं तो दिवस गेला, रविवार सकाळी ११ वाजता माझ्या मोबाईल वर एक फोन आला, मि. क्ष कंपनीकडून बोलतोय आपले रंगाचे काम आहे ना? मी आत्ता येऊ का प्री-बुकिंग व्हिजिट साठी ? -- या या... मी घरीच आहे!!

दार उघडलं-त्या क्ष कंपनीचा शर्ट घातलेला तरुण व्यावसायिक हसऱ्या चेहऱ्याने घरात आला...  त्याने खोली पाहिली आणि मग मला माहीती द्यायला सुरुवात केली - सर, पेंटिंगसाठी आपल्याला टोटल ५ दिवस लागतात, सर्वात आधी आमचे एक्स्पर्टस येऊन आपल्या खोलीतील पंखा/टुब/कपाट हे झाकून घेतील कारण रंग उडून नये, मग हा जुना रंग घासून घेउन क्ष कंपनीची स्पेशल पुट्टी लावली जाईल मग लांबी/प्रायमर आणि त्यानंतर पेंट चे २ कोट दिले जातिल, ५व्या दिवशी खोली आपल्या ताब्यात... सध्या नवीन रंगाचा आपल्याच कंपनीचा टेफ्लॉन पॅटर्न आहे एक, त्यावर महिनाभर काही जास्तिचे चार्ज नाहीयेत त्यामुळे तो बूक करावात... त्याची लाईफ सुद्धा १०+ वर्ष आहे...

(माझ्या मनात प्रत्येक वेळी त्याने क्ष कंपनीचे स्पेशल असे उच्चारताना किमतीचा आकडा वाढत होता  )- बरं खर्च किती येईल अंदाजे?

त्यासाठी पेंटेबल एरिया काढावा लागेल आमचा एक्स्पर्ट येईल आणि तो मेजरमेंटस(मोजमाप) करून आपल्याला क्ष कंपनीचे कोटेशन शीट पण भरून देईल लगेच, एकदा एरिया कळला की किंमत काढणे सोपे जाते आणि मग कमी-जास्त होण्याची शक्यता राहत नाही ना.. म्हणजे क्लाइंट पण खुष आणि आम्ही पण...   ( त्याचे १०० रुपये होतील, क्ष कंपनीची पावती मिळेल तुम्हाला... )

(अरे वा... सगळेच बरे एक्स्पर्टस तुमच्याकडे? बाकीचे काय अकुशल-निमकुशल कामगारांवर कंपन्या चालवतात की काय? )

-- बरं मग आत्ताच येऊन जाईल का तो माणुस? कारण मला ह्या आठवड्यातच नक्की करायचे आहे, एकदा खर्च समजला की पुढिल १ तारखेला किंवा १० तारखेला काम चालू करू.. लगेच.

-- हो हो.. बोलावतो मी त्याला लगेच, किंवा मला तासभर द्या मीच घेऊन येतो त्याला... पण सर तुम्ही पुढिल महिन्यात बुक केलेत तर ही ऑफर मिळणार नाही ना... ही फक्त ह्याच महीन्यात आहे... तर बुकिंग आपण आधी केलत तर आपल्याला पण फायदा होईल..

(अरे हो... पण आधी किंमत तर कळू दे..? ) - ठिक आहे मी महिना अखेरीच्या आधीच निर्णय घेतो.. पण त्या माणसाला... (सॉरी एक्स्पर्ट ला) जरा लवकर बोलवा...

--मग थोड्यावेळाने तो एक्स्पर्ट आला, फक्त कपडे आणि केसरचना वेगळी जरा बरी होती... बाकीचे सगळे आमच्या जुन्या पेंटरप्रमाणेच होते.... त्याने सगळ्या खोलीची वेगवेगळ्या पद्धतीने मापे घेतली, स्थावर लाकडी फर्निचर चे (टॉप) समतल बाजू मोजल्या, काहितरी गणीती प्रमाण लावले आणि शेवटी त्या क्ष कंपनीचे मेजरमेंट शीट काढून त्यावर वॉल एरिया, सिलिंग, आणि विथ वूडन र्निचर असे ३ आकडे लिहून तो कागद पहिल्या माणसाकडे (सुपरवाईजर) दिला...

झालं, मेजरमेंटस पण आले आता खर्च कीती येईल...? -एवढ्यात आमचे संभाषण तोडून तो पेंटर म्हणाला,

साहेब ही पावती....  १०० रु द्यायचेत... म्हणजे मी निघतो, मला अजून २ ठिकाणी जायचे आहे... (हा उद्धटपणा देखील आमच्या जुन्याच पेंटरसारखा -) हे घे...!

हं आता बोला, किती खर्च होईल? --

साधारण १० हजारापर्यंत जाईल...! --

अहो साधारण? आता १०० रुपये देऊन आपण मापे घेतली ना? आता तरी पक्क सांगा?

हो साहेब, मी साधारण म्हणालो कारण समजा तुम्हाला वाटले एखादी भिंत टेक्शचर्ड करून घ्यावी तर त्याचा खर्च वेगळा येतो ना.. म्हणजे करालच अस नाही पण आजकाल लोकांन्ना बेडरुम मध्ये एक भिंत अशी सजवायला आवडते, तुम्हाला त्याचे पण डिझाईन्स दाखवू का?

अं. ऽ अत्ताच नको लागल्यास सांगतो मी... मग खर्च साधारण १० हजार ना? आणि ५ दिवसात काम पुर्ण?...

 साहेब,  गॅरेंटीच आहे तशी आपल्या क्ष कंपनीची! (ह्या 'आपल्या'मुळे मला एकदम क्ष कंपनीचा डायरेक्टर झाल्याची फीलींग  हा हा)

--बर मी कळवतो.. असे सांगीतल्यावर त्या ऑफर ची पुन्हा आठवण करून देत तो गेला, आणि मी एका हातात १०० रुपयाने कमी झालेले पाकिट आणि दुसर्या हातात माझ्या रुम ची मेजरमेंटस चा कागद घेऊन रंगकामची स्वप्ने रंगवायला लागलो...

(संध्याकाळी सर्व कुटुंबीयांसोबत बसून निर्णय घ्यावा असा विचार आहे... आता तो निर्णय ह्या आठवड्यात होईल मग पुढचे पुढे लिहितो.. )