असे घडवू मुलांना!

मुलं ही पालकांची-समाजाची व पर्यायाने राष्ट्राची संपत्ती!  त्यांना घडविणं ही आपली नैतिक जबाबदारी! पण, त्या आधी आपल्याला स्वतःला घडावं लागेल, नाही का? सद्य परिस्थितीत तरी याचा अंतर्मुख होऊन विचार होणं गरजेचं झालंय. कारण आडात असेल तरच पोहऱ्यात येईल. नाहीतरी मूल म्हणजे आपलं प्रतिबिंबच असतं ना? आपण जसं बोलू-वागू तसंच ते शिकतं.

त्यांना वळण लावण्याचा योग्य काळ म्हणजे बालपण. खरं सांगू का? हे वय म्हणजे एक कोरी पाटी असतं. काळं भोऽऽर रान असतं. फक्त मशागत करून चांगलं बी पेरायची गरज असते. फक्त या बिया कधी व कशा पेरायच्या हे आपण पालकांनी ठरवायचं. कारण पेरू तेच उगवणार हा तर निसर्गाचाच नियम आहे.

त्यांना घडविण्याच्या ज्या ज्या सवयी, संस्कार व शिक्षण असतं, त्या साऱ्यांची सुरुवात आपण आपल्याच घरापासून सुरू करावी असं मला वाटतं. कारण घरांत जे चालतं-घडतं त्याचं निरीक्षण मूल करतं, व त्या निरीक्षणांतूनच ते सगळ्या गोष्टी आत्मसात किंवा अनुकरण करीत असतं. मुलं ही अनुकरणप्रिय असतात. म्हणून आपण स्वतःच लवकर उठणं, व्यायाम करणं, वेळेवर अभ्यास घेणं, खाण्याच्या सवयी, खेळ इत्यादी, जे जे आपल्याला त्यांच्याकडून हवंय त्याची कृती आपल्यापासून सुरू व्हायला हवी; तरच ते त्यांच्या मनावर विनासायास बिंबलं जातं. मुद्दाम काहीच शिकवावं लागत नाही.

आता सवयींबद्दल बोलायचं झालं  तर सुरुवातीला साध्या साध्या गोष्टी, जशा - पहाटेची प्रार्थना, मोठ्यांना नमस्कार, शुद्धलेखन, पाढे, एखाद्या सुभाषिताचं पाठांतर, योगासन, प्राणायाम यापैकी कोणताही एखादा- दुसराच नियम ठरवायचा व त्याचं पालन त्यांना करायला लावायचं, किमान वर्षभर तरी! फक्त एकच की, त्यात सातत्य हवं. तिथं एकाही दिवसाची सूट द्यायची नाही. कारण एकदा का सूट घ्यायची सवय लागली की यश 'सुटलंच' समजायचं. या बहरण्याच्या वयातच नियमांचा कानमंत्र आई-बाबांनी मुलांना द्यायला हवा, आणि एकदा का नियमितपणाची सवय लागली की पुढं फारसं अवघड जात नाही.

अभ्यासामध्ये पाढे व शुद्धलेखनाची सवय आवर्जून असावी. त्यामुळे भाषा व गणिताचा पाया पक्का होतो. याच बरोबर पाठांतराची सवय असणं गरजेचं आहे. पाठांतराच्या छोट्या छोट्या स्पर्धांमधून भाग घेतल्यास ही सवय आणखीनच वाढेल. हल्ली तसा मुलांना बराच वाव मिळतो. त्यामुळे मुलांची स्मरणशक्ती तर वाढतेच, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पर्धेत नंबर जरी आला नाही तरी 'नकार' पचविण्याची ताकद मुलांमध्ये रुजते कारण प्रत्येक वेळी पहिला नंबर येऊ शकत नाही. हे आजच्या स्पर्धेच्या युगात अत्यंत महत्त्वाचं आहे.

याचप्रमाणे व्यायामातसुद्धा जसे, सूर्यनमस्कार, पोहणे, सायकलिंग, फिरणे, मैदानी खेळ काहीही असो, त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे वाव द्यायला हवा. व्यायामाचं महत्त्व या वयात कळलं तर आयुष्यभर निरोगी जीवन जगू शकतात.

खाणं! मुलाचं खाणं-पिणं म्हणजे आजकाल आईच्या डोक्याचा ताप होऊन बसलाय. खरं तर स्वयंपाकघर म्हणजे धन्वंतरी! पूर्वी दहाजणांत मूल आपसूकच जेवून निघायचं, पण हल्ली फाजील स्वातंत्र्यामुळे मनस्ताप वाढलाय. तरी सुद्धा आहाराचं महत्त्व कृतीतूनच पटवावं लागेल. रोजचा सकस आहार, साधं जेवण - पोळी-भाजी, वरण-भात, कोशिंबीर वगैरेचीच सवय रोज असावी. पण आठवड्यातून एक-दोन दिवस मुलांच्या आवडींना वाव दिल्यास खूप फायदा होतो. जसे - चल, आज तुझ्या आवडीचं सांग, मी बनवेन. त्यांनी मुलंही खूश व आपणही...

आणखी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे "स्वावलंबन"! स्वावलंबनाची सवय लागेपर्यंत जरा अवघड वाटतं, पण त्याच्या सारखा आनंद कशात नसेल. स्वतःची कामं स्वतःच करण्यात काहीच कमीपणा नसतो हे आधी आपण स्वतः कृतीने त्यांच्या लक्षात आणून द्यावं. एकदा का याची सवय लागली म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ दे मुलांना ते जड जाणार नाही.

अर्थात या साऱ्यांसाठी आईनं जातीनं मुलांकडे लक्ष द्यायला हवं. वेळ काढायला हवा. गृहिणी असतील त्यांना हे सारं जमेल पण ज्या नोकरी करतात अशांची ओढाताण होते. अशावेळी मुलांच्या बाबांनी मदत करायला हवी. तरीसुद्धा आईनं काही काळापुरतं का होईना आपल्या करियरमध्ये थोडीशी तडजोड करून मुलांमध्ये समरस व्हायला हवं. कारण हे वय विकासाचं, सवयींचं व फुलायचं असतं. नाहीतरी मुलांना घडविणं हे आपलं सर्वात मोठ्ठं करियर नाही का? आपल्याला सजीव पुतळे घडवायचेत. घरात कुणी नसल्याने मुलांना देखील एकटेपणाची जाणीव व्हायला लागते. बऱ्याचदा नको त्या सवयी लागण्याचीही शक्यता असते; परिणामी नैराश्य येऊ शकतं. आपल्या असण्यानं या गोष्टी टळू शकतात.

मुलं आणखी मोठी झाली, बाहेरच्या जगात वावरायला लागली म्हणजे आणखीनच जबाबदारी वाढते. त्यांची मित्रमंडळी, त्यांच्या सवयी, त्यांचं खाणं-फिरणं, ह्यावर तर अगदी बारकाईनं लक्ष ठेवावं लागतं. या वयात मित्रत्वाची भावना ठेवून त्यांना विश्वासात घेतल्यास त्यांच्याशी संवाद साधणं सोपं जातं. आणि चुकून एखादी समस्या उद्भवलीच तर सोडवणं फारसं कठीण जात नाही.

वय वाढेल तसं त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायला हवी. योग्य ते स्वातंत्र्य द्यायलाच हवं, कारण त्यांना काळाच्या ओघाबरोबर वाहायचं असतं; पण फाजील स्वातंत्र्य किंवा बंधनं नकोत. पॉकेटमनी गरजेपुरती ठीक आहे पण चैनीसाठी नको. कारण चैनीचं रुपांतर व्यसनांत कधी होईल हे समजत नसतं. हे वय चंचल असतं. व्यसन हे विनासायास जडतं तर चांगल्या सवयी या आवर्जून लावून घ्याव्या लागतात.

याचवेळी व्यवहारज्ञानासाठी त्यांना बाजारहाट, खरेदी-विक्री सारख्या गोष्टी करू द्याव्यात. म्हणजे सद्य-परिस्थितीची जाणीव त्यांना होते.

सुट्ट्या मिळाल्या की हल्ली टूरवर जाण्याचे बेत आखले जातात. तशा टूरमध्ये एखादी सहल बाबा आमटेंसारख्यांच्या प्रकल्पाला गेली तर विपरीत परिस्थितीत सुद्धा दीन-दलितांची सेवा कशी करावी हे दाखवून देता येईल. नाहीतरी दुःख जाणण्याच्या प्रकियेतुनच माणूस घडत जातो. अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी त्यांच्या जडण-घडणीत खूप मोलाच्या ठरतात.

एव्हाना मुलांना बराच आकार आलेला असतो. मग मात्र त्यांना भरारीसाठी आकाशात सोडून द्यायचं. त्यांच्या पंखात बळ येण्यासाठी! जसजसे ते उंच भरारी घेतील तसतसे त्यांच्या पंखात बळ येईल. उंच भरारी ही त्यांनी घ्यायलाच हवी त्याशिवाय त्यांना गगनाचा रंग कसा कळणार? परिस्थितीशी झुंज देताना अनुभवातून आलेल्या शहाणपणातूनच खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्त्वाला पूर्णत्व येईल.

खरं तर हा विषय नुसत्या चर्चेचा नसून कृतीचा आहे. असा प्रयत्न सर्वच पालकांकडून झाला तर मुलं संस्कारक्षम बनून त्यांचं वैयक्तिक आयुष्य तर सुधारेलच, त्याचबरोबर चांगल्या समाजाची घडण होईल व पर्यायाने राष्ट्रउभारणीसही हातभार लागेल.

चला तर मग, शेतकरी बनून या साऱ्या बीजाचं रोपण करू म्हणजे निश्चितच सुगीचे दिवस येतील व त्याचा आनंद पालक व पाल्यांना आयुष्यभर उपभोगायला मिळेल.

कोण जाणे, ह्यातलाच एखादा, देशाचा प्रथम नागरिकदेखील बनू शकेल, खरं ना?

===========

---- सौ. माधुरी शहा, सोलापूर.

===========

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त (८ मार्च २०१०) भगिनी समाज, सोलापूर यांनी आयोजीत केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत बक्षिसपात्र. हाच लेख दुवा १ या ठिकाणी सुद्धा उपलब्ध आहे.