शर्यत

अमरचे डोळे ' रिसर्च टुडे 'मासिकामधल्या एका  बातमीवर खिळले होते-

जुलै २००७
उंदरांना जवळ जवळ ३५ कॉन्सन्ट्रेटेड बाटल्या खास
द्राक्षासव पाजले  की   त्यांचे आयुष्य वाढते असे  असे पाहणीत आढळले
आहे.

उंदरांची पाहणी केली असता त्या खास द्राक्षासवातील काही घटक
विशेषतः 'लाइफसेवर ' हे आयुष्यमान वाढवण्यात सक्रिय असतात असे सुद्धा एका
अभ्यासात आढळले आहे.


या ओळी वाचूनच अमर थबकला.  त्याच्यापेक्षा अधिक वेगाने कोणीतरी हाच धागा पकडून संशोधन करत होते
तर... पर्वताच्या शिखरावर जाण्याकरता सुरुवात करावी, शिखर दृष्टिक्षेपात
आहे
असे वाटू लागतानाच अभिमानाने उंचावलेल्या मस्तकाला दगडाचा फटका
बसावा, डोळ्यासमोर अंधारी यावी अशी त्याची स्थिती झाली होती. पराभवाच्या

जाणीवेने त्याच्या मणक्यातून झिणझिण्यांची एक लहर उठली. गेली सात- आठ वर्षे
त्याने या संशोधनाकरता पणाला लावली होती.   सगळे कसे चुकले? कशी दिरंगाई
झाली? आपल्या संशोधनाचे काय होईल? असे अनेक प्रश्न त्याचा मनात उभे होते. काही कागद वरखाली केल्यावर त्याला नेमक्या नोंदी मिळाल्या.
त्याने  त्या बातमीमधले सर्व पुरावे, नावे, संबंधित संस्था यांच्या
नोंदी केल्या आणि त्याच्याविषयी माहिती शोधून काढण्याकरता पुढील हालचाली सुरू
केल्या.

------------------------------------------------------------------------------------------------------

अमर बराच वेळ फोनवर बोलत होता. टेबलावर नोंदीची वही उघडलेली होती. खिडकी उघडी असल्याने वारा आत येत होता. त्यामुळे वहीची पाने उडत होती, शेजारी प्रिंटस चा गठ्ठा होता.  त्यातलीही काही पाने फडफडत होती. खरं नोंदी पुन्हा बघण्याची गरजच नव्हती.    सगळे काही त्याला जसेच्या तसे आठवत
होते. एकेक पाकळी गोळा करत जावे,
सुगंधाची कुपी भरून घ्यावी आणि अचानक वार्‍याच्या झोताने गंध चोहीकडे जावा
तशा  आठवणी जाग्या होत होत्या, विखुरल्या होत्या, शेवटी बायकोच्या
, उमाच्या चेहर्‍यापाशी त्या थांबल्या आणि अमरने थकून गठठ्यावरच डो़के
ठेवले. पण उडणार्‍या कागदाबरोबर भूतकाळाची पाने फडफडतच होती.
--------------------------------------------------------------------------------------------------------

२६
मार्च २००२

मी नेहमीप्रमाणे एक रेड वाइनची बाटली उघडली आणि माझा ग्लास
भरला.
विक्रम माझ्याकडे बघत होता. त्याच्या चेहर्‍यावरचे भाव "मी आधी
पिणार, मलाच दे तुझ्याआधी" हेच सांगत होते. लाडक्या विक्रमला वाइन दिली.
हेच ते खास द्राक्षासव.

प्रयोगशाळेतील अनेक उंदरांमधून मी विक्रमला निवडल होत.  त्याला 'विक्रम' हे नाव सुद्धा मीच दिलं होत. तो आधी काय घडत आहे याचा अंदाज घ्यायचा, जरा मागे मागे राहायचा. स्वतःवर संयम ठेवायचा.  हे सर्व मला आवडल होत.   शिवाय  एकदा का अंदाज आला की
 मग  मात्र  तो झपाट्याने पुढे यायचा आणि वेगाने कोणत्याही गोष्टीचा फडशा
पाडायचा. मला अगदी असाच उंदीर प्रयोगाकरता हवा होता. असा इतर कोणताही उंदीर मला आढळला नव्हता. त्यामुळे विक्रमची निवड करण फारच सोप होत.

३० एप्रिल २००३

साधारण
दहा बाटल्या म्हणजे अतिशय स्ट्राँग असे दहा शॉट्स पिऊन झाले की विक्रम
खुलतो. आरडाओरडा करू लागतो. १६ बाटल्यांनंतर वर खाली असे किमान दहा हजार
जिन्याच्या पायर्‍या उतरतो. त्याची ही ताकद त्याच्या सुरुवातीच्या
क्षमतेपेक्षा किमान तिप्पट आहे. मी मात्र नक्की  दहा कोलांट्या उड्या
मारू शकतो. अगदी पैजेवर सांगतो तुम्हाला..

मी आज फार खूष आहे . हुरळून जाण्यासारखं यात काही नसलं तरी आपली
गृहीतक बरोबर आहेत मग का सेलेब्रेट करायच नाही?   आनंद व्यक्त करायला काहीच हरकत नव्हती असे त्याचं
प्रामाणिक मत होत.
उंदरावर करत असणारा प्रयोग नक्की यशस्वी होईल. सगळ्या शक्यता, सगळी गृहीतक, आणि केलेला प्रयोग   याच्या
आजवरच्या नोंदी तरी यालाच पुष्टी देणार्‍या होत्या. माझ्याकडे   'नॅशनल
इन्स्टिटयूट ऑफ हेल्थ' कडून भक्कम ग्रॅण्ट होती.  तसेच पैसा आहे  म्हणूनच  या शर्यतीत अनेकजण होते.  नॉर्थ कॅरोलॅनातील त्याच्या
'चॅपेल हिल युनिव्हर्सिटीबरोबरचं' इतर ठिकाणीही यावर संशोधन सुरू आहे. 
'ओकरिज नॅशनल लॅब'या  टेनेसीतील प्रयोगशाळेत उंदरांचे डिएनए आणि माणसांचे
डिएनए यात  जास्तीत जास्त जवळचा संबंध असेल अशा उंदरांची पैदास करून तेच
प्रयोगासाठी वापरत आहेत.  कुणाला  आयुष्यमान, प्रजनन याचा अभ्यास करायच आहे  तर कुणाला  ऍलर्जीचा तर कुणी   मानसशास्त्र, रोगप्रतिबंधक शक्ती, एखाद्या
रोगाचा प्रसार कसा रोखायचा यावर .  त्यामुळे उपलब्ध असणारा पैसा, मदतनिधी याकरता स्पर्धा  असणार यात शंकाच नव्हती.   अमेरिकेतल्या इतर काही युनिव्हर्सिटी शिवाय अमेरिकेबाहेरही विशेषतः
ऑस्ट्रेलियातील 'पर्थ' आणि इस्त्रायलमधील 'तेल अविव' युनिव्हर्सिटीत अशाचप्रकारचे
संशोधन सुरू आहे त्यामुळे माझे ध्येय अधिकच अवघड होते आहे.

योग्य तापमान असलेल्या चेंबर मधे  टेस्टटयूब मधील
वेगवेगळी द्रव्ये  बघायला हवी.  अतिशय बारकाईने, काळजीपूर्वक
काम करायचे आहे मला. .. पण हे कुठले विचार अचानक मध्ये येतात?

जानेवारी २००४
भगवान
विष्णूने अवतार घेतले? म्हणजे नक्की काय? सगळे खोटे? निव्वळ फिक्शन?
गांधारीने शंभर मुलांना जन्म दिला.. ती मुले म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी नाहीतर
काय? आपल्याकडे विमाने, शस्त्रे अस्त्रे सगळे होते असे वर्णन आहे. सगळा
कल्पनाविलास असेल? पण मग तेच भूभाग आता नकाश्यावर आहेत, तसे तंत्रज्ञान आता
अस्तित्वात आलेले आहे.   असे काही पुरावे आहेत त्याचे काय? माणूस दीर्घायुषी होऊ शकतो, कदाचित तो मरणारच नाही  असेही होईल?
माणसाच्या शरीरावर हत्तीचे डो़के बसवता येते? दोन प्राण्याच्या संकरातून
नृसिंह होऊ शकतो? खरंच झालं असेल का अस?


डोळ्यासमोर आताही उमाच फुललेला चेहरा आला. तिचा उत्साह
तिचा आनंद... पण का सगळं संपलं अस? आता उरला आहे त  तिचा रडवेला चेहरा,
 आपल्या वाट्याला येते ती  तिची चिडचिड.

आपण शरीराने प्रयोगशाळेत येतो,
एखाद्या मशीनसारखं काम करतो, पण
त्यात ती चमक नाही, तो पूर्वीसारखा जोष नाही. 


जानेवारी २००५
आपल्याला बाळ
होणार या कल्पनेने उमा केवढी खूष झाली होती. अमरच्या
चेहर्‍यावरही आनंद दिसत होता. उमाच्या डॉक्टरांनी जास्त दगदग करून नका असा
सल्ला तिला  दिला
होता. उमा सर्व ती काळजी घेत होती.   एकदा का  बारा आठवडे पूर्ण झाले  की

मित्रमैत्रिणींना सांगायचं अस तिनं ठरवलं होत.    

फेब्रुवारी २००६
आज विक्रमपेक्षा
मला चढली  होती. त्याच्या  आधीच. मी त्याला म्हणालो   , 'विक्रम माझी बायको कशी वागते. तुला काय कळणार. बोलून काही उपयोग
नाही.
"

 पण  बोलणे
मात्र बराच वेळ सुरूच होते. पोटात जाणार्‍या एकेका ग्लासाबरोबर  संताप,
प्रेम,
अगतिकता अशा अनेक भावनाप्रवाहात तो  बुडत होता. त्याला उमाचे बोलणे आठवले .

"
तुला पैसा उकळायचा आहे फक्त कंपन्यांकडून. फुकट प्यायची सोय सुद्धा होईल
मग बघायलाच नको. "
"माझा रिसर्च शेवटी पैसा मिळवण्यासाठीच असतो. काय चुकले त्यात? "
"
काय
बरोबर आहे ते सांग, मुक्या प्राण्यांच्या जिवाशी खेळ आणि हातात काही तरी
येते का? तुझे.. तुझे हे असले प्रयोग आणि त्याची शिक्षा भोगते आहे
मी! "

" काय तुझा वेडेपणा. ही अंधश्रद्धा आहे. मूल व्हायचं तेव्हा होईल.  
शक्य
आहे ते सर्व करतो आहोत आपण.    आमच्या क्षेत्रातला सगळा रिसर्च असाच
असतो. किती पैसा, वेळ आणि प्राणी यांचा हिशोब नसतो.  ज्या शोधाने 
मनुष्यजातीचे कल्याण होते तोच शेवटी सर्वाच्या लक्षात असतो.   तुला हे सर्व
माहिती आहेच, शिवाय अनेकदा
सांगितलंय.   "

उमाने मान वळवली. ती खिडकीबाहेर बघू लागली.

" उमा
प्लीज, का पुन्हा सुरुवात करतेस या विषयाला? अग फुटपाथवर झोपणारे,
अर्धपोटी राहणारे अनेकजण विस्मृतीत जातात . लक्षात राहतो जो यशस्वी होतो
तोच.  या प्रयोगांच सुद्धा असच आहे.  
''अरे वा'" तिच्या नजरेत
उपहास होता.
"तू हे सगळे थांबवणार आहेस की नाही तेवढे सांग. मी कधीची सांगते आहे
भारतात परत चल, तुला कुठेतरी नोकरी मिळेल. दोघे राहू. पण तुला ऐकायचे
नाही.
प्रसिद्धीचा हव्यास आहे. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली चालणारा इथला
स्वैराचार तुला हवा आहे. "

"गेली दहा बारा वर्षे इथे अमेरिकेत राहून जे श्रम केले, ही लॅब,
संशोधन, पैसा, नाव सगळे सोडून देऊ म्हणतेस? "
" नाव? पैसा? हॅ..
शेवट
काय तर  प्रयोग यशस्वी झाला नाही तर आपण आपलाही लिलाव करायचा! "
"

उमा, तू उगीच विषय वाढवते आहेस’"
"सगळी चूक माझीच आहे तर? तू फक्त तुझा फायदा तुझी गरज भागते तेवढे
बघणार.. "
"मीच बघणार. तशी आजकाल तू
माझी कोणती  गरज पूर्ण करतेस मनापासून? बायको म्हणून? 'नाही? "

"सोड
मला, शी! दिवसा
-रात्री जेव्हा मनाला येईल तसं वागायचं. "
त्याला ढकलून, दार आपटून ती निघून गेली.
दोन महिन्यापूर्वीच तिचे
अ‍ॅबोर्शन झाले होते. गेल्या दोन वर्षातले तिसरे... तेव्हापासून हे असच
सुरू
होत.  

---------------------------------------------------------------------------------------------------------
मार्च  २००६
 

अजूनही शक्य होईल का तसे करणे?
आईसारखी डॉली मेंढी तयार होऊ शकते तर स्त्रीला तिला हवे तसे  मूल का होणार नाही?  
आपल्याला उमासारखीच मुलगी मिळेल शिवाय शक्य झाले  उमाला आपल्यातले जे  नको
आहे ते  दुर्गूण तिला काढून टाकता येईल.. या  विचाराने त्याला हसू आले. 


लहानपणापासून ज्या प्रश्नांची उत्तरे नाहीत असेच प्रश्न का पडतात
आपल्याला? का आपला पिच्छा सोडत नाहीत.

आता भाज्याफळे, धान्ये यांचे
गुणधर्म बदलता येतात हे सिद्ध झालेच आहे. तसेच प्राण्यांचेही शक्य आहे का?   होईलही. पण हे
सिद्ध करायला किती जीवांचे मोल द्यावे लागेल, किती प्राण्यांना यातना सहन
कराव्या लागतील?



मी उमासारखा विचार करतो आहे का? नाही.. मानवजातीचे कल्याण असेल तर मग सगळे
नैतिक म्हणायचे हा नियम महत्त्वाचा.    हेच एक  लक्ष्य आणि हेच एक ध्येय माझ्याडोळ्यासमोर असले पाहिजे...

-----------------------------------------------------------------------------------------------------

१२ एप्रिल  २००६
फोन केवढा वेळ आणि किती मोठ्यांदा
वाजत होता. माझे डोळे उघडत नव्हते. डोके जड झाले होते.  अशा अवस्थेत मी शेवटी कसा बसा उठलो.
उमाचा फोन होता.  दुसरे कोण सकाळी सकाळी उठवणार होते?

तिला सांगितले , ''कुठे काय? इथेच होतो
रात्रभर.. संशयाचा उंदीर गेला आहे तुझ्या डोक्यात, त्याचा डोंगर झाला आहे
आता. "

मी फोन आदळला. पूर्वी लाडाने गुड मॉर्निंग करायची, गुणगुणायची, प्रेमगीत ऐकवायची
.. आता हिशोबाचे गुड मॉर्निंग करते ही बायको..



१८ ऑगस्ट २००६
ऍलन
म्हणतो तसे झाले म्हणजेच  जीन्स अल्टरेशन जर प्रत्यक्षात आले तर मोठाच
फायदा होणार .पण जर प्रयोग फसला तर.. नुसत्या त्या विचाराने माझ्या 
छातीचे ठोके वाढले होते.   कॉन्फरन्स मध्ये ऍलनचा पेपर होता.  त्याचे विचार सर्वांना पटले होते. माझ्या  नोंदी  आणि अभ्यासही आश्वासक होता.   
विमानतळावरून घरी परत येत  असतांना मी ऍलनशी  बोललो.


  गेली पाच सहा वर्ष नुसते झपाटल्यासारखे
प्रयोग आणि नोंदी सुरू आहेत.  पेपर, कॉन्फ़रन्स, ग्रॅण्ट करता दाखले चालूच
आहेत.  शिवाय त्याकरता  प्रवासही.. दिवस रात्र फक्त प्रयोग, गृहीतक आणि
नोंदी.   मध्येच आठवते उमा.. तिच बोलणं आणि मग ते विचार दूर सारायला मी  उचलतो  पेग आणि  आठवतो इतर मुलींचे चेहरे.. पण शेवटी उमा ती उमा
..  

विस्कॉनसिन युनिव्हर्सिटीत प्रयोग करणार्‍या अ‍ॅलनच्या प्रयोगात सहभागी व्हायचा निर्णय मी घेतला आहे.    तो प्रयोग यशस्वी होणार नाही असे अनेकांना वाटतय.  पण रिस्क घेणे हा माझा स्वभाव आहे, 
धोका पत्करण्यात एक आगळा आनंद आहे..   एक अस थ्रील की ज्याची सर
कशानेच येणार नाही
.

रात्रीच्या घडामोडी, प्रयोगाच्या नोंदी केल्या आहेत. हा जुईचा
चेहरा का समोर आला?...   जुई, अनिता, लारा... लिस्ट
आणि नंबरही  ओठावर.. सगळ्या मैत्रिणींशी बोलणे झाले .

पण बोलण्याव्यतिरिक्त काहीच केले नाही मी.  उमाचा विचार मनातून काढताच येत नाही.  त्याने फोन उचलला.  

"गप्प बस रे विक्रम''
मी विक्रमला गप्प बसायला सांगितले. आतल्या खोलीत जायला लावले त्याला आणि मुली आल्या की बिथरू नकोस असे सुद्धा धमकावले..
जेवढा वेळ मी फोनवर होतो तेवढा वेळ विक्रम खुडबूड करत
होता. फ्रान्समधून आणलेले चीज खाण्याकरता त्याची धडपड सुरू होती. मी
परदेशातून आणलेले चीज नेहमी असे लपून ठेवतो की ते त्याला दिसणारच नाही. पण
हार मानेल तर तो विक्रम कशाचा!    अखेर त्याने चीज शोधले होते.


मी त्याला थांब म्हणूनही तो थांबत नव्हता. ते चीज अधाश्यासारखे खाऊनच मग
विक्रम गडबडा लोळत असावा.. फुगलेले पोट कुठवर साथ देणार त्याचे आणि माझे
सुद्धा.... सगळीकडे तो पिचकार्‍या उडवतो.. त्याला लाज नाही . बरेच आहे... माझी
मात्र नाचक्की..




१५ मे २००७
दिवसेन दिवस विक्रम अधिक शहाणा आणि तगडा  दिसतो ..
दहाबारा बाटल्या होत नाहीत तोवर तो काहीसा गप्प गप्प असतो.  एखादी नासकी
उद्धट कॉमेंट करतो. मुद्दाम माझ्या मैत्रिणींवर...


मग त्याला विनोद
सुचतात. १५ बाटल्या झाल्या की मग सुटतोच. त्याचे विनोद, त्याचा व्यायाम
सगळे काही रंगात येते. आता अर्धी मॅराथॉन सुद्धा धावतो तो. न थांबता.
..

उंदराच्या नोंदी माकडापेक्षा जास्त आश्वासक आहेत. कदाचित दोन वेगळ्या जीन्सच्या एकत्रिकरणाने  तयार झालेले उंदीर कशा नोंदी देतात ते सुद्धा तपासेन. चांगल्या पेशींसारखंच चांगल्या जीन्समुळे तयार होणारे उंदीर प्रयोगात
वापरले तर? किंवा हे जीन्स बदलता येतात याचे प्रयोग विक्रमवरच केले तर?

क्रॉस ब्रिडिंगमुळे नक्की काय होईल? दोन प्राण्यांच अस संकरण किती नैतिक
आहे?

=-================================================================

२४ ऑगस्ट २००८

 आता विक्रमची
ताकद किती आहे माहिती आहे?  माझा पाय सहज उचलेल. कदाचित एखाद्या मांजरीला
झोपवेल पार.. माकडाला सुद्धा कोणास ठाऊक. तो प्रयोग केलाच पाहिजे. एका
उंदराने आपल्याला उचलू नये म्हणून प्रयोगात सहभागी असलेलं माझं माकड आटोकाट
प्रयत्न करत आहे. गंमतच आहे. तो ससा सुद्धा त्याला सामील झाला आहे. घाबरट
कुठला..


या प्रयोगाकरता मी आयुष्य पणाला लावेन.


१७ डिसेंबर
२००८

मी विक्रमकडे एक नजर टाकली. विक्रमने अजून ताणून दिलेली दिसते आहे.
. पार दुपारचा एक वाजला तो उठेस्तोवर.. कारणही आहे तसे म्हणा.. काल मी
आमच्या वाइनमध्ये वेगवेगळी पावडर टाकली होती.


मी मात्र कसाबसा दोन पायावर चालू शकतो. माझे चालणे  म्हणजेच  अगदी तारेवरची कसरत
असे झाले आहे म्हणा..


मी नेहमीप्रमाणे पिंजर्‍यातल्या इतर उंदरांना  वाढले.  त्यांना फक्त पाणीच प्यायला दिले.  ते लवकर झोपतील असे वातावरण तयार केले .    त्यानंतर विक्रमचा आणि माझा
दिवस पार पहाटेपर्यंत चालतो. माझा प्रयोग चांगला सुरू आहे. पण माझा प्रयोग यशस्वी होण्याआधी अ‍ॅलनची शक्यताच प्रत्यक्षात आली तर?

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

दहा जून २००९

मी विक्रमबरोबर प्रयोगशाळेतच राहणार आहे हे उमाला सांगायला हवे कधीतरी.  . मी तिला फोन करण्याआधी तिने मला फोन केला आणि वर म्हणाली की तिनेच  मला सोडण्याचा निर्णय घेतला आहे.  उमा वेगळी राहायला लागली
? कधी झाले हे सर्व? मी कुठे होतो?

विक्रमने 
शेपटीला एक झटका देऊन माझ्याकडे बघितले.     माझ्या
हातावर टाळी दिली आणि म्हणाला  आता आपण दोघेच... झाले ते बरेच झाले
यार.. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद होता.


"बरे झाले? अरे माझी बायको आहे ती. "

"दुसरी मिळेलऽऽ  "
विक्रमच्या
विनोदावर मी वरवर हसलो असलो तरी खोलवर दुखावलो गेलो. चूक माझीच. उमाला मी कधीच
सुखी करू शकलो नाही. तिचे माझे मार्ग नेहमीच वेगळे होते. बरं झालं तिची
सुटका झाली.  ती तरी आनंदात जगेल. माझं काय? मिळालेले स्वातंत्र्य
उपभोगायचं की जुन्या आठवात पुन्हा रमायचं?

विक्रमचा चांगलाच पराक्रम सुरू आहे. तो मॅराथॉन पूर्ण करेल. मी मात्र
जेमतेम हाताचा टेकू घेत चालेन..

केवढेतरी पेपरवर्क अजून बाकी आहे.
ग्रँट मिळाली तरी हिशोब तर द्यावाच लागतो ना.. पुरावे, याद्या, नोंदी, फोटो
सगळे दाखवायला लागते. त्याशिवाय कसे होईल?

-----------------------------------------------------------------------------------------------------------
३० जुलै २००९
पैसा हवा असेल तर मेहंनत करायला हवी.   माझ्यात आता
त्राणच नाही आणि डोके सुद्धा चालत नाही . विक्रम मात्र अक्कल
लढवून मला पैसा मिळवून देईल . मला एवढ्यातच कशी जास्त झाली?

तक्ते दिसतच नाहीत. दिसतात ते चेहरे. ब्रेंडा, जाई, शेजारची मोनिका...
विक्रम आता फार उत्साही दिसतो. मी सुद्धा आता चांगला झालो
आहे  असे विक्रम तरी म्हणतो म्हणजे.

मी चाळीसच आहे. विक्रम दोन
वर्षाचा. वाटतो मात्र अगदी आठ महिन्यांचा. अजब आहे नाही?  मला असे वाटले की मी विक्रमच
आहे. विक्रम आता आरामात दोन मांजरी उचलतो. मी पूर्वी ते करू शकायचो.


सध्या पैसा बरा मिळतो. अनेक पदार्थात 'लाइफसेवर' ’ सापडते का ते बघितले
आहे.


विक्रमचे जुने  साथीदार उंदीर आता मेले आहेत. ससा आणि माकडांवर
प्रयोग सुरूच आहे. विक्रमशिवाय जुन्यातला म्हणायला असा आणखी एकच उंदीर शिल्लक आहे. त्याने
विक्रमच्या ग्लासातली वाइन चोरून प्यायली असावी.  


१३ नोव्हेंबर २००९
आता नव्या उंदरांची भर घालून पिंजला भरला आहे. आमचे
प्रयोग सुरूच आहेत.   'लाइफसेवर'’ कशा कशात आहे याचा शोध लावणे आवश्यक आहे.
'त्यात फसवणूक होते कधी आणि पैसा वाया जातो याचे मला वाईट वाटते. जगात किती
शास्त्रज्ञ हे लाइफसेवर  शोधत आहेत माहिती नाही. रोज नव्या बातम्या येतात
कानावर. अजून नेमके खात्रीलायक पुरावे नाहीत. सगळे व्यावसायिकदृष्ट्या आणि 
कंपन्यांना किती फायद्याचे आहे हे  सिद्ध होत नाही तोवर प्रयोग चालू राहतील.



विक्रम इज कूल.. तरी कधी कधी चिडतो तो पण. फसवणार्‍या व्यक्तीला
मारायला धावला काल तो... कसाबसा आम्ही सर्वांनी त्याला आवरला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------

३०
ऑगस्ट २०१०

आज शेवटचा उंदीर मेला.. तो खर आजारी नव्हता . मग काय झाल? त्याचे डोक कुठे आहे?
"विक्रम हसतोस कशाला? "
"काय? "
"पण का? "
विक्रमने जे सांगितल्ले त्यावर माझा चटकन विश्वास बसेना.   विक्रमने रागाच्या भरात त्याचे डोके
फोडले आणि खाऊन टाकले. आजकाल फार तापट झाला आहे विक्रम.
तशा ३५ बाटल्या पिऊन आणखी काय करणार विक्रम?
मध्येच पैसा कमी पडतो. काय
करायचे, विक्रम जमेल त्या सर्व प्रयोगाकरता मला साथ  करतो. फक्त 'ड्रग टेस्ट' मात्र आम्हा
दोघांनाही घ्यायला लागू नये. काही औषधाच्या कंपन्या फार नाटक करतात.. त्यांचे सगळे नियम पाळणे कसे जमेल?   आमचे काय
होणार? विक्रमने युक्ती काढली आहे. आम्ही आता एखादा दारू न पिणारा उंदीर
शोधून त्याचेच सँपल पाठवतो.   शेवटी पैसा मिळणार हे महत्त्वाचे.

"तू फसवणूक करतोस"
विक्रम भडकला..
"तुला काय वाटत? तू तुला
पाहिजे तसा वागशील? आणि मी फक्त तुझ ऐकायच??
"म्हणजे? तुला मी खायला प्यायला देतो. मी तुझा मालक आहे. "
"तुझ्याकरता मी काय करत नाही ते बोल.
दारू पितो, म्हटलास तर धावतो"
"एवढ चिडण्यासारख काय झाल आहे? मी तुझ्या सगळ्या गरजा पूर्ण करतो आहे. "
"तू म्हणालास तर गाणी ऐकतो. तू म्हणालास तर
झोपतो. तू काय नेहमीच माझ्यावर सत्ता गाजवशील का? अरे जा... काय करायचं ते
कर. "
विक्रम ऐकेल असे वाटत नव्हत.

"ए उंदरड्या गप्प बस, साल्या, फार
माजलास. जे मनात येईल ते बोलशील का? "मी  चिडलो होतो.
त्याने
सुद्धा  माझ्यावर मनसोक्त आरडाओरडा, शिवीगाळ  केली. पहिल्यांदा आम्ही
असे एवढा वेळ आणि हमरीतुमरीवर येऊन  भांडलो.


१४ सप्टेंबर २०१०
विक्रमशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. माझा प्रयोग, माझे
पैसे सगळे काही त्याच्यावर अवलंबून आहे.. माझे जगच त्याच्यामुळे होते. हे
नेमके त्याने ताडले होते. त्याचाच तो उपयोग करून घेत होता. कसे झाले हे? विक्रमचे कान भरले की काय माकडाने?


विक्रम
कोणत्याच प्रयोगाकडे नीट लक्ष देत नव्हता. प्रयोगामुळेच मला पैसे मिळत
होते,   खाता पिता येत होते. सर्व प्रयोगाची मदार विक्रमवर होती. माझी निरीक्षणे, माझा सिद्धांत असा वार्‍यावर सोडून देणे शक्यच नव्हते.
विक्रम मात्र काही केल्या धावत नव्हता, कोणताही व्यायाम करत नव्हता. आता
त्याची ताकद कशी मोजायची? कसे सिद्ध करायचे की त्याची आयुष्य तर वाढले आहेच
पण ताकदही तेवढीच वाढली आहे? सगळे खोटे कागद भरायचे? छे नाही. असे मी कधीच करणार नाही.



त्याची विनवणी करण्यावाचून काय होते माझ्या हातात? पर्यायच नव्हता.
कोणापुढे हात पसरायचे याला काही मर्यादा असते की नाही? मी मतलबापुरता वाकतो
म्हणजे किती.? आणि कुणापुढे?. या उंदरापुढे?

पण वस्तुस्थिती दुसरीच
होती.   मला विक्रमशिवाय जगणे अशक्य आहे असे वाटायला लागले होते.

प्रेमातून एक अगतिकता येते. मी त्याच्यावर प्रेम करायला लागलो होतो
चक्क. शेवटी  त्याला एक गाणेच ऐकवत होतो..


१२ डिसेंबर २०१०

मी गातो ते पाहून तो चिडला नव्हता उलट त्याचा एकदाचा
त्याचा संताप निवळला आणि आमची मैत्री पूर्ववत झाली. मग जेव्हा जेव्हा तो
चिडायचा. ठरल्याप्रमाणे वागण्यास नकार द्यायचा मी मध्येच तेच गाणे
गुणगुणायचो-

ते गाणे खरं तर उमाच्या आवडीच होत. ती छान गुणगुणायची. सगळे कसे
टापटीप, नीटनेटके आणि शंभर टक्के प्रयत्न करून करायची.   मी हुशार होतो.   धाडसी होतो.   पण  होतो खुशालचेंडू,
कलंदर आणि तिच्या टिपीकल नवर्‍याच्या व्याखेत न  बसणारा.. असेनही.. ती आज
असती तर?



तिची आठवण आली म्हणून मी  स्वतःवरच चिडलो. मनात कडवटपणा उफाळून आला. तिरमिरीत
समोरच्या टेस्ट ट्यूब्सना एक फटका दिला तर स्टँडसकट त्या खाली पडल्या.   फुटल्या.   काचा
फुटण्यासाठीच असतात. काचा फुटतात ,  कधी बोचतात चुकून एवढच.

 प्राणी बोचकारतात, मरतात, प्रयोग
म्हटला की हे सर्व आलंच.



विक्रमने जो असहकार पुकारला होता त्यामुळे अमरच्या डोक्याचा पार भुगा
झाला होता. त्याने बुटाखाली असणार्‍या त्या काचा संतापाने रगडून विक्रमची विनवणी
करायला सुरुवात केली होती. अखेर विक्रमने प्रयोगाकरता सहकार्य करायचे
ठरवले. सहकार्य कशाचे? काय करणार ते तो ठरवणार आणि मी फक्त त्याची नोंद
करायची असा त्या करार झाला होता.

म्हणे माझे डोके जास्त वेगाने चालत नाही असे त्याला वाटू लागले होते.  
माझा नाईलाज होता.
--------------------------------------------------------------------------------------------------------------
५ नोव्हेंबर २०११
आणखी खूप नोंद करायच्या बाकी आहेत. डोके काम
करते आहे पण एक विलक्षण थकवा जाणवतो आहे. नोंदी केल्याच पाहिजेत. हे
माकडाचे तक्ते- ही त्यांची निरीक्षणे, हे सशाचे तक्ते - या त्यांच्या
नोंदी.

हा माझा आणि विक्रमचा ग्राफ असा वेगळा कसा दिसतो आहे? हा मांजराचा, माकडाचा आणि सशासा तक्ता सुद्धा निराळा आहे.
बाप रे! कुणीतरी घोळ घातलेला दिसतो. कशा झाल्या या नोंदी उलटसुलट?
''ये माकडा हसू नकोस. काय चालू आहे?''
हा विक्रमचा ग्राफ, हा इतर उंदराचा ग्राफ... हा माझा..

डोके जड झाले आहे.

अ‍ॅलनकडे सगळ्या नोंदी पाठवल्या आहेत. तो काय बोलतो
ते आजकाल कळत नाही चटकन.   असेच सुरू राहिले तर? कोणालातरी बिचारा म्हणाला
होता तो.. कोणाला..?

-------------------------------------------------------------------------------------------------------
३० डिसेंबर २०१५

माझे वजन खूप कमी
झाले आहे, मी बुटका दिसतो की हा आरसाच तसा आहे? वजन कमी होईल, उंची? सगळे
कपडे वरुन खालून दुप्पट आकाराचे कसे वाटतात?   आजकाल  घाबरट झालो आहे.   विक्रम काय म्हणेल? विक्रम काय करेल याची भीती .. मला वाटावी?

काय करू? विक्रम आहेच तसा ताडमाड.. किती जोरात आरडाओरडा करतो. सगळी बटन दाबतो फटाफटा.. त्याचा आवाका भलताच आहे.

फोनवर काय बोलत होता. काही तरी अशक्य आहे ते करून दाखवेन अशी बढाई मारत होता. कोण होत फोनवर ते मात्र मला अजून कळलेल नाही.


७ ऑगस्ट २०२०
सुझी तिच्या मांजराला घेऊन शेजारच्या खोलीत  आली
की  मी माझ्या खोलीत दडून बसतो.   मनात एका अनामिक भितीची सुरुवात होते .   कुठेतरी दडून
बसावं आणि बाहेर येऊच नये इतकी. कधीतरी वाटत सगळं कुरतडून काढावं. पेपर, कापड, चिंध्या, जे समोर
दिसेल ते.

माझे दात जास्त धारदार होत आहेत का?


------------------------------------------------------------------------------------------


जानेवारी २०३०

प्रयोगाने सिद्ध झाले आहे की या खास द्राक्षासवाने
आयुष्यमान आणि शक्ती दोन्ही वाढते.  मी आणि विक्रमने एक चीझचा तुकडा तोंडात टाकला.
तेवढ्यात विक्रम हसायला लागला. जुने दिवस आठ्वले की  आम्हाला जाम मजा येते. खूप हसायला येत.

"विक्रम, ते दिवसच
काही और होते नाही? "
"हो पण ती गोष्ट फार जुनी आहे. "
"म्हणजे कधीची
? "
" त्या मिचमिच्या डोळ्याच्या चॅंगला बटाट्यात 'लाइफसेवर' सापडले त्या
आधीची का? की मध्यंतरी माकडाने आणि सशाने उगीच एक नाटक केले होते
त्याच्याही आधीची? "
"असले फाटे फोडायची त्यांना  तशी जुनीच सवय होती. पण 
काय चिडलो  आपण. "

 मी आणि विक्रम दोघेही चिडलो होतो. त्या माकडाने आणि
सशाने मिळून सगळ्या नोंदी उलटसुलट केल्या होत्या. विक्रमच्या प्रयोगाची
सर्व निरीक्षणे.. माझे म्हणजे डॉक्टरचे तक्ते आहेत असे ते  म्हणाले होते.
सर्व
विसरून आम्ही त्यांना माफ केले … ती गोष्ट वेगळी..
--------------------------------------------------------------------------------------------------------
त्याच्या वयापेक्षा विक्रम खूपच छान दिसतो. अगदी तोंडाजवळ आणि पाठीवर एक
पांढरी रेघ वगळता तर तो अगदी सतरा वर्षाचाच दिसतो असे म्हणायला पाहिजे. काय
गंमत आहे नाही. चिरतरुण राहण्याच रहस्य अखेर उलगडलं आहे.

"उंदरांनी माझा
कब्जा घेण्याआधी माझे आयुष्य कसे होते ते काही केल्या आठवत नाहीये ,विक्रम"

 "तेवढी  तुझा आवाका नाही, काय करणार  आहेस तू? "
माझ्या पिंजर्‍यात एक बिस्किट टाकून विक्रम हसतहसत खोलीबाहेर गेला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------
सोनाली जोशी