कुसुमाग्रजांची कविता, पुनर्भेट

'कुसुमाग्रज" एक अद्वितीय, तीव्र संवेदनशील व्यक्तीमत्व. कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांची महाराष्ट्राला अस्मितेला नव्याने ओळख करून देण्याचा तसेच त्यांच्या कवितांचा अर्थ शक्य झाल्यास थोळ्या वेगळ्या पद्धतीने समजून घेण्याचा एक खटाटोप.

माझे भाग्य इतके चांगले की त्याना अगदी जवळून बघण्याचा सुदैवाने योग आला. अर्थात मी खूप लहान होतो त्यावेळी. त्यांच्या काही स्मृती, आठवणी मला माझ्या आईने (ते माझ्या आईचे मामेभाऊ लागत)सांगितल्या होत्या. त्याही तुमच्या समोर मांडण्याचा विचार आहेच. त्यांच्या आठवणी अगोदर आपण त्यांच्या कवितांकडे वळू या.

सुरवात करतो त्यांच्या १९९६ साली 'सकाळ' मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'स्वातंत्रदेवीची विनवणी' या कवितेने

पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका!
मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका!!

सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे!
काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत वरू नका!!

अज्ञानाच्या गळ्यात माळा, अभिमानाच्या घालू नका!
अंध प्रथांच्या कुजट कोठरी, दिवाभितासम दडू नका!!
जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा!
एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका!!

वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे!
करतिल दुसरे बघतिल तिसरे असे सांगुनी सुटू नका!!

जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा!
मेजाखालून मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका!!

बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना!
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा वांझ गोडवे गाऊ नका!

सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने!
करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा करू नका!!

प्रकाश पेरा अपुल्या भक्ती दिवा दिव्याने पेटतसे!
इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंखच पोकळ फुंकू नका!!

पाप कृपणता पुण्य सदयता संतवाक्य हे सदा स्मरा!
भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका!!

गोरगरीबाना छळू नका!
पिंड फुकाचे गिळू नका!
गुणीजनांवर जळू नका!

उणॅ कुणाचे दिसता किंचित देत दवंडी फिरू नका!
मीच विनविते हात जोडूनी वाट वा़कडी धरू नका!!

पर भाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी!
माय मराठी भरते इकडे परकीचे पद चेपू नका!!

भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे!
गुलाम भाषिक होउनी अपुल्या प्रगतिचे शिर कापू नका!!

कलम करी ये तरी सालभर सण शिमग्याचा ताणू नका!
सरस्वतीच्या देवळातले स्तंभ घणाचे तोडू नका!!

पुत्र पशुसम विकती ते नर, नर न नराधम गणा तया!
पर वित्ताचे असे लुटारू नाते त्याशी जोडू नका!!

स्वच्छ साधना करा धनाची बैरागीपण नसे बरे!
सदन आपुले करा सुशोभित दुसऱ्याचे पण जाळू नका!!

तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी!
करमणुकीच्या गटारगंगा त्या तयाला क्षाळू नका!!

सुजन असा पण कुजन मातता तत्यार हातामध्ये धरा!
सौजन्याच्या बुरख्याखाली शेपुट घालून पळू नका!!

करा काय्दे परंतु हटवा जहर जाइत्चे मनातुनी!
एकपणाच्या मारून बाता ऐन घडीला चळू नका!!

समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका!
दासी म्हणूनी पिटू नका व देवी म्हणुनी भजू नका!!

नास्तिक आस्तिक असा कुणीही मांणुसकीतच देव पाहा!
उच्च नीच हा भेद घृणास्पद उकिरड्यात त्या कुजू नका!!

माणूस म्हणजे पशू नसे!
हे ज्याच्या हृदयात ठसे!
नर नारायण तोच असे!

लाख लाख जन माझ्यासाठी जळले मेले विसरू नका!
मीच विनविते हात जोडुनी वाट वाकडी धरू नका!!

कुसुमाग्रज एक अति तीव्र संवेदन शील तत्वचिंतक कवी, नाटककार व लेखक. त्यांच्या प्रत्येक ओळीत पुर्णपणे तत्वज्ञान मुसमुसून भरलेले असते. या कवीतेतही तेच आहे. प्रत्येक वाक्यागणिक संदेश आहे. असे वाटते की हा संदेश अंतःकरण पिळवटून बाहेर येतो आहे. शब्द इतके सोपे की अगदी कोणालाही सहज समजून त्यातील आर्तता कळून येइल. संदेश हृदयाला भिडण्यासाठी शब्द तीक्ष्ण आहेत. या कवितेचा अर्थ विदित करणे किंवा त्यावर काही भाष्य लिहिणे हा या कवितेचा अपंमान होईल.