मांसाशनाचा महिमा...

केवळ नामोल्लेखानेच कुणाला मळमळ होईल तर कुणी उतावीळ होईल. जितके प्राण्यांचे
प्रकार तितक्या मांसाशनाच्या पद्धती, त्याहून जास्त मांसासाठीच्या पाकसिद्धी.
मांसाहारामुळे बुद्धी बद्ध होते हा सिद्धकांचा आरोप असतो. प्रत्यक्षात तसे घडतेच
असे नाही. अर्थात खाण्याबरोबर पिण्याची सोय झाली तर पुढे बऱ्‍याच गोष्टींची गैरसोय
देखील होतेच. बुद्धीचे प्रकरण गुद्दी पर्यँत वाढते,इतकी खाणाऱ्‍या पिणाऱ्‍यांना
चढते!
एकंदर काय तर मांसाशनाची मैत्री मदिरापानाशी जोडली गेल्याने सगळा
जांगडगुत्ता झालाय. अशक्तपणात मांसाची आसक्ती ठेवल्याशिवाय शक्ती येत नाही किंवा
क्षयरोगावर चिकनसूपासारखे पेय नाही अशी एक धारणा आढळते. आजकाल तर मांसाहार खुलेआम
केला जातो. जाहिरातबाजीसाठी वस्तू लटकाव्यात तशा लालभडक मसाला लावून कोँबड्या
लटकवलेल्या दिसतात. चटावलेल्या जिभा पायांना तिकडे ओढतात मग पुढे निषिद्धशा
गोष्टीही जुळून येत जातात. शरीरसौष्ठवासाठी, शक्तिवर्धक म्हणून मांसाशनाचा महिमा
वर्णिला जातो. यातील खरेखोटेपणा अमूकतमूक'श्री' किताबाच्या मानकऱ्‍यांनाच विचारला
जावा. प्राणीमित्र संघटना, शाकाहार पुरस्कर्ते अधून मधून आवाज उठवतात, परंतु
फुटाफुटावरील चिकनसेँटर अन् चौकाचौकावरच्या चायनिज टपऱ्‍यांच्या गदारोळात तो आवाज
क्षीण ठरतो.
तंगड्या तोडायची सुपारी नळ्या फोडण्यापासून सुरू होते, हे सर्वश्रुत
असलं तरी मांसाने मांस वाढते हा सिद्धांत फार पुरातन कालापासूनचा आहेच की!