गोदी मरणार? - पूर्वार्ध

"आज्जी गंऽऽ मी गोदीला चारायला घेऊन चालले गावठाणात. " बंडीने इतके सांगून गोदीचा दोर सोडवून तिला गावठाणाच्या दिशेने न्यायला सुरूवात केली.
"बंडेऽऽ, खबरदार जर त्या गवळ्यांच्या पोरांमध्ये पुन्हा जाशील तर. खालच्या जातीतल्यांमध्ये मिसळायचं नाही, सांगून ठेवतेय. " आजीने नेहमीप्रमाणे नेहमीचा दम भरला पण तिला पक्के माहिती होते की बंडी ऐकणार नाही.

बंडीच्या आजीला सगळी आसपासची घरंच काय गावंदेखील 'बामनीनाजी' (बामनीन + आजी = बामनीनाजी) म्हणून ओळखायची आणि संबोधायचीही. गावातले एकुलते एक ब्राह्मणाचे घर असल्याने आजीला वटही भारी होता. दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीच्या मायेसाठी बंडीचे आईबाबा तिला गावी आजीकडे सोडत असत आणि सुट्टी संपली की परत घेऊन जात असत. घरात आजीच्या हुकुमानुसार चालायचे सगळे पण आजीच्या हुकुमानुसार वागायचे झाले तर घराबाहेर पडल्यावर खेळायला कोणीच मिळणार नाही हे माहिती असल्याने ती आजीचा तेवढाच हुकुम धाब्यावर बसवून घराबाहेर पडायची. लहान असली तरी भारी बंडखोर कार्टी असल्याने तिचे नाव आजीनेच 'बंडी' पाडले होते.

जवळच्याच गावातल्या पाटलाने देवीला नवस केला होता की त्याची बायको दुखण्यातून बरी झाली तर तो एक गाय ब्राह्मणाला दान करेल. डॉक्टरांच्या औषधाला गुण येऊन त्याची बायको खरोखरच दुखण्यातून बरी झाली आणि नवस फेडायची पाळी त्या पाटलावर येऊन ठेपली. गरज सरो .. म्हणीनुसार तो स्वस्तात सगळे उरकायच्या मागे होता पण बायको भाविक निघाल्याने दान करणे जरुरी असल्याने केलेच पाहिजे असा सूर त्याच्या घरात निघाला. आलिया भोगासी.. म्हणून त्याने वासरी दान करायचे ठरवले. पाटलीणीचा कर्मकांडाबाबतीत बामनीनाजीवर खूप विश्वास असल्याने त्यांनाच गाय दान करायचे असे ठरले. यथावकाश सगळे पूजापाठ वगैरे करून पाटलांच्या घरची वासरी बामनीनाजींच्या घरी आली. तिचे नामकरण गोदावरी आणि मग त्यातून गोदी पडले. यावेळी बंडी आली तेव्हा गोदी स्वागतालाच उभी होती तिच्या. दोघींची वयं एकमेकींना साजेशी त्यामुळे गावातल्या गायींना घाबरणारी बंडी गोदीला मात्र न घाबरता गावभर हिंडवायला एका पायावर तयार झाली.. तशीही गोदी अगदीच शांत होती स्वभावाने.

"शंक्र्याऽऽ, हण्म्याऽऽ, काऽऽशे.. चला गावठाणात जाऊया. आज तुमच्यासोबत गाईबैलं असतात तशी माझ्यासोबतपण माझी गोदी आहे. चला लवकर.." गवळ्यांच्या घरांसमोर उभी राहून बंडी कायमसारखी तिच्या मित्रमंडळाला हाक मारत होती.
हण्म्या आणि काशी बाहेर आले. काशी लगेच धावत गोदीपाशी येत तिला गोंजारायला लागली.

"मला कवाधरनं वाइच हात लाऊन पहायचा हुता गोदीला पर तुही आजी लावून देईन तर  शपथ! लै ग्वाड हाय तुजी गोदी.. " तोंडभरून कौतुक करत काशी गोदीची पोळ खाजवायला लागली. तितक्यात शंक्र्या बाहेर येत ओरडला, "काऽशेऽ म्हागे व्हय. हात लावायचा न्हाय त्या खालच्या जातीतल्या जनवराला सांगून ठिवतोय."

मोठ्या भावाचं न ऐकून कुठे जातेय काशी?

".. आन् बंडे, तुले यायचं असंन आमच्यासंगं तर यैजो पन त्या खालच्या जातीतल्या गोदी की फोदीला न्हाय येउंदेनार म्या आपल्यासंगट..तिले घरी ठेवून ये जा." शंक्र्याने फर्मान पुरे केले.

बंडीला काही कळेना नक्की काय बिनसलेय शंक्र्याचे ते.
"काय रे शंक्र्या, काय झाले तुला एकदम? गोदीला खालच्या जातीची काय म्हणतोयस सारखी सारखी एखादी शिवी घालावं तशा ढंगाने? "

"दानात आलेलं जनावर कंदीबी चांगल्या तब्येतीचं नसतंया. काहितरी खोट असतीया म्हूनच त्ये दानात जातंया. माझी जनवरं बघ.. कशी घरंदाज हायती. न्हायतर तुझी ती खा... "

शंक्र्याचं वाक्य अर्ध्यात तोडत बंडी, "असंना का मग खालच्या जातीतली.. आपल्यासोबत यायला काय हरकत आहे? "

"उद्या म्हाजा धना जर मराया ट्येकला तुझ्या त्या सडेलपटक गोदेडीच्या रोगामुळं तर...? आपली जनवरं तुपल्या त्या गोदेडीसंगं जायाची न्हाय म्हंजी न्हाय. बस्स. तिचं मरन मरू दे तिलाच.. "

इतकावेळ खालची जात, दान, रोग वगैरे काय काय नवे नवे ज्ञान मिळत होते ते चुपचाप ऐकणारी बंडी गोदीच्या मरण्याच्या शब्दाने मात्र चांगलीच फणकारली.

"शंक्र्या, थोबाड संभाळून बोल्जो.. कोनाचं मरण काढतूस? माह्या गोदीचं? आर्र ज्जा.. ह्या बंडीच्या जीवात जीव हायतो बघतेच म्या कोन काय करतंय माह्या गोदीले ते. माजी गोदी चालायची न्हाय तर मीबी येनार न्हाय.. जाय्जो तुपले तुमीच. " असं बोलून फणकाऱ्यात बंडी गोदीला घेऊन एकटीच गावठाणाकडे जायला निघाली. चिडली की बंडी गावठी भाषेतच बोलायला सुरू होऊन जायची.

"कोन काय कराया कशाला पायजे हाये? त्यो रोगच असा हाय की घेऊनच डुबत्यो.. म्याच नाय तर अख्खा गाव असंच बोलतुया.. विश्वास नसंन तर जा म्हादूकाकाला इचार जा."

शंक्र्याचे हे शब्द ऐकून मात्र बंडीचे हृदय घाबरले. तिने गोदीला घेऊन गावठाणाची दिशा सोडून म्हादूकाकांच्या घराची दिशा पकडली.

"म्हादूकाका, एक विचारायचं आहे तुम्हाला.. विचारू? " म्हादूकाकांना गोठ्यातच गाईबैलांना चारा टाकताना पाहून बंडीने सरळ विषयालाच हात घातला.

"अगं बंडी तू? परवा आली गावात अन् आज उजडावा लागला हां तुले म्हादूकाका सुदरायला? कशी हाईस पोरी? आंबे पायजेल की कैऱ्या?" बामनीनाजींची नात खालच्या जातीतले असूनही आपल्याकडे येते, आपली चौकशी करते, आंबेकैऱ्या पाहिजे म्हणून हट्ट करते याचं म्हादूकाकांना पहिल्यापासूनच खूप अप्रूप. 

"नाही काका. आज आंबेकैऱ्या नको. उत्तर पाहिजेय."

"आता ह्ये काय नविन? "

"तो शंक्र्या म्हणतोय की माझ्या गोदीला कुठलातरी रोग झालाय आणि म्हणून ती मरणार आहे. खरंय का ते? "

म्हादूकाका या प्रश्नाने चमकले. आता या छोट्या पोरीला कसे काय सांगायचे असा प्रश्न बंडीच्या डोळ्यात दाटून आलेल्या व्याकुळतेला पाहून त्यांना पडला.

"आता कसं सांगू रं देवा?"

"कसंपण सांगा पण खरं काय आहे तेच सांगा. खरं हेच आहे ना की गोदीला काही झालेले नाहीये आणि शंक्र्या उगाच रागराग करतोय? आजी म्हणाली तेच बरोबर आहे.. मी आता कधीच त्यांच्यात खेळायला जाणार नाही. मी आणि गोदीच खेळत जाऊ. आली तर काशी येऊ दे आमच्यात."

"बंडे, परत्येक छोट्या जीवाला आई लागतेया. बरूबर की न्हाई? तुही गोदी किती छोटी हाये.. तिले आई पाहिजे तिची काळजी घ्याया.. न्हाईतर.. "

"नाहीतर काय म्हादूकाका? "

"बोलवत न्हाय मले.. "

"गोदी मरणार? " बंडीच्या डोळ्यात अश्रू तरारले.

-क्रमशः