केशकर्तन

            आपण मराठी! मोडू पण वाकणार नाही हा आमचा बाणा... पण या बाबतीत सगळ्यात जास्त नशीबवान कोण असेल तर तो म्हणजे आमचा न्हावी! त्याच्या पुढ्यात त्याच्याकडे तोंड करून नसली तरी आम्ही मान निश्चितच तुकवलेली असते! त्याच्यासमोर आमचा सगळा मान आम्ही सोडलेला असतो आणि 'मी ठेवितो मस्तक तुझ्या चरणी' प्रमाणे आम्ही त्याच्या हाती आमचे मस्तक ठेवलेले असते! मग त्याचे नांगरणे सुरू होते. मात्र या शेतीला पावसाची वाट पाहावी नाही लागत. इथे असतो त्याचा बाटलीतला पाउस. फुस्स फुस्स करून आपल्या मस्तकाच्या एकरावर त्याची फवारणी सुरू होते. स्प्रे पेंटिंग करत असल्याच्या आनंदात तो आपला चेहरा धुतो आणि मग निर्विकार चेहऱ्याने आपल्याला तितक्याच निर्विकार चेहऱ्याचे नमुन्यासाठी काही फोटो दाखवतो. त्यातल्या एकाकडे अंगुलीनिर्देश करणे आपल्यासाठी फारच जड जाते. सगळ्याच केशरचना तितक्याच आकर्षक आणि तितक्याच अनाकर्षक वाटल्याने आपला आपल्या निवडीविषयीचा गोंधळ आणखी वाढतो पण त्याचा बिलकुल विचार न करता त्याचे कर्तन सुरू होते.
           कीर्तनकार आणि कर्तनकार यांच्यात मला नावाप्रमाणे वागणुकीतही विलक्षण साम्य वाटते. तो चिपळ्या आणि त्याच्या मधुर आवाजाच्या जोडीने आपल्याला ब्रह्मांडाची सफर घडवतो तसाच कर्तनकारही आपल्याला कंगवा, कात्री यांच्या नादमय हालचाली आणि त्याचे गुणगुणणे याच्या समयसूचक वापराने आपले डोके हवे तसे हलवून आपल्याला ब्रह्मांडाचे दर्शन घडवतो. आपले डोके जेव्हा वर उठते तेव्हा आपल्या चेहऱ्यात विलक्षण बदल झालेला असतो आणि मघाशी केस कापायला आलेलो ते आपणच का असा सवाल आपल्याला पडतो आणि आपण डोके खाजवायला जातो आणि आपल्याला लक्षात येते कि आपल्याला मानेवरही खाज येते आहे आणि केस कापून झालेल्या अशा अनेक असंख्य जागी खाज येते आहे, पण त्याबद्दल तक्रार करण्याआधीच आपल्याला लहान बाळाप्रमाणे आपल्याला किलोभर पावडर फासली जाते आणि आपली खुर्ची दुसऱ्याला द्यायची वेळ झाली आहे हे आपल्याला जाणवून दिले जाते. इतकी आकर्षक खुर्ची लवकर सोडावी लागल्याने आपला भ्रमनिरास होतो आणि आपण चुपचाप खिशाला हात घालतो. आपले केस कमी करणारा माणूस त्याचे केस कापण्याचे दर का कमी का करत नाही हा प्रश्न पडतो आणि उत्तर मिळण्या आधीच तो जमिनीवर पडलेल्या केसांप्रमाणे निरुपयोगी झालेला असतो. त्या पडलेल्या केसात आपले केस कोणते याचा अंदाज बांधत आपण बाहेर पडतो आणि जगावेगळे काहीतरी केल्याचा आनंद चेहऱ्यावर घेऊन आपल्याकडे कितीजण पाहत आहेत याची नोंद घेत राहतो!