सत्याचे प्रयोग करणे मोठी अवघड गोष्ट आहे.जन्मात कधी असत्य भाषण न करणाऱ्या धर्मराजालाही एकदा तरी " नरो वा कुंजरो वा " म्हणून पूर्णपणे नाही तरी अर्धवट असत्याचा आधार घ्यावा लागला.म.गांधींनाही सत्याचे प्रयोग करणे फार सोपे गेले नाही,मग मी तर एक य:किश्चित "आम आदमी" त्यामुळे सत्याचे काही प्रयोग माझ्याही अंगावरच उलटले यात आश्चर्य ते कसले?
माझी सोलापूरच्या तंत्रनिकेतनात बदली झाली त्यानंतरची गोष्ट ! त्यावेळी माझ्याकडे यंत्रअभियांत्रिकीच्या विभागप्रमुखाचा कार्यभार होता. आमच्या विभागाकडे रिक्षामीटरच्या तपासणीचे काम असे.या तपासणीत ठराविक वेळात मीटरमधील चक्राचे योग्य तेवढेच फेरे होतात का हे पहाणे आणि त्या चक्राचे विशिष्ट फेरे झाल्यावर योग्य तेच आकडे मीटरवर येतात की नाही हे पहाण्याचे काम असे.ते पाहून तसे असेल तर मीटरला संस्थेचे सील करून तपासणीचे प्रमाणपत्र तंत्रनिकेतनाच्या प्राचार्यांच्या सहीने देण्यात येत असे.विशिष्ट कालावधीनंतर असे प्रमाणपत्र घेण्याचे बंधन रिक्षाचालकांवर असे,आताही असेलच.
मी विभागप्रमुख असल्यामुळे प्रत्यक्ष तपासणीचे काम विभागातील इतर व्याख्याते व सहाय्यक अधिव्याख्याते करत.या कामासाठी संस्थेस मिळणाऱ्या रकमेचा काही वाटा प्रत्यक्ष तपासणी करणाऱ्यास तसेच विभागप्रमुख आणि प्राचार्य यांना मिळत असे,आणि ५०% रक्कम शासकीय कोषात जमा होत असे.
मी विभागप्रमुख झाल्यावर मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे संस्थेकडे येणाऱया प्रत्येक मीटरचे संस्थेचे सील गायबच असे.आणि रिक्षाचालकांना विचारल्यावर मीटर दुरुस्तीकरता ते सील तोडावे लागते असे ते सांगत.त्यावेळी सोलापुरात रिक्षा मीटरप्रमाणेच चालत पण मीटरची गती अगदी लक्षणीय असे म्हणजे आपण रिक्षात बसतो ना बसतो तोच पहिला फ्लॅग पडत असे आणि पुढचीही मीटरची गती तशीच भन्नाट असे,त्यामुळे सोलापुरात आम्ही क्वचितच रिक्षाचा वापर करत असू. पण आता या मनमानीस आपण चाप लावू असे माझ्या मनाने घेतले.
माझ्या मते संस्थेला सील लावण्याचा अधिकार आहे म्हणजे ते तोडण्याचाही अधिकार फक्त संस्थेसच आहे नाहीतर संस्थेच्या सील करण्याला काहीच अर्थ नाही त्यामुळे मी संस्थेचे सील तोडलेले नसेल तरच रिक्षामीटरची तपासणी केली जाईल असे जाहीर केले.सगळेच रिक्षावाले संस्थेचे सील तोडूनच मीटरची दुरुस्ती म्हणजे गती वाढवण्याचे काम करत असल्यामुळे कोणत्याच मीटरला सील नसे आणि माझ्या अध्यादेशामुळे कोणताच मीटर तपासणी योग्य न ठरल्यामुळे तपासणी न होताच संस्थेत पडून राहू लागला.
असे काही दिवस गेल्यावर शेकडो मीटर तपासणीविना पडल्यामुळे रिक्षाचालकांचे नुकसान होऊ लागले कारण मीटरशिवाय ते रिक्षा बाहेर काढू शकत नव्हते. माझ्या या आदेशामुळे रिक्षाचालक इतके संतप्त झाले होते की एक दिवस मला गाठून मारण्याचा त्यांचा विचार होता असे माझ्या एका सहाय्यक यंत्रपरिचराने नंतर मला सांगितले.
शेवटी एक दिवस प्राचार्यांनी आपल्या केबिनमध्ये बोलावून याविषयी विचारले त्यांची व आर.टी.ओ.ची याविषयी चर्चा झाली असावी.त्यामुळे मीटरची तपासणी मी का थांबवली असा त्यांचा सवाल होता.मी माझे मत काय आहे हे सांगितले आणि त्याचबरोबर असे केले तर रिक्षाचालक अथवा मालक परस्पर आमचे सील तोडून त्यात त्यांच्या फायद्यासाठी जी सुधारणा करतात त्याला आळा बसेल असे सांगितले.माझा हा युक्तिवाद मान्य करूनही प्राचार्यांनी आमच्या संस्थेचे सील आहे की आही हे पहाण्याची जबाबदारी प्रादेशिक वाहतूक अधिकारी घेतात तेव्हां तुम्ही त्याची काळजी करू नका असे मला बजावल्यावर अर्थातच माझा हा सत्याचा प्रयोग मला बंद करावा लागला आणि रिक्षाचालक पूर्ववत प्रवाशांची लूट करण्यास मोकळे झाले.
माझा दुसरा सत्याचा प्रयोग मी एका उन्हाळी शिबिरासाठी बडोद्यास गेलो असताना करण्याची बुद्धी मला झाली आणि त्यात खरेच मला मोठा भूर्दंड बसला.त्यावेळी अशा शिबिरांस हजर रहाण्यासाठी केलेल्या प्रवासाचा पहिल्या दर्जाचा प्रवासखर्च शासनाकडून अथवा शिबिर आयोजित करणाऱ्या संस्थेकडून मिळत असे.मला जाण्याची पूर्वसूचना लवकर न मिळाल्यामुळे जाताना मला पहिल्या वर्गाचे आरक्षण न मिळाल्यामुळे मी बसने बडोद्यास गेलो.पण या अनुभवाने शहाणा झाल्यामुळे बडोद्यास गेल्यावर मी लगेच परतीचे पहिल्या वर्गाचे आरक्षण करून टाकले.
आमचे शिबिर सुरू झाल्यावर काही दिवसांनी आमची प्रवासभत्ताबिले करण्यासाठी आमच्याकडून प्रवासाचा तपशील मागवण्यात आला.त्यात प्रथम वर्गाने जाणाऱ्या शिबिरार्थींकडून त्यांच्या तिकिटांचा क्रमांक द्यावा असे लिहिले होते.बहुतेक शिबिरार्थी द्वितीय वर्गानेच आले होते पण सर्वांनी प्रथम वर्गानेच आल्याचे जाहीर केले होते तिकिटक्रमांक कोणीच टाकला नाही.मी मात्र आपण असा खोटेपणा करायचा नाही म्हणून जाताना बसने गेल्यामुळे बसचे भाडे आणि परतीच्या प्रवासासाठी प्रथम वर्गाचे भाडे असे माझ्या तपशिलात नोंदवले. आमचे शिबीर संपण्याच्या दोन दिवस अगोदर आम्हाला प्रवासभत्त्यासाठी बोलावणे आले. सर्व जणांना त्यानी नोंदवल्याप्रमाणे पहिल्या वर्गाचा जाण्यायेण्याचा भाडेखर्च मिळाला. मला आत बोलावून माझ्या हातात मात्र प्रवासभत्ता मिळाला तो जाण्यायेण्याच्या बसभाड्याइतका.मी आश्चर्यचकित झालो आणि त्या अधिकाऱ्याला विचारल्यावर तो अधिकारी म्हणाला," तुम्ही येताचा प्रवास बसने केला होता त्यामुळे जातानाचाही तसाच करणार असे आम्ही गृहित धरले." यावर मी म्हणालो "मी जरी येताना बसने आलो होतो तरी जाताना मात्र पहिल्या वर्गाने जाणार आहे आवश्यक असल्यास मी माझे आरक्षण केल्याचे तिकिट दाखवतो " यावर त्या अधिकाऱ्याने याबाबतीत आपली असमर्थता व्यक्त करून मला सांगितले "आता माझ्याजवळील या कामासाठी खर्च करण्याची रक्कमच संपली आहे त्यामुळे माझा नाइलाज आहे,"या शिबिरासाठी अगदी दिल्ली वगैरे ठिकानाहून शिबिरार्थी आले असल्याने त्याची पहिल्या वर्गाच्या भाड्याची रक्कमही तशीच जबर असल्याने त्याच्या म्हणण्यात तथ्य नव्हते असे म्हणता येत नाही. पण मला मात्र त्याचा फटका बसला.
त्यानंतर मी महाविद्यालयात परत गेल्यावर I.S.T.E. या संस्थेशी पत्रव्यवहार करून काही रक्कम मिळवली तरीही माझ्या सत्याचरणाचा चांगलाच धडा मला मिळाला हे मात्र निश्चित !