विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या

आज वर्तमानपत्रात विदर्भातील एका शेतकऱ्याच्या आत्महत्येची बातमी वाचली आणि मन विषण्ण झाले. अश्या अनेक बातम्या आपण वाचतो, काही वेळ हळहळतो आणि पुन्हा आपल्या कामाकडे वळतो. पण निदान काही वेळ तरी आपण काहीतरी करावे ही इच्छा प्रबळ होते.

अवघ्या १-१.५ लाख रुपयांच्या ओझ्याखाली एक शेतकरी दबून जातो आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला वाऱ्यावर सोडून आत्महत्या करतो? आपल्यापैकी अनेक लोकांसाठी  ही काही खूप मोठी रक्कम नाही. आपल्या अनेक समारंभांवर इतकी रक्कम सहज खर्च होते. मग कोणाचा जीव वाचवण्यासाठी आपण आयुष्यात एकदा तरी ती खर्च करू शकणार नाही का? आपण दोन्ही वेळेस पोटभर जेवतो, आणि ते अन्न पिकवणारा मात्र आत्महत्या करतो, हा विरोधाभास का? निदान कृतज्ञता म्हणून तरी आपण त्याच्यासाठी काही करू नये काय?

पण काहीतरी करायचे म्हणजे नेमके काय करायचे? एखाद्या संघटनेला पैसे दिले तर ते योग्य लोकांपर्यंत पोहोचतील याची खात्री कशी द्यायची?

दुसरा मुद्दा हा की खरोखरच आत्महत्येखेरीज शेतकऱ्यांकडे काही पर्याय नसतो का? उदाहरणार्थ उन्हाळ्यापुरते इतरांच्या शेतात काम करणे किंवा शहरात मजुरी करणे किंवा आणखी काही? की पर्याय आहेत हेच मुळी त्यांना माहीत नसते? आणि हे माहीत नसेल तर निदान ते त्यांना माहिती करून देणे, हे काम कोणाचे?

थोडक्यात म्हणजे, आपण काय करू शकतो हे कोणी सांगेल काय?