स्वरचित्र

पहाटेची वेळ आहे. समीप असणाऱ्या शिवमंदिरात खणखणणाऱ्या घंटांचा नाद कानी पडतो आहे. पाखरांची किलबिल सुरू झाली. शुचिर्भूत होऊन तिकडे निघालेल्या भाविकांचे प्रसन्न दर्शन घडते आहे. दिनकराच्या स्वागताला उत्सुक असलेल्या पूर्वेचे गाल आरक्त झाले आहेत. अनवाणी हरळीवर चालताना पावलांना सुकोमल स्पर्श होतो आहे, दवबिंदूंचा ओलावा जाणवतो आहे. मी आनंदात सूर्यदेवतेच्या सौम्य रूपाचे दर्शन घेतो. आता थोडे आणखी उजळले आहे. एक मुग्ध, निष्पाप बालिका फुलपाखरू पकडायला धावते आहे. हाती यावे तोच ते निसटते आहे. हळूहळू वाढणाऱ्या लयीत हा खेळ चालू आहे. मधूनच विष्णुसहस्त्रनामाचा जप करणाऱ्या नानांचे धीरगंभीर उच्चार  पुसटसे ऐकू येतात. ती बालिका थकते आहे. धावपळीची तिची लय मंदावली, आणि आता ती स्वस्थ बसली आहे. पुन्हा एकदा मंदिरातल्या घंटांचा नाद ऐकू आला. आता मात्र आजूबाजूच्या वाढत्या कोलाहलात तो विरत जातो आहे ...

[पंडित शिवकुमार शर्मा यांची 'सनराईझ ऑन द पीक्स' ही छोटेखानी रचना 'म्युझिक ऑफ द माउंटन्स' या संग्रहातील आहे. ती ऐकताना डोळ्यासमोर उभे राहिलेले हे स्वरचित्र. संतूर च्या नादब्रह्माची नजाकत, ललत रागाची स्वररचना, पंडित भवानी शंकर यांच्या पखवाज ची धीरगंभीर थाप यांचा एकत्रित परिणाम मिळून हे सरकचित्र साकारले. ते शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न. ]

दुवाः सनराईझ ऑन द पीक्स

- हरिभक्त