एका मोकळ्या पांढऱ्या कागदावर

काही मोकळ्या ओळी सोडून
काही मोकळे  श्वास ओढून
’ते’ पाणीदार डोळे आठवतात
आणि ’ह्या’ पापण्या जड होतात

एक आठवण पुरेशी असते
हे रान पेटवायला
मनातलं हरीण धावत सुटतं मग
उरतात फक्त ओल्या कडा.

शब्दांच्या माळेचा प्रत्येक मणी
पेट घेत राहतो, एका पाठोपाठ एक
ही उरलेली राख कपाळावर फासून
सुरू होतो विचारांचा  तांडव.

आणि निपजते, पांढऱ्या  कागदावर 
एक गुलाबी कविता.