खुळी प्रीत माझी, तुला दाखवू दे

तुझे भास सारे जरा आठवू दे,
तुझ्या वेदनेने मना जागवू दे.

उगा वेळ जातो तुझ्या आठवांनी,
तुझ्या सावल्यांनी जरा लाजवू दे.

कशी छेदते वाट माझी तुझ्याशी,
जरा ऐक रे वेळ ही थांबवू दे.

कशा गुणगुणावे इथे वादळांनी,
मला आज त्यांनी जरा खेळवू दे.

तुझा श्वास की मोगरा केतकीचा,
क्षणा थांब तू, गंध हा साठवू दे.

तुला शोधण्याचे मला वेड आहे,
जगा सांगण्या धीर हा वाढवू दे

प्रिया, आस वेडी तुझी लागताना,
खुळी प्रीत माझी, तुला दाखवू दे.