रिलायन्स फ़ार्मा फंड एक छान टॉनिक

साधारण १ ते १. ५ वर्षापूर्वी औषध क्षेत्रातल्या कंपन्याना कोणीही फारसे विचारत नव्हते गुंतवणूकीदारानी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते. पण आता याच कंपन्या गुंतवणूकीदारांच्या आवडीच्या झाल्या आहेत.
मागच्या पूर्ण वर्षात औषध क्षेत्रातील म्युच्युअल फंडस्नी गुंतवणूकीदाराना सरासरी ८८% नफा दिलेला आहे व त्यामुळेच त्यांची गणना अग्रेसर म्युच्युअल फंडात होइल.
आणि याच औषध क्षेत्रातील फंडांच्या प्रकारातील रिलायन्स फार्मा फंड हा अत्यंत अग्रगण्य फंड मानायला हरकत नाही. जरी हा फंड या प्रकारातील सर्वात शेवटचा फंड, म्हणजे २००४ मे महिन्यात सुरू झाला, तरी कानामागून येऊन अनेक फंडसना तिखट झाला. तसे या प्रकारात फक्त चारच फंड आहेत --- प्रत्येकी एक युटीआय, फ्रॅंकलीन टेंमप्लेटन आणि एस बी आय मॅगनम
फक्त २००८ साल सोडले तर या फंडचा बेंचमार्क बीएससी हेल्थकेअर इंडेक्सला या फंडनी सतत मागे टाकले आहे. २००५ मध्ये फंडने २९% नफा दिला तर बीएससी हेल्थकेअर इंडेक्स फक्त १. ८% वाढला. आणि २००७ साली जरी औषध क्षेत्रातील कंपन्याची कार्यक्षमता फारशी चांगली नव्हती तरी फंडने ५०% नफा दिला तर बीएससी हेल्थकेअर इंडेक्स फक्त १६. ५% वाढला.
पण २००८ मध्ये मात्र या फंडच्या एनएव्ही मध्ये ३४% घट झाली तर बीएससी हेल्थकेअर इंडेक्स ३३%नि घसरला. पण २००९ मध्ये या क्षेत्रातील आलेल्या तेजीने गुंतवणूकीदारांचे नुकसान तर पूर्ण भरून निघालेच पण भरघोस नफाही मिळवून दिला. बीएससी हेल्थकेअर इंडेक्स जरी २००९ मध्ये ६९% वाढला पण रिलायन्स फार्मा फंडची याच वेळी ११८% वाढ झाली. याच्या तुलनेत सेंन्सेक्स व निफ्टी अनुक्रमे ८१% व ७६% वाढले. या वर्षाच्या अजुनपर्यंतच्या काळात ११% नि वाढला तर बीएससी हेल्थकेअर इंडेक्स वाढला आहे फक्त ५%.
बाकीच्या फंडच्या तुलनेत या फंडकडे तरलता(लिक्वीडीटी) कमी आहे फंड सरासरी फक्त ५. ४% येवढीच तरलता(पैसे तयार असणे) ठेवतो. या फंडकडे असलेली एकूण गुंतवणूक(एयुएम) एकंदर रुपये ३५० कोटीची आहे. व त्यांच्याकडे १८ कंपन्यांचे शेअर्स आहेत व प्रत्येक शेअरचा भाग साधारण गुंतवणूकीच्या ८-९% येवढाच मर्यादित आहे. स्मॉल व मिडकॅप कंपन्यावर असलेल्या फंडाच्या भरामुळे हा फंड आक्रमक आहे. एक कंपनी झायडस वेलनेस या कंपनीच्या शेअरची किंमत मागच्या वर्षात सुमारे ५००%नि वाढल्यामुळे त्याचा फायदा या फंडला खुपच झाला.
येवढ्या माहितीवरून सुज्ञांच्या लक्षात आले असेलच की या फंडात पैसे गुंतवले तर नफ्याचे टॉनिक चांगलेच मिळेल. मान्यवर आर्थिक सल्लागारांचे म्हणणे आहे की औषध कंपन्या या वर्षी सुद्धा चांगला नफा मिळवतील.
अर्थात एकाच क्षेत्रात गुंतवणूक किती केंद्रीत करायची हा प्रश्न उदभवतोच व हा निर्णय गुंतवणूकीदारावर अवलंबून आहे.
अर्थात स्वतः किती जोखीम घ्यायची हे ज्याने त्याने ठरवावे. माझे काम फक्त माहिती पुरवणे एवढेच आहे.
शेवटी अर्थात चूकभूल द्यावी घ्यावी!