पुणेरी आजोळ-१

आम्हाला सुट्टी लागली की आई पुण्याला घेऊन यायची. आम्ही खेड्यात राहणारे
म्हणून आम्हाला पुणेरी आजोळाचं खूप आकर्षण तर आमच्या गावठी वागण्याची,
गावंढळ भाषा हेल काढून बोलण्याच्या पद्धतीची मामेभावांना अतीव ओढ. त्यावेळी
मामा हडपसर १५ नंबरला तुपे चाळीत रहायचा.
गावाकडून निघून पुण्यात पोचेपर्यँत आई किती कितीदा 'शुद्ध बोला बरं का,
दंगा करायचा नाही, काही तोडफोड करायची नाही, हट्ट करायचा नाही', असं
समजावित रहायची. आम्ही 'हा हा' म्हणायचो. 'हा नाही हो म्हणावं', पुन्हा ती
बजावायची. आम्ही 'होऽ' करून खिडकीबाहेरची पळणारी झाडे टुकूटुकू पहात
असायचो...
मोठा मामेभाऊ नुकताच पोहायला शिकला होता. भर उन्हात दुपारच्या वेळी पोहायला
जाण्यास मामीची परवानगी काढून आम्ही चाळीपासून फर्लाँगभर दूर असलेल्या
कालव्याजवळ पोहचलो. वेगवान पाण्याने दुथडी भरून कालवा वाहत होता. आमच्या
सोबत चाळीतली बऱ्‍यापैकी पोहता येणारी चारपाच मुलेही होती. मला सोबत न
आणण्याचा त्यांचा डाव मी गावाकडचे भोकाड पसरून यशस्वीपणे हाणून पाडला, फक्त
कपडे सांभाळण्याच्या बोलीवर मामीने बरोबर जाण्याची परवानगी दिली. कारण मी
लहान तर होतोच शिवाय कमरेला डबा बांधून हातपाय झाडण्याच्या लायकीचा सुद्धा
नव्हतो. लुकडा, काटकुळा आजोळच्या भाषेत बराच अशक्त असल्यामुळे केवळ कपडे
सांभाळण्याचं पुण्यकर्म वाट्याला येऊनही मी भलत्याच खुशीत होतो.
पोरांनी कपडे काढून धावत्या पाण्यात उड्या मारल्या. एकजण पोहता येत असूनही
घाबरू लागला म्हणून त्याला सोबत आणलेला हवाबंद डबा बांधला गेला. त्यामुळे
मी मनातून हिरमुसला होऊन काठावरच्या कपड्यांना राखण बसलो. किमान डबा
बांधूनतरी डुंबता येईल ही शक्यताही आता मावळली होती. पोरांचं पाण्याच्या
प्रवाहावर स्वार होऊन लांबवर वाहत जाणं, काठावर येऊन चालत मूळ जागी येणं,
पुन्हा पाण्यात झेपावून हातपाय मारीत आपोआप दूरवर जाणं मोठ्या केविलवाण्या
चेहऱ्‍याने मी पाहत होतो. डबेवाल्याची तर फारच मजा होती. पाण्यावर नुसतं
पडून रहायचं हातपाय हलवण्याचे श्रम नव्हते, नावेसारखा हेलकावत वाहून जायचा
बेटा. मला त्याचा खूपच हेवा वाटू लागला...
ऊन चटकत होतं. आडोसा किंवा सावली नव्हती. समोर थंडगार रोरावणारं पाणी! माझा
संयम सुटलाच. मी भराभर सगळे कपडे काढले, मी पोहलो याचा पुरावा राहू नये
म्हणून मला ते करणं भाग होतं. मी डुंबणार नाही असं ठरलेलं असल्यामुळे
मामीने माझ्यासाठी टॉवेल कपडे दिलेच नव्हते. कुणाचं लक्ष असण्याचं कारणच
नव्हतं, जोतो आपल्या मस्तीत पाण्याशी खेळत होता...
काठावर बसूनच मी पाण्यात पाय सोडले. अहाहा! काय हा थंडगार स्पर्श! मग पाणी
अंगावर उडवून घेऊ लागलो. अंग काही पुरेसं भिजत नव्हतं. वाटलं थोडंसं पुढे
जाऊन पाण्यातच बसकण मारावी. जसं मनात आलं तसं केलं... परंतु ती काय
गावाकडची उथळ नदी नव्हती, या काठापासून त्या काठापर्यँत चालत जायला.
काही समजायच्या आतच मी प्रवाहाकडे ओढला गेलो. नाकातोंडात पाणी जाऊ
लागल्याने शब्दच फुटत नव्हते. पलिकडील काठावरून कुणीतरी बाई ओरडत होती- 'वो
नंगा बच्चा किसका है? डुब रहा है, बचाओ..बच्चाओ.'
तेव्हा कुठे पोहणाऱ्‍यांचं माझ्याकडे लक्ष गेलं. माझ्याकडे झेपावत दोन तीन
पोरांनी मला पकडून वर काढलं. एकाला गच्च मिठी मारून मी खोकत होतो, धापा
टाकीत होतो, उलट्या घालीत होतो...
पोहणं थांबवून सगळी मुलं माझ्याभोवती जमली. सगळेच रागावले होते. मामेभाऊही
चिडलेला. पोहणं अर्ध्यावर टाकून घरी परतावं लागणार होतं.
'पण तू पाण्यात उतरलासच कशाला?' भावानं खडसावून विचारलं.
'मपल्याला वाटलं ही नदीच हाये व्हाळूनं भरल्याली' धापा घेत मी उत्तरलो तसे
सगळेच हसू लागले.
घरी येतांना भाऊ म्हणाला,'तू बुडता बुडता वाचलास हे घरी सांगू नकोस.'
'मंग काय सांगाया पायिजेल?'
'मूर्खा, काहीच बोलायचं नाही. समजलास?'
'पर कामून?' माझ्या प्रत्येक गावरान बोलीवर सगळे हसून घ्यायचे. एखादं
कार्टुन बघावं तसे ते माझ्याकडे पहायचे.
'अरे वेड्या, घरी जर आजचा प्रकार कळला तर उद्यापासून पोहायला येणं बंद होईल
आमचं. काय?'
'म्हंजी उद्याच्याला बी यायचं पवाया?' हर्षभरीत होऊन मी विचारलं अन् पुन्हा
एकदा सर्वाँनी माझ्या गावठी हेलाला हसून घेतलं.
पण मामेभाऊ यावेळी गप्पच राहिला होता उद्या ह्या गावकऱ्‍याला कसं टाळता
येईल, बहुतेक हीच उपाययोजना तो मनातल्या मनात जुळवित असावा...