अनुक्रमणिका!!

फाड आभाळाचा एक कागद...
कालव तुझ्या रक्ताची शाई...
धर हातात क्षितिजाची लेखणी...
बसं लिहावयास,
तुझे स्वत्व पणाला लावून...
आठव,
हसला होता सूर्य तुझ्या तेजावरती...
आठव,
हसले होते वादळ तुझ्या झंझावातावर...
आठव,
टाकले होते जगाने तुला उपरा म्हणून...
आठव,
सोडली होती साथ नशिबाने फाटका म्हणून...
विसरू नकोस,
तुझ्या नशिबात नाहीये द्रौपदीचा शेला...
येणार नाहीये कोणी लाज राखण्यासाठी- 
-सावळा बनून!!
म्हणूनच,
खेच जगण्याचे लगाम...
फाड नीतिमत्तेची जीर्ण वल्कले...
लाथाड झाकोळलेले तुझे प्राक्तन...
बेफाम होऊन...
बसं लिहावयास,
तुझे स्वत्व पणाला लावून...
आणि रच,
तुझ्या धगधगत्या आयुष्याची "अनुक्रमणिका"!!